Monday 11 March 2024

DIO BULDANA NEWS 10.03.2024

 जिल्ह्यात गुंतवणूकीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*गुंतवणूकदारांना जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य
बुलडाणा, दि. ११ : जिल्ह्यात उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यास पूरक वातावरण आहे. तसेच जिल्ह्यात असलेल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणे, गुंतवणूक वाढवावी, तसेच नवनवीन उद्योग व्यवसाय जिल्ह्यामध्ये येऊन त्याद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मंगळवार, दि. 12 मार्च रोजी रेसिडेन्सी क्लब येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे या परिषदेच्या माध्यमातून इच्छुक गुंतवणूकदारांसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांना आवश्यक सोयी सुविधा आणि परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व प्रकारच्या मान्यता एकाच ठिकाणी, एकाच वेळेला, एकाच टप्प्यामध्ये सुलभ पद्धतीने देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. त्यामुळे या ठिकाणी कृषीमालावर प्रक्रिया, तसेच जिल्ह्यात दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू उद्योगाला वाव आहे. जिल्ह्यात केमिकल उद्योग आहे. या उद्योगातही विकासाला संधी आहे.
जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे औरंगाबाद, जालना, अकोला ही शहरे जवळ आहे. अशा या भौगोलिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठिकाणी असलेल्या जिल्ह्यामध्ये इच्छुक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे यावे. त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. उद्योग सुरू करण्यासाठी अन्य ठिकाणी जागेचा शोध घेत असलेल्या उद्योजकांनी जिल्ह्यात गुंतवणूक करावी. त्यांना जागा उपलब्ध आणि सर्व विविध परवानगी देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. गुंतवणूकदारांनी या जिल्हा गुंतवणूक परिषदेकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
०००००
बुलडाणा येथे मंगळवारी जिल्हा गुंतवणूकदार परिषद
* गुंतवणूकदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. ११ : उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बुलडाणा जिल्हा गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लबच्या न्यू हॉल येथे ही परिषद होणार आहे.
जिल्ह्यात विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, विकासाला चालना देणे आणि राज्यातील जिल्ह्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. तसेच खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, डॉ.राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकाडे यांच्यासह उद्योग विकास आयुक्त, मैत्रीचे अध्यक्ष आणि निर्यात आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment