Wednesday 6 March 2024

DIO BULDANA NEWS 06.03.2024

 




मतमोजणीच्या ठिकाणी काटेकोर नियोजन करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 6 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. त्यानुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी मतमोजणीची व्यवस्था, स्ट्रॉंगरूम आदी परिसराची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतमोजणी होणाऱ्या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी याठिकाणी मतमोजणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. मतमोजणीच्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी, मतमोजणी करणारे कर्मचारी तसेच मतमोजणीच्या ठिकाणी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आसन व्यवस्था, तसेच अनुषंगिक बाबीची माहिती घेतली.

मतदानानंतर ईव्हीएम औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी असणारी व्यवस्था, सुरक्षितता याबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पुरेशी विजेची व्यवस्था करण्यात यावी. या परिसराची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली. त्यांच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणाऱ्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मतमोजणीच्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्ग असणार आहे. त्यांच्यासाठी पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी नागरिक मतमोजणीच्या ठिकाणी येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांना निकाल माहिती व्हावा, यासाठी उद्घोषणेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच कर्मचारी आणि नागरिकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही डॉ. पाटील यांनी दिल्या.

00000

No comments:

Post a Comment