Thursday 14 March 2024

DIO BULDANA NEWS 14.03.2024

 आज जिल्हा उद्योग केंद्रात मैत्री कक्षाचे उद्घाटन

*सिंगल विंडो प्रणालीमुळे उद्योजकांना मदत

बुलडाणा, दि. 14 : जिल्ह्यातील उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक वाढावी, तसेच गुंतवणूकदारांना मदत होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात मैत्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि उद्योजक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 15 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

जिल्ह्यातील उद्योग विकासाला हातभार लावण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे आणि गुंतवणूकदार, व्यवसायांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता मैत्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत श्री. चांडक यांनी जिल्ह्यामध्ये उद्योजकांच्या सोयीसाठी एकल खिडकी योजनेंतर्गत मैत्री कक्ष स्थापन करावी, अशी मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामध्ये मैत्री कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मैत्री कक्ष समवेत निर्यात कक्ष, एक जिल्हा एक उत्पादन कक्ष, सीएमईजी कक्ष कार्यान्वीत करण्यात येणार आहे. यावेळी उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले आहे.

000000




ग्रंथांनी पिढ्या घडविल्या, हेच ग्रंथांचे महत्व

-आमदार संजय गायकवाड

*दोन दिवसीय ग्रंथोत्सवास सुरूवात

* ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन

बुलडाणा, दि. 13 : आपल्यात वाचन संस्कृती चांगली रुजली आहे. गेल्या काळात ग्रंथांनी पिढ्या घडविल्या, हेच ग्रंथांचे महत्व आहे, असे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. गर्दे वाचनालयाच्या सभागृहातील दि. 14 आणि 15 मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटन समारंभाला गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ शर्मा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ओमसिंग राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, अनिल बाविस्कर, उदय देशपांडे, प्रा. डॉ. की. वां. वाघ, डॉ. राजेंद्र गणगे, साहित्यिक सुरेश साबळे, नेमीनाथ सातपुते, अजय बिल्लारी, अनंत सातव, विष्णू इंगळे, निशिकांत ढवळे आदी उपस्थित होते.

आमदार श्री. गायकवाड यांनी, ग्रंथांनी ज्याप्रकारे पिढ्या घडविल्या, तशाच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान दिले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रंथांना अनन्यसाधारण महत्व आहे. अशा या महत्वाच्या दुव्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्‍न करण्यात येत असून येत्या काळात विकासात्मक कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान सकाळी हुतात्मा स्मारकापासून गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पंजाबराव गायकवाड उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन केले. धनंजय मऱ्हे यांनी आभार मानले.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 15 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता वाचन संस्कृतीमध्ये समाजमाध्यमांची भूमिका विषयावर व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत बर्दे, राजेंद्र काळे, लक्ष्मीकांत बगाडे, अरुण जैन, नितीन शिरसाट, सुभाष लहाने, निलेश जोशी, अजय बिलारी, वसिम शेख, गजानन धांडे, रणजितसिंग राजपूत, रफिक कुरेशी सहभागी होतील. दुपारी 12.30 वाजता सार्वजनिक ग्रंथालयांचे सामाजिक योगदान या विषयावर प्रा. कि. वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, सुनिल वायाळ, डॉ. राजेंद्र गणगे, सुनील झोरे, अनंत सातव, निशिकांत ढवळे, महेंद्र बोर्डे उपस्थित राहतील.

नागरिकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.

00000

मंगळवारी महिला लोकशाही दिन

बुलडाणा, दि. 14 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. मार्च महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार मार्च 2024 मधील तिसरा सोमवार हा दि. 18 मार्च असल्याने या दिवश महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.

00000




मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन

खामगाव, दि. 14 : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज गुरुवारी, दि. 14 मार्च रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

श्रींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या वतीने श्री. पाटील यांचे स्वागत शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आकाश फुंडकर, संतोष तराळे, संस्थानचे विश्वस्त हरीहर दादासाहेब पाटील, तसेच सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनानंतर श्री. पाटील अकोलाकडे रवाना झाले.

00000

 


No comments:

Post a Comment