Thursday 28 March 2024

DIO BULDANA NEWS 28.03.2024

 







नामांकनाच्या पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल

बुलडाणा, दि. 28 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. संजय गायकवाड यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 27 जणांनी 67 अर्जाची उचल केली. यातील संजय रामभाऊ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उमेदवारांना कोरे नामांकन पत्र देणे, अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत वेळ असला तरी वेळेवर धावपळ टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेच्या आत अर्ज दाखल करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000




जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी बूथ जागरूकता समूह

बुलडाणा, दि. २८ : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा आणि मतदार जाणीव जागृतीसाठी संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व २ हजार २६५ मतदान केंद्रावर बूथ जागरूकता समूहांची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून जिल्हा प्रशासन सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक प्रक्रिया सहभाग कार्यक्रम राबविणार आहे.

लोकशाहीचा उत्सव समजली जाणारी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दि. 26 एप्रिल 2024 रोजी होत आहे. त्यादृष्टीने लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क बजावणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती  निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून व्यापक व महत्वाकांक्षी मतदार जाणीव जागृतीविषयक कार्यक्रम राबविला जाणार आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार शिक्षण व निवडणूक प्रक्रिया सहभाग कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४७० शहरी आणि १ हजार ७९५ ग्रामीण अशा एकूण २ हजार २६५ मतदान केंद्रावर बूथ जागरूकता समूह कार्यान्वीत करण्यात आले आहे. मतदान केंद्रासाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समूहाचे संयोजक असणार आहे. मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक ते सहकार्य करणे, मतदारांमध्ये जाणीव जागृती करणे, महिला व दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढविणे अशा विविध उद्देशाने मतदान केंद्र परिसरातील मतदारांसाठी सुलभक म्हणून हा समूह कार्य करणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रासाठी बूथ जागृकता समूह स्थापन करण्यात आले आहे. यामुळे भयमुक्त व शांततापूर्ण रितीने जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी या समूहानी मतदारांना सहकार्य करावे आणि जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे.

000000

पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मंजुर

बुलडाणा, दि‍. 28 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. बोथा, ता. मेहकर येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बोथा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी कळविले आहे.   

00000





राज्य उत्पादन शुल्कची अवैध मद्य विक्रीवर कार्यवाही सुरूच

बुलडाणा, दि‍. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीवर कार्यवाही सुरू केली आहे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात आतापर्यंत 42 गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कालावधीमध्ये दि. 16 मार्च ते दि. 27 मार्च कालावधीत विशेष मोहिम राबवून 42 गुन्हे नोंदविण्यात आले. यात 42 वारस गुन्हे नोंदवून 43 आरोपींना अटक केली आहे. तसेच 2 वाहनासह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य 119.61 लिटर, विदेशी मद्य 19.44 लिटर, रसायन सडवा 6979 लिटर, हातभट्टी 527 लिटर. बिअर 7.8 लिटर जप्त केले आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या खामगाव पथकाने दि. 26 मार्च 2024 रोजी सुनगाव शिवार, ता. जळगाव जामोद येथे दारुबंदी अधिनियमांतर्गत छापा घातला. यात हातभट्टी निर्मितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर छाप्यामध्ये 130 लिटर हातभट्टी, मोहा सोडवा 1200 लिटर, प्लास्टिक नळ्या 6 नग, पंधरा लिटर क्षमतेचे पतरी डबे 86 नग, जर्मन चरव्या 6 नग, 20 लिटर क्षमतेचे जार 5 नग, 10 लिटर क्षमतेचे 3 कॅन असा 59 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राजू नथ्थू बोबडे वय 55 आणि प्रशांत रत्नाकर राऊत, दोघेही रा. सुनगाव ता. खामगाव यांना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक व्ही. एम. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. के. फुसे, दुय्यम निरीक्षक डी. ओ. कुटेमाटे, जवान अमोल सोळंकी, गणेश मोरे, संजय जाधव यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा तपास निरीक्षक व्ही. एम. पाटील करीत आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून बंद पडलेले गोडाऊन, मंगल कार्यालये, हातभट्टी निर्मिती आणि जागा मालक, हातभट्टी विक्री, अवैध ताडी निर्मिती विक्री जागामालक, धाबे हॉटेल जागामालक, गुऱ्हाळ चालविणारे, रिकाम्या बाटल्या आणि पृष्ठांचे व्यावसायिक, ट्रॅव्हल्स, बस व्यावसायीक, केमिकल व्यापारी यांना एकूण 360 नोटिस बजावण्यात आली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने सीमा तपासणी नाक्यावर निमखेडी आणि हनवतखेड, ता. जळगाव जामोद येथे या विभागाकडुन तात्पुरते चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग, तसेच विविध जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स यांची वेळोवळी भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉटअॅप नंबर 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment