Friday 1 March 2024

DIO BULDANA NEWS 01.03.2024

 























विशेष पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार

-खासदार प्रतापराव जाधव

*एकाचवेळी सहा पोस्ट कव्हरचे अनावरण

बुलडाणा, दि. 1 : जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध स्थळे आहेत. मात्र या स्थळांचा विकास करून प्रचार-प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन डाक विभागामार्फत विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित केले आहे. या पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्यातील सहा पर्यटनस्थळांची माहिती जगभरात होणार आहे. यातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्थळांवरील सहा विशेष पोस्ट कव्हरचे अनावरण पार पडले. यावेळी पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते.

खासदार श्री. जाधव म्हणाले, पोस्ट विभागाने नाविण्यपूर्ण योजना राबवून आणि इतर विभागांची साथ घेऊन कात टाकली आहे. गाव पातळीपर्यंत पोस्ट बँक पोहोचलेली आहे. तसेच विशेष डाक तिकीट आणि विशेष पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती जगभरात होण्यास मदत मिळेल. एकाचवेळी सहा पोस्ट कव्हरचे अनावरण हा प्रसंग पहिल्यांदाच घडून आला आहे. यानिमित्ताने सहा पर्यटनस्थळे आणि इतरही ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होईल. त्यामुळे पोस्ट विभागाने याकामी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती मधाळे यांनी पोस्ट विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. फिलाटेलीच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांवर स्पेशल पोस्ट कव्हर प्रकाशित करण्यात येत आहे. यामुळे या स्थळांची माहिती जगभरात होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने इतरही ठिकाणे आहेत, याची माहिती फिलाटेलीच्या माध्यमातून समोर यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. या पर्यटनस्थळांची माहिती राज्यात इतर ठिकाणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात अनेक ‍ठिकाणे ही पर्यटनदृष्ट्या महत्वाची आहेत. त्यांची माहिती झाल्यास याठिकाणी पर्यटक येऊन जिल्ह्यातील पर्यटनास वाव मिळेल. जिल्ह्यातील शेगाव विकास आराखडा पूर्णत्वास आला आहे. लोणार आणि सिंदखेड राजा विकास आराखडा तयार करण्यात आला असून विकासकामांना सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांगसुंदर पर्यटनस्थळे तयार होण्यास मदत होईल. तसेच लोणार सरोवर हे जागतिक वारसास्थळाच्या यादीत यावे, यासाठी प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी प्रास्ताविकातून राजमाता माँ जिजाऊसाहेब, लोणार सरोवर, दैत्यसूदन मंदिर, कमलजा देवी मंदिर, संत श्री गजानन महाराज मंदिर, आंबाबरवा अभयारण्य या पर्यटनस्थळांवर विशेष पोस्ट कव्हर तयार करण्यात आल्याचे सांगितले. डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी आभार मानले.

000000

क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

        बुलडाणा, दि. 1 : माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त संपादन केलेले, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेले, सहभागी झालेले खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येते. त्यानुसार संबंधीत शाळा, खेळाडूंनी दि. 20 मार्च 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव, विहीत नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, संबंधित खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ ई, तसेच विविधस्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन, सहभागी असल्यास, राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर असे क्रमवार प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. प्रत्येक पृष्ठ मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.

सेवा हमी कायद्यानुसार ग्रेस गुण देण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सिस्टीम schooleducation.mahaonline.gov.in कार्यरत आहे. राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेले, सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण सदरच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी, खेळाडूंनी प्रथम नोंदणी करुन क्रीडागुण सवलतीचा अर्ज, परिक्षेचे हॉल तिकीट आणि खेळाचे प्रमाणपत्र यासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. सदरच्या प्रस्तावाची हार्डकॉपी 2 प्रतीमध्ये सादर करावी लागणार आहे. क्रीडा स्पर्धा एकविध खेळ संघटनांद्वारे आयोजित केले असल्यास संघटना परिशिष्ट-10 सोबत, विहित नमुन्यात अर्ज, हॉल तिकीट, मान्यताप्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ठ-ई आदीसह संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे लागणार आहे.

एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे अहवाल dsobld@gmail.com या ई-मेलवर पाठवावे लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000 

No comments:

Post a Comment