Friday 15 March 2024

DIO BULDANA NEWS 15.03.2024

 जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*उद्योग केंद्रात मैत्री कक्षाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 15 : जिल्ह्यात विविधांगी पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटन ठिकाणी योग्य सुविधा मिळाल्यास जिल्ह्यात पर्यटन उद्योगास चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

आज जिल्हा उद्योग केंद्रातील मैत्री कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योजक राधेश्याम चांडक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, ज्ञानगंगा, आंबाबरवा यासारखी पर्यटन स्थळे आहेत. मात्र याचा विकास झालेला नसल्याने याठिकाणी पर्यटकांचा ओढा दिसून येत नाही. याठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्यास पर्यटक या ठिकाणांकडे आकर्षित होतील. शेगाव येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी आंबाबरवा आणि ज्ञानगंगा ही एका दिवसाची सहल आयोजित करणे शक्य आहे. लोणार हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी संशोधनासाठी येणाऱ्यांना योग्य सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.

सिंदखेड राजा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातील विकासकामांसाठी 260 कोटी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी वीजेची कामे करण्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच जिजाऊसृष्टी येथे अत्यावश्यक सुविधांसाठी 50 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. लोणारसाठी 370 कोटी मंजूर करण्यात आले आहे. लोणार सरोवराला वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्व असल्याने यातून उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. प्रामुख्याने लोणार येथे संशोधनासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करण्यात येतील.

जिल्ह्यातील औद्योगिक परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. खामगाव येथे 170 हेक्टर, मोताळा,, देऊळगाव येथे नव्याने जागा एमआयडीसीसाठी घेण्यात येणार आहे. उद्योजकांनी येणाऱ्या अडचणी एकत्रितरित्या सादर कराव्यात. यावर करण्यात येणाऱ्या उपायययोजनाही सूचवाव्यात. उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली.

000000

No comments:

Post a Comment