Saturday 30 March 2024

DIO BULDANA NEWS 30.03.2024

 महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराष्ट्रीय सीमेवर चेकपोस्ट

बुलडाणा, दि. 30 : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्यीय सीमेवर चेक पोस्ट तयार करण्यात आली आहे. या चेकपोस्टवर मध्यप्रदेशातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर राज्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघालगत मध्य प्रदेश राज्याची हद्द असलेल्या ठिकाणी चेकपोस्ट उभारला आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यामध्ये सदर सीमेवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिस विभागाकडून हनवतखेड व निमखेडी फाटा येथे 2 चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या ठिकाणाहून नियमाबाह्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याठिकाणी येथे पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच स्थीर सर्वेक्षण पथकही कार्यान्वीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण 21 आंतरजिल्हा चेकपोस्ट, 2 आंतरराज्य चेकपोस्ट आणि 53 ठिकाणी स्थीर सर्वेक्षण पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबतची सर्वतोपरी खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. त्यानुसार 05 बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे.

00000

निवडणूक खर्च निरीक्षक अमित शर्मा यांनी घेतला आढावा

बुलडाणा, दि. 30 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय रेल्वे लेखा सेवेतील अमित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी गुरुवारी, दि. 28 मार्च रोजी आढावा घेतला.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. त्यानुसार 05 बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चावर लक्ष्य ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने अमित शर्मा यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते दि. 28 मार्च 2024 रोजी जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील खर्चविषयक कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी विविध विषयांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खर्चविषयक नोडल अधिकारी यांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई, तसेच उपाययोजनांची माहिती घेतली.

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी कपडे, दारू, तसेच पैशाची वाहतूक होऊ शकते. सोशल मिडीयावर होणारा प्रचार पाहता त्याबाबत खर्चाची नियमित माहिती माध्यम कक्षाने दैनंदिन स्वरूपात ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर निरीक्षक श्री. शर्मा यांनी जिल्हास्तरावरीय नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच लोकसभा मतदारसंघ निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानी कार्य करावे, असे निर्देश त्‍यांनी दिले.

000000

आदर्श आचारसंहितेबाबत सी-व्हीजीलवर तक्रार करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आचार संहिता कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास सी-व्हीजीलवर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हीजील ॲप विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत कार्यवाही केली जाते. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये, याविषयी निवडणुकीतील उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते, मात्र काही वेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते, त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. या सी-व्हीजील ॲप वा तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

सी-व्हीजील ॲप हे अॅन्ड्राईड आणि आयओएसवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडीओ प्रदान करणे आवश्यक आहे. अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा सुद्धा घेता येणार आहे. सी-व्हीजील ॲप हे वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरण्यात येते. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याचीही अनुमती देतो. तयेच तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो.

ॲन्ड्राईड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन मधील ॲप स्टोअर या ॲपमध्ये जाऊन सी-व्हीजील सर्च करावे. त्यानंतर ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करावे. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडावे आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडीओसह घटनेचे तपशील टाकावे. त्यानंतर तक्रार सबमिट करावी. लाइव्ह फोटो, व्हीडीओ या अॅपच्या अचूकतेसाठी अॅपमधून फक्त लाइव्ह लोकेशनवर आधारीत फोटो, व्हीडीओ घेतले जातात. जेणेकरून भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमूना वेळेत कार्यवाही करणे शक्य होते.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 घोषित केला आहे. त्यानुसार 05 बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा मतदारसंघ निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

लोकसभेसाठी जिल्ह्यातील 2 हजार 266 मतदान केंद्रावर मतदान

बुलडाणा, दि. 30 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 2 हजार 266 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 प्रसिद्ध केला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी बुलडाणा जिल्ह्यात एकुण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये एकुण 2 हजार 265 मतदान केंद्रे असून 26-खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 53 ए खामगाव ग्रामीण हे 1 सहायकारी मतदान केंद्र तयार केल्याने एकूण मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 266 झाली आहे.

            बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 05 बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 21- मलकापूर वगळता 6 मतदारसंघाचा समावेश होतो. त्यामध्ये 1 हजार 962 मतदान केंद्रे आहेत. 21- मलकापूर हा मतदारसंघ लोकसभा निवडणूकीसाठी 04-रावेर लोकसभा मतदार संघामध्ये समाविष्ठ असून त्यामध्ये 304 मतदान केंद्र आहेत.

मलकापूर विधानसभा मतदारसंघात शहरी 90, ग्रामीण 214 अशी एकूण 304, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शहरी 78, ग्रामीण 253 अशी एकूण 331, चिखली विधानसभा मतदारसंघात शहरी 49, ग्रामीण 263 अशी एकूण 312, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात शहरी 37, ग्रामीण 299 अशी एकूण 336, मेहकर विधानसभा मतदारसंघात शहरी 59, ग्रामीण 290 अशी एकूण 349, खामगाव विधानसभा मतदारसंघात शहरी 78, ग्रामीण 241 अशी एकूण 319, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात शहरी 81, ग्रामीण 234 अशी एकूण 315 असे लोकसभा मतदारसंघात शहरी 472, ग्रामीण 1 हजार 794 अशी एकूण 2 हजार 266 मतदान केंद्र राहणार आहे.

            एकूण मतदान केंद्रापैकी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विधानसभानिहाय प्रत्येकी 7 मतदान केंद्राचा समावेश राहणार आहे. या आदर्श मतदान केंद्रात महिलांचे 7, दिव्यांग 7, युवांचे 42 असे एकूण 56 आदर्श मतदान केंद्र राहणार आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 40 टक्क्यांपेक्षा कमी आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले मतदान केंद्र, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 25-मेहकर मतदारसंघातील फेरमतदान झालेले 120-डोणगाव हे मतदान केंद्र आणि 25-मेहकरमधील 78-रत्नापूर (लावणा), 27-जळगाव जामोद मधील 3-भिंगारा असे एकूण 3 क्रिटीकल मतदान केंद्र आहेत. तसेच इतर 1 हजार 139 मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, वीज आणि दिशादर्शक चिन्हे आदी आवश्यक सर्व सोईसुविधा पुरविण्यात येणार आहे.

00000



पोस्ट, बँकेमार्फत होणार मतदार जागृती

बुलडाणा, दि. 30 : आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यात पोस्ट ऑफीस, बँकाचाही सक्रिय सहभाग नोंदविला जाणार आाहे. जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील सर्व पोस्ट ऑफीस आणि बँकाच्या शाखामधून मतदार जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने गुरूवार, दि. २८ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांच्या अध्यक्षतेखाली पोस्ट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, सहाय्यक व्यवस्थापक मयूर लोणकर, पोस्टाचे अमोल वराडे उपस्थित होते.

सशक्त लोकशाहीसाठी व्यवस्थेसाठी जागरूक नागरिकांनी मिळालेल्या मताधिकारांचा नैतिक मुल्याधारित वापर करणे अभिप्रेत आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाकडून नागरिकांसाठी सुनियोजित मतदार प्रशिक्षण व निवडणूक प्रक्रीया सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यापक मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यात विविध पर्यांयाचा कल्पक वापर करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व पोस्ट आणि बँकेच्या शाखांमधून मतदार जाणीव जागृतीसाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच मतदार जागरूकता मंडळाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया व मतदार शिक्षणासाठी आवश्यक ते सहाय्य करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध टपालावर मतदानाबाबतचे महत्व अधोरेखित करणारे संदेश घरोघरी पोहचविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक वित्तीय सेवांच्या माध्यमातूनही मतदान करण्याबाबतचे संदेश देण्यात येणार आहे.

दरम्यान दि. २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सर्व सूजाण नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या उत्सवात सक्रियपणे सहभागी व्हावे व भारतीय लोकशाहीचा गौरव वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

उष्माघातापासून बचाव करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 30 : गेल्या काही दिवसांमध्ये तापमनात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उष्माघाताची लक्षणे ही उन्हाळा सुरु झाल्यानंतर उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी, ताप, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही लक्षणे दिसून येतात. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे, व्यक्तीचे कापडे सैल करावे, त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजावे, तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, बाधीत व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

उष्माघाताची प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरन्हाईटपर्यंत पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे ही लक्षणे दिसून येतात. उष्माघाताची लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे, नियमीत चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, कुठूनही रक्तस्त्राव होणे, तोंडाची त्वचा कोरडी होणे, डोळे शुष्क होणे ही लक्षणे दिसतात.

उष्माघातामुळे त्रास झाल्यास प्रथमोपचारामध्ये त्रास झालेल्या मुला, मुलींना लगेच घरात, सावलीत आणावे, संवेदनशील राहुन त्यांचे कपडे सैल, ढिले करावेत, नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात, उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत. हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा, पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेऊन त्यांना आडवे पडायला सांगावे, मुले जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत. मुल बेशूद्ध असल्यास त्यांना खायला, प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करु नये.

उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी हलके अन्न खावे, फळे आणि सलाडसारखे पचायला हलके असणारे अन्न खावे, पुरेसे पाणी प्यावे, सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. गॉगल, छत्री, टोपी, बुट, चप्पल, घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. थंड पाण्याने आंघोळ करावी, घराबाहेरील उपक्रम, मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारीता वाढवावी.

उष्माघातापासून बचावासाठी घराबाहेर जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. सुती, मैल आणि आरामदायी कपडे घालावे. भरपूर ताजे अन्न खाल्यानंतर घरातून बाहेर पडावे. घराबाहेर जाताना डोके झाका किंवा छत्रीचा वापर करावा. पाणी, ताक, ओआरएस पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, निंबुपाणी, आंबा, पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे.

उष्माघातापासून बचावासाठी रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये. उन्हात अधिकवेळ राहू नये, तिखट, मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. नेहमी पाणी सोबत ठेवावे. शरीरात पाण्याची कमतरता कमी पड्डू देवू नये. उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टीचा अवलंब करावा. संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेव्हा त्या व्यक्तीला वारा घालावा. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे, घाबरलेली अशी व्यक्ती आढळल्यास टोल क्रमांक १०८ किंवा १०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. हे टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे.

00000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सभागृह कार्यक्रमासाठी उपलब्ध

बुलडाणा, दि. 30 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या बहुऊद्देशीय सभागृह लग्न समारंभ, इतर कार्यक्रमासाठी स्वस्त दरात उपलब्ध  करून देण्यात आला आहे. याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

               जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, वीर माता, वीर पिता व नागरिकांसाठी एसटी बस स्थानकाजवळील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सैनिकी बहुऊद्देशीय सभागृह लग्न समारंभ, तसेच इतर कार्यक्रमासाठी स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. सदर सभागृहाच्या 24 तासासाठी आजी, माजी सैनिकांना 20 हजार रूपये, माजी सैनिक विधवांसाठी 15 हजार रूपये, इतर नागरिकांसाठी 25 हजार रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000




जागतिक क्षयरोग दिन साजरा

बुलडाणा, दि. 30 : जिल्हा क्षयरोग केंद्र येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रम पार पडला. यावेळी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. व्ही. खेरोडकर, डॉ. शिवदास सरोदे उपस्थित होते. डॉ. गुट्टे यांनी सन २०२५ पर्यंत क्षयरोग संपण्याकरीता आवाहन केले. डॉ. शिवदास सरोदे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पर्यवेक्षक अनिल सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवदास सरोदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी जिल्हा पीपीएम समन्वयक सिद्धेश्वर सोळंकी, जिल्हा समन्वयक आशिष वाईनदेशकर, मुकेश धेंगे, आर. व्ही. सुरडकर दीपक बाभुळकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनकर सोळंकी, एन. आर. शेख, साहेबराव आंभोरे, राजू सरोदे, पुरुषोत्तम सोळंकी, श्री. ताठे, श्री. धदर, श्री, वैष्णव, वैशाली पवार, उर्मिला जाधव, श्री. जयस्वाल. वैभव धदर, तसेच आयसीटीसी व एआरटी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

00000

आदिवासी उमेदवारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 30 : सुशिक्षित आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूरतर्फे शासनाच्या विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता विनामूल्य प्रशिक्षण देण्यात देण्यात येणार आहे. याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण कालावधी हा दि. १ एप्रिल २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा १ हजार रूपये दराने विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकाचा संच विनामूल्य देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. २७ मार्च २०२४ पर्यंत सादर करावेत.

यासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, उमेदवाराचे किमान वय १८ ते ३० वर्षे असावे, उमेदवार किमान एसएससी परीक्षा उत्तीर्ण असावा, उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलेली असावी, तसेच अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्जामध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग, जात, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, rojgar.mahaswayam.in आदी प्रती व एक पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. उपरोक्त प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी दि. २८ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मूळ कागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहावे. याबाबतची निवड यादी दि. २८ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

शेतकऱ्यांनी महाऊर्जेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 30 : महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी अवैध फसव्या संकेतस्थळापासून किंवा इतर माध्यमांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाने केले आहे.

महाऊर्जामार्फत महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येते. याकरीता सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठवला जातो. सदर योजना राबविण्याकरीता महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी याच संकेतस्थळांचा उपयोग नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्याकरीता करावा.

लाभार्थ्यांनी kusum.mahaurja.com याव्यतिरिक्त महाऊर्जातर्फे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत. सद्यःस्थितीत वेगवेगळ्या बनावट वेबसाईट, सोशल मिडीया प्लॅटफार्म इत्यादींमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचे, तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा खोटे, फसवे संकेतस्थळ, फसवे दुरध्वनी, भ्रमणध्वनीचे संभाषण, आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. अशा संकेतस्थळ, अॅपवर कोणत्याही पद्धतीने पैशाचा भरणा करूं नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कार्यालय, महाऊर्जा, अकोला दुरध्वनी क्र. ०७२४-२४५२३११ व domedaakola@mahaurja.com वर संपर्क साधावा, तसेच विभागीय कार्यालय, महाऊर्जा, अमरावती दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१६१० व domedaamravati@mahaurj.com वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

प्रादेशिक परिवहन 31 मार्चला कर वसुली करणार

बुलडाणा, दि‍. 30 : नवीन वाहन नोंदणी व करवसुलीचे कामकाजाद्वारे प्रादेशिक परिवहन विषयक कामकाज, थकीत कर वसुली व खटला विभाग महसुल जमा होणारे कामकाज सुरु ठेवण्यात आले आहे. त्यानुसार वाहनधारकांना दि. 31 मार्च 2024 रोजी सुट्टीच्या दिवशी महसूली कर जमा करता येणार आहे. याची नागरिकांनी नोद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

00000




मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात ९६५ व्होटर अवेयरनेस फोरम

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सशक्त मतदार काळाची गरज

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि‍. 30 : लोकशाही केंद्रीत राजकीय व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी निष्पक्ष, भयमुक्त व शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी नैतिक मुल्याधारीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांना सशक्त मतदार म्हणून घडविण्यासाठी सहाय्यकारी ठरण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभाग व अधिनस्थ कार्यालयामधून ९६५ मतदार जागरूकता मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या 'सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग' या प्रमुख कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्वपूर्ण ठरणार आहे. व्होटर अवेयरनेस फोरम ही निवडणूक प्रक्रियेच्या आधारावर चर्चा आणि जागरूकता व्यक्त करण्यासाठी साधनांचे व्यवस्थापन, मतदार नोंदणी व मतदान कसे, काय आणि कुठे करायचे आदी बाबतीत मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणारे महत्वपूर्ण माध्यम ठरू शकते, यासाठी फोरमची स्थापना करण्यात आली आहे.

            यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे प्रमुख हे या फोरमचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहेत. त्याच विभागातील अधिनस्थ् कार्यालयांसाठी सेवाजेष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये त्या विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व नियमीत व करारत्वावरील कर्मचारी हे सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. नोडल म्हणून निवडणूक कर्तव्याचा अनुभव असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिकता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत एकूण ९६५ मंच स्थापन करण्यात आले आहे. यासाठी ७९६ नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सर्व विभागप्रमुखांनी मतदार जाणीव जागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवून आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने या लोकशाही उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्स्फूर्तपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

0000


No comments:

Post a Comment