Friday 22 March 2024

DIO BULDANA NEWS 22.03.2024

 ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

बुलडाणा, दि. 22 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या मराठी ४८५, हिंदी २०४ व इंग्रजी २२१ अशा एकूण ९१० ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या htedu.maharashtra.gov.in/maim/ या संकेतस्थळावर १८ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान ३० टक्के सूट दराने वा त्यापेक्षा अधिक सूट दर देण्यास तयार असल्यास त्या सूट दराप्रमाणे ग्रंथांचा पुरवठा करणे आवश्यक राहील. याबाबत प्रकाशक, वितरकांनी देयकात स्पष्टपणे नमूद करावे.

या संदर्भात यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती, आक्षेप असल्यास ३० मार्च २०२४ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई- ०१ यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्त बटवड्याने, टपालाने किंवा ई- मेलवर मुदतीत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या सूचना, हरकती आणि आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच यादीत ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक, किमतीत काही बदल असल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीन वाहने, पाच व्यक्तींना प्रवेश

बुलडाणा, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्चपासून नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांना तीन वाहने आणि पाच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करावयाची कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्यायपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या वाहने यांचा समावेश नसावा. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय किंवा कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व संबंधिताना नोटीस देऊन त्याचे म्हणने ऐकून घेणे स‌द्यस्थितीत शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे.

त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्यायपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा, उमेदवारानी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात पाच व्यक्तीव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कायर्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कायर्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वा‌द्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. सदर आदेश दि. 16 मार्च 2024 पासून दि. 6 जून 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

000000

लोकसभा निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

बुलडाणा, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध घालण्यात आले आहे. याचे मुद्रणालयांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्याच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाच्या मालकाने आणि इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकांनी तसेच प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापाई करताना इतर उमेदवाराचे नाव आणि त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे, हे निर्बंध घालण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहे. प्रत्येक व्यक्तीवर हे आदेश देणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश देण्यात आले आहे. पोलीस विभागाने सदर आदेश ध्वनीक्षेपकावर जाहीर करावे, असे आदेश देण्यात आले आहे.

000000

प्रचार वाहनांवर कापडी फलक, झेंडे लावण्यावर निर्बंध

बुलडाणा, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झंडे लावणे आदी बाबींसाठी निर्बंध घालण्यात आले आहे. या निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन प्रचार वाहनांबाबत निर्बंध घातले आहे. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.

फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी निवडणूक फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

000000

निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध

बुलडाणा, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या ध्वनक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे.

प्रचार वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजात प्रचार केल्याने ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील शांतता आणि स्वास्थास बाधा पोहोचण्याची आणि उशीरा रात्रीपर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालणे आवश्यक आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे. यात ध्वनीक्षेपकाचा वापर पोलिस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही, सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर कोणतेही फिरते वाहन आणि कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, दिवसा प्रचाराकरीता फिरत्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी धांबूनच करावा,

ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनांना प्रतिबंध आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहणार आहे. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

000000

सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही

बुलडाणा, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येत आहे. निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी परवानगी घेऊनच होर्डींग, बॅनर, पोस्टर्स लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडून मोठ्याप्रमाणात अनाधिकृत होर्डींग, बॅनर्स, पोस्टर्स आणि भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधित व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डीग, बॅनर्स, पोस्टर आणि भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता आहे.

भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार नगर पालिका, नगर पंचायत आणि ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डींग, बॅनर, पोस्टर आणि भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी घेतलेली मुदत संपल्यानंतर ते नष्ट करुन इमारती. मालमत्ता पुर्ववत करून घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. सदरील आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

000000

रहदारीस अडथळा टाळण्यासाठी निर्बंधाची अंमलबजावणी

बुलडाणा, दि. 22 : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत रहदारीस अडथळा होऊ नये, यासाठी निर्बंध घालण्यात आले आहे. गैरसोयीसाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्ष, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीचे ठिकाण, रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर, पॉम्प्लेट, कटआऊट, होडींग, कमानी लावल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकणार आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. सदरील आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

00000

सैलानी यात्रेत सौदार्हपूर्ण वातावरण ठेवावे
*जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
बुलडाणा, दि. २२ : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथील उत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वधर्मियांच्या सहभागाने याठिकाणी यात्रा भरते. या यात्रेत नागरिकांनी सौदार्हपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सैलानी येथे कोणतीही प्राणी इजा होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. याठिकाणी कत्तलीचे प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी जनजागृती करावी. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नारळाची होळी भरते. यात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करावी. तसेच होळी सणाला अनिष्ट प्रथा टाळाव्यात.
सैलानी यात्रोत्सवात नागरिकांनी अंधविश्वास न बाळगता श्रद्धा ठेवावी. तसेच संपूर्ण यात्रेत सौदार्हता टिकून राहण्यासाठी खबरदारी घ्यावी. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विविध बाबींवर जनजागृती करावी.
यात्रेदरम्यान याठिकाणी मोठी गर्दी होणार असल्याने येथील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. गर्दीमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच वाहनांची संख्या जादा असल्याने अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी. यात्रेत गर्दी टाळण्यासाठी दर्शन घेऊन बाहेर पडावे. ज्यामुळे येथील व्यवस्थेवर ताण पडणाार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही.
यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांनी जबाबदारीने वागावे. याचा महिलांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रशासनाने नागरिकांसाठी पाण्याची सोय केली आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याची नासाडी होवू नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment