Monday 11 March 2024

DIO BULDANA NEWS 09.03.2024

 जिल्हा वार्षिक योजनेतून किमान कौशल्य विकास प्रशिक्षण

*दिव्यांगाकरीता 43 सक्षम राखीव
*प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. ९ : जिल्हा वार्षिक योजनेतून किमान कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी एकूण 850 जागांवर प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यापैकी 43 सक्षम दिव्यांगाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
या प्रशिक्षण अभ्यासक्रमात आदर्श शिक्षण व क्रिडा बहुउद्देशीय संस्था, देऊळघाटतर्फे शिवणकला, फिल्ड टेक्निशियन होम अप्लायन्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, स्किल ट्रेनिंग सेंटर सिंदखेडराजा तर्फे मेकअप आर्टिस्ट, सोशल मीडिया एक्झिक्यूटिव्ह, टूर गाईड, गेस्ट सर्विस एक्झिक्यूटिव्ह, ऑरगॅनिक ग्रोवर, डेरी फार्मर, शिवणकला, शिवांश टेक्नीकल इन्स्टिट्यूट बुलढाणा तर्फे मशरूम ग्रोवर, धन्वंतरी बहुउद्देशीय संस्था, देऊळगाव राजातर्फेडाटा एन्ट्री ऑपरेटर, गेस्ट सर्विस एक्झिक्यूटिव्ह, स्वामी टेक्निकल इन्स्टिट्यूट शिक्षण केंद्र सिंदखेडराजातर्फे शिवणकला, गेस्ट सर्विस एक्झिक्युटिव्ह, ठाकरे स्किल डेव्हलपमेंट सेंटर नांदुरा तर्फे आयटी कॉर्डिनेटर, शिवणकाम, भालचंद्र महाराज कौशल्य विकास संस्था गोलखेड शेगावतर्फे डाटा एन्ट्री ऑपरेटर, ब्रॉडबँड टेक्निशियन हँडसेट आणि टॅब्लेट टेक्निशियन, शिवणकाम, स्व.दयासागरजी महाले कौशल्य विकास संस्था, उदयनगर तर्फे डाटा एन्ट्री ऑपरेटर आयटी कोऑर्डिनेटर ब्युटी थेरपिस्ट प्लंबर सोलर पॅनल टेक्निशियन, स्व. कुंडलीकराव शेरे टेक्नीकल इंन्स्टिटयुट दुसरबीड तर्फे मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आयडी कॉर्डिनेटर हाउसकीपिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात बुलढाणा येथे शिवणकाम डाटा एन्ट्री ऑपरेटर, मोताळा येथे शिवणकाम, संग्रामपूर येथे डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, खामगांव येथे रुरल मिशन फिल्ड टेक्निशियन होम अप्लायन्सेस चिखली येथे डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, मॅन्युअल मेटल वेल्डिंग, शिल्ड मेटल वेल्डिंग, फिल्ड टेक्निशियन होम अप्लायन्सेस, देऊळगांव राजा येथे शिवणकाम, ब्युटी थेरपिस्टच्या कौशल्य प्रशिक्षणास प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा सक्षम दिव्यांगानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
000000
जिल्हा युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. ९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जिल्ह्यातील युवक, संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, तसेच युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यासाठी परिपुर्ण प्रस्ताव दि. 28 मार्च 2024 पर्यंत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थांना देण्यात येतो. पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी अर्ज प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह, तसेच युवक-युवतीचे पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलिस चारित्र्य प्रमाणपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव दि. 28 मार्च 2024 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावा. 
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
000000
बुलडाणा येथे बुधवारी डाक अदालत
बुलडाणा, दि. ९ : बुलडाणा येथील डाक घर अधीक्षक कार्यालयात बुधवार, दि. 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. 
देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाष, पत्रव्यवहार किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार होते. या तक्रारींचा योग्यप्रकारे निवडा करण्यासाठी डाक अदालत घेण्यात येते. त्यात पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडवितात. 
पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यांच्या आत तक्रारींचे निवारण  झालेले नसल्यास किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास अशा तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तु पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. यासाठी तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. यात तारीख, ज्या अधिकार्‍यास मूळ तक्रार पाठविली असल्यास त्याचे नाव व हुद्दा याची माहिती देण्यात यावी. डाक सेवेबाबत तक्रार असल्यास गणेश आंभोरे, अधीक्षक डाक घर, बुलडाणा विभाग, बुलडाणा 443001 यांच्या नावे दोन प्रती सह दि. 11 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील असे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
महिला दिनी लेक लाडकी अभियानाचा शुभारंभ
बुलडाणा, दि. ९ : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी, विशाल नरवाडे यांच्या हस्ते फीत कापून अभियानाची सुरुवात करण्यात आले. 
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद ऐंडोले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पिंपळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात लेक लाडकी योजनेच्या बॅनरचे श्री. नरवाडे यांचे हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आले. तसेच महिलांच्या मोटर सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा परिषदेच्या गेट पासून सुरुवात होऊन जय स्तंभ चौक, कारंजा चौक, भोडे चौक, तहसिल कार्यालय, संगम चौक, जय स्तंभ चौक या मार्गाने निघून परत जिल्हा परिषद येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये लेक लाडकी योजनेची प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी फलकातून संदेश दिला.
00000
नेहरु युवा केंद्राची जिल्हास्तरीय युवा संसद उत्साहात
बुलडाणा, दि. ९ : नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम गुरुवारी, दि. 7 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडला.

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपविभागीय पोलिस अधिक्षक सुधीर पाटील,  नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास बाहेकर, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. मानकर उपस्थित होते.
श्री. नरवाडे यांनी, युवकांसाठी स्मार्टफोन सायलंट किलर आहे. त्यामुळे यापासून अंतर ठेवावे. तसेच सुज्ञ नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ.विकास बाहेकर आणि प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांची भाषणे झाली. जिजामाता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिरुप युवा संसदेचे सादरीकरण केले. मतदार जागृतीबाबत शिवाजी काटे, आई रेणूका लोककला संच मेहकर व एएसपीएम आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी पथनाट्य सादर केले. मतदार जागृती पोस्टरचे विमोचन करण्यात आले.   युवा संसद भाषण स्पर्धेतील प्रथम श्रुती तायडे, व्दितीय ऋतुजा इंगळे यांना गौरविण्यात आले.
जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी प्रास्ताविक केले. रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले.अजयसिंग राजपूत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, विलास सोनोने, सुमित वाकोडे, देवानंद नागरे, उमेश बावस्कर, शीतल मुंढे, सुरज बोरसे यांनी पुढाकार घेतला.
0000000

सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर
*जिल्ह्यातील तीन संस्था, चार व्यक्तींचा समावेश
बुलडाणा, दि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्यातील तीन संस्था आणि चार व्यक्तींचा समावेश आहे. सदर पुरस्कारांचे वितरण दि. 11 ते 14 मार्च या कालावधीत मुंबई येथे होणार आहे.
सन 2019-20 ते सन 2022-23 या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व संत रविदास पुरस्कार जाहिर झाले आहेत.
सदर पुरस्कारांमध्ये जिल्ह्यांतून सन 2021-22 च्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी निता हिवाळे, लता प्रमोद हिवाळे यांच्या पैनगंगा बहुद्देशिय शैक्षणिक संस्था, नांद्राकोळी, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिकासाठी निवृत्ती जाधव, उज्वला जाधव यांच्या संजिवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, केळवद, सन 2020-21 च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कारासाठी रमेश वानखेडे, गणेश वानखेडे यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था, सुंदरखेड यांची निवड करण्यात आली.
सन 2021-22 च्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी अशोक तायडे, रा. म्हाडा कॉलनी, शेगाव, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी सन 2019-20 चा प्रताप निदाने, रा. वाल्मीकीनगर, खामगाव
सन 2020-21 चा दामोधर बिडवे, रा. बुलडाणा,
सन 2021.22 चा गणेश वानखेडे, रा. बुलडाणा यांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त संस्था आणि व्यक्तींचे समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी स्वागत केले आहे.
000000

No comments:

Post a Comment