Wednesday 27 March 2024

DIO BULDANA NEWS 27.03.2024




 बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून प्रक्रियेला सुरवात

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 27 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रक्रिया गुरूवार, दि. 28 मार्चपासून सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नामांकन अर्ज दाखल करणे ते मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्विकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रूपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे. उमेदवार आणि नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा ॲप, सी-व्हीजील, व्होटर हेल्पलाईन तसेच 18002330586, 07262-295002 टोल फ्री क्रमांक जाहिर करण्यात आले आहे. यावर येणाऱ्या तक्रारींचे निरसन होणार आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 16 हजार 681 दिव्यांग आणि 85 वर्षावरील 29 हजार 998 उमेदवार आहेत. या मतदारांशी संपर्क साधण्यात आला आहे. मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यास सक्षम नसलेल्या मतदारांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. मतदानासाठी महिला आणि पुरूषांची वेगळी रांग राहणार आहे.

निवडणूक निर्भय आणि न्याय वातावरणात होण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दोन आंतरराज्य तपासणी नाके, 29 जिल्ह्यांतर्गत तपासणी नाके स्थापन करण्यात आली आहे. सदर भरारी पथके विधानसभानिहाय कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यात 552 जणांनी शस्त्र घेतलेली आहेत. निवडणूक काळात बँक, संस्था, ज्वेलर्स, पेट्रोलपंप इत्यादी वगळता सर्वांची शस्त्रे जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत 457 शस्त्रे जमा करण्यात आली आहे. तसेच अवैध दारू विक्री संदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.

0000000





जिल्ह्यात 1 एप्रिलपर्यंत मतदार जागृतीसाठी चुनाव पाठशाळा

बुलडाणा, दि. 27 : लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये व्यापक प्रमाणात मतदार जाणीव जागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे चुनाव पाठशाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये दि. २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान हा उपक्रम होणार आहे.

लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांनी सहभाग वाढविणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क बजावणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी त्यांनी लोकशाहीच्या या लोकोत्सवात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन देशाचा गौरव वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने १३ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत जाणीव जागृतीसाठी उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्या पुढाकाराने सर्व शाळा-महाविद्यालयांत या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. चुनाव पाठशाळा उपक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रार्थनेनंतर एकत्रितरीत्या समृद्ध आणि गौरवशाली भारतीय लोकशाहीबद्दल माहिती देवून निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी लोकशाही व निवडणुक प्रक्रियेबद्दल शिक्षकांनी दिलेल्या माहितीबाबत विद्यार्थी संवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी वयोगटानुसार शाळास्तरावर निबंध, चित्रकला, गायन, नृत्य व मतदार जागृती विषयक घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना कुटुंबातील मतदानाचा अधिकार असलेल्या मतदारांना मतदान करुन सहभागी करण्याच्या दृष्टीने महत्व पटविणारे व आवाहनात्मक पत्रलेखन नियोजित आहे. यातून जिल्ह्यातील प्रत्येक घरात मतदार जागृतीचा संदेश पोहचविण्याची योजना आखण्यात आली आहे. शाळा- महाविद्यालयातील 18 वर्षे पुर्ण झालेले नवमतदार प्रथमच मतदान करणार आहेत. त्यांच्या शंका-समाधानासाठी शाळा-महाविद्यालयस्तरावर अभिरुप मतदान केंद्र स्थापन करून त्यामध्ये मतदान केंद्रावरील सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी उपक्रमात सहभागी होऊन व्यापक मतदार जाणीव जागृती मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुक्ष्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment