Tuesday 5 March 2024

DIO BULDANA NEWS 05.03.2024

 प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी सर्वेक्षण

बुलडाणा, दि. 5 : डाक विभागामार्फत प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी  सर्वेक्षण करण्याची सुविधा जिल्ह्यात पोस्टमनमार्फत करण्यात आली आहे.

यासाठी घरमालकाकडे वीज देयक आणि सोलर पॅनल लावण्यासाठी योग्य अशी जागा, छत आवश्यक आहे. नागरिकांनी सदर माहिती पोस्टमनला दिल्यानंतर ही माहिती केंद्र शासनाकडे योग्य कार्यवाहीस्तव मोबाईलमधून पोहचविण्याचे काम डाक विभाग करणार आहे. नागरिकांनी डाक विभागाच्या सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 5 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण की परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते. या योजनेतील विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाविद्यालयस्तरावरून निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष आणि नूतनीकरणाचे अर्ज नोंदणी करण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष आणि नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी योजनांचे अर्ज mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. परंतु सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 8 हजार 461 अर्ज आजमितीस भरण्यात आले आहे. महाडिबीटी प्रणालीवर सन 2023-24 करिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन 5 महिने होऊन संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे.

महाविद्यालयस्तरावर असलेले अर्ज तपासणी करुन महाविद्यालयांनी या कार्यालयास ऑनलाईन पाठविणे आवश्यक आहे. महाडीबीटी डॅशबोर्डचे अवलोकन केले असता सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती  90 अर्ज, श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव 60 अर्ज,, डॉ. राजेंद्र गोडे नर्सिंग स्कूल, शेगाव 53 अर्ज, पद्श्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर 52 अर्ज प्रलंबित आहे.

000000

सैलानी यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 5 : सैलानी येथे येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीकोना ट्रस्ट आणि प्रशासनाने कार्य करावे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि सुरक्षा आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सैलानी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सरीता पवार यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर्गा, संदल, मुख्य रस्ता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. पोलिसांचे 35 आणि ट्रस्टचे 25 कॅमेऱ्याचे नियंत्रण एकाच कक्षातून करण्यात यावे. तसेच या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. तसेच याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मुबलक पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी व्यवस्था करण्यात यावी. जवळच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करावेत. या पाण्याचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्यास सदर टॅंकर हे स्वच्छ आणि सुस्थितीतील असावेत.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. तसेच नागरिकांनी शौचालय आणि स्नानगृहाचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. दर्ग्याजवळ करण्यात येणाऱ्या बळीसाठी दुसरी जागा देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्ग्याजवळ अशा प्रकारांना परवानगी देण्यात येऊ नये. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घो‍षित करावा. यात्रेदरम्यान होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

00000

मोबाईल सेवा पुरवठादारांनी निवडणुकीत दक्षता बाळगावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 5 : निवडणूक काळात निवडणुकीशी संबंधित बहुतांश कामे ऑनलाईन झाली आहेत. यासाठी अखंडीत इंटरनेट सेवा सुरू राहणे गरजेचे आहे, तसेच निवडणुकीतील उमेदवारांकडून बल्क एसएमएस पाठविण्यात येतात, याबाबत मोबाईल सेवा पुरवठादारांनी निवडणूक काळात दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोबाईल सेवा पुरवठादारांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपस्थित होत्या.

            जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, निवडणूक कालावधीत बल्क एसएमएस मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येतात. यावर नियंत्रण करण्यात यावे. बल्क एसएमएस हे निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर पाठविता येत नसल्याचे सांगितले. तसेच फेक न्यूजवर आळा घालणे आवश्यक आहे. निवडणुकीत उमेदवारांचे सोशल मिडीयावर पेज असते. यावर प्रसारीत करण्यात येणारा मजकूर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच प्रचारासाठी बल्क एसएमएस जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक काळात लहान मुलांचा उपयोग, निवडणूक प्रक्रियेशी खोट्या बातम्यांबाबत सजग रहावे, असे सांगितले.

            निवडणुकीशी संबंधित विविध कामे ऑनलाईन करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरणे, विविध ॲप, परवानगी आदींसाठी सुरळीत इंटरनेट असणे आवश्यक आहे. निवडणुकीतील नामांकन अर्ज दाखल करणे आणि मतमोजणी या दिवशी इंटरनेटची सुविधा सुरळीत राहण्यासाठी मोबाईल सेवा पुरवठादारांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

000000

No comments:

Post a Comment