Tuesday 12 March 2024

DIO BULDANA NEWS 12.03.2024






 गुंतवणूक परिषदेत 1150 कोटींचे सामंजस्य करार

उद्योगासाठी जिल्ह्यात तात्काळ सिंगल विंडो सुरू करणार

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 12 : जिल्हा गुंतवणूक परिषदेत 45 उद्योजकांनी 1 हजार 150 कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण आहेत. विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात सिंगल विंडो प्रणाली सुरूवात करण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.

आज जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी उद्योजक राधेश्याम चांडक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, औद्योगिक परिसरात जागा देण्यापासून उत्पादनाचे मार्केटींग आणि ब्रँडींगसाठी राज्य शासनाकडून मदत देण्यात येत आहे. जिल्ह्यात सुपीक जमीन असून प्रामुख्याने कृषि आधारीत उद्योग उभारण्यास संधी आहे. कृषि उत्पादनांबाबत मुल्यवर्धन साखळी निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. जिल्हा पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास ही उत्पादने जागतिकस्तरावरही जातील. जिल्ह्यातील बचतगटांसाठी राजमाता या ब्रँडची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे याला वैश्विक ओळख मिळण्यास मदत होईल.

कोणतेही उत्पादन ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी पॅकेजिंग, ब्रँडींग, पोषक तत्वे, किफायतशिर किंमती हे सर्व घटक महत्वाचे आहे. जिल्ह्यातून गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्यात होत आहे. गेल्या वर्षी सुमारे 750 कोटी रूपयांची उत्पादनांची निर्यात झाली. उद्योग उभारणी आणि निर्यातक्षम उद्योग उभारणीसाठी नवउद्योजकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात समृद्धी महामार्ग, शक्तीपिठ जोडणारा मार्ग यामुळे उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू दूरच्या ठिकाणावर कमी वेळेत पोहोचणे शक्य झाले आहे. वाहतूक क्षेत्रातील उद्योजकांनी या पायाभूत सुविधांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात जागतिक किर्तीची पर्यटन स्थळे आहेत. या क्षेत्रात उद्योगांना मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यटन सर्कीट निर्माण झाल्यास यातून जिल्ह्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योजकांसाठी 22 प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. यातील अनुदान, मदत, कर्ज परतफेड, व्याज सवलती आदी योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील आठ औद्योगिक क्षेत्रात 1 हजार 181 उद्योजकांना जमिनी वाटप करण्यात आल्या आहेत. जागा घेताना उद्योजकांनी गांभिर्यपूर्वक उद्योग सुरू करावे. घेतलेले कर्ज परतफेड होईल, याची दक्षता घ्यावी. उद्योग विकासाला पूरक वातावरण होण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन करण्यात यावे. यातून उद्योजकांना फायदा होण्यास मदत मिळेल.

परिषदेत श्री. चांडक यांनी उद्योजकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या. श्री. पोटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती दिली. श्री. इंगळे यांनी बचतगटांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. इश्वेद बायोटेकचे संजय वायळ यांनी उद्योगाविषयी माहिती दिली. सुनील पाटील यांनी उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

0000000



दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणास सुरुवात

बुलडाणा, दि‍. 12 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बुलढाणाच्या वतीने दहा दिवसीय मोफत दुग्ध व्यवसाय आणि गांडूळ खत निर्मिती विषयाच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली.

या प्रशिक्षणात 35 प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसायिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे्. तसेच मार्केटिंग कशी करावी याबाबत माहिती देण्यात येणार आहे. यासाठी दुग्ध व्यवसाय विषयतज्‍ज्ञ डॉ. महेश्वर गुंड यांची निवड करण्यात आलेली आहे. सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागातील 18 ते 44 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 12 : जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर, सुरज खोडके, शिला पाल, श्रीमती मनवर आदी उपस्थित होते

00000

No comments:

Post a Comment