Monday 11 March 2024

DIO BULDANA NEWS 11.03.2024

 



धरण, नाल्यातील गाळ काढण्याची मोहिम राबवावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि‍. 11 : धरणातील गाळ काढणे आणि नाला खोलीकरणासाठी राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पुरामुळे गाळ साचल्याने नाला खोलीकरणास वाव आहे. त्यामुळे जिल्ह्यात धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी मोहिम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे, मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, गाळमुक्त धरण आणि नाला खोलीकरणासाठी जलयुक्त शिवार योजनेतून कार्य करण्यात येत आहे. तसेच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाने धरणामध्ये किती गाळ साचला आहे, याची माहिती घेण्यात यावी. हा गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तातडीने पावले उचलावीत. निवडण्यात आलेल्या संस्थांना तालुकानिहाय कामे वाटप करण्यात यावीत. धरणातील गाळ काढण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे संस्थांनी जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रयत्नशील व्हावे.

जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील पुरामुळे नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. हा गाळ प्राधान्याने काढण्यासाठी पावले उचलावीत. नाला खोलीकरण हे वर्षभर चालणार आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या निधीची मागणी आतापासूनच करण्यात यावी. गाळ काढण्यासाठी राज्य शासनाचा आर्ट ऑफ लिव्हींग सोबत करार झाला आहे. त्यामुळे ज्याठिकाणी संस्था उपलब्ध नसल्यास अशी गावे आर्ट ऑफ लिव्हिंगला देण्यात यावी. गाळ काढण्यासाठी डिझेलचा खर्च स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहे. त्यामुळे दिलेली कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्यात यावी.

पिण्याचे पाणी आणि आवश्यकता भासल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने धरणातील गाळ काढण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींगने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात 41 ठिकाणी ही संस्‍था कार्य करणार आहे. ही कामे तातडीने सुरू होण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी प्रयत्नशील राहावे. गाळ काढण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आतापासूनच तयार ठेवण्यात यावी. ज्या धरणामध्ये पाणीसाठी शिल्लक राहिलेला नाही, तेथे तातडीने कामे सुरू करावीत. तसेच गाळ घेऊन जाण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधावा, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

00000



आरसेटीमध्ये महिला दिन साजरा

बुलडाणा, दि. 11 : भारतीय सेंट्रल बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटीमध्ये 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात आरसेटी कर्मचारी आणि महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरसेटीमधून प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू केलेल्या यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

00000

सेस फंडातून साहित्याचे वाटप

बुलडाणा, दि. 11 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेस फंड योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकरी, मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेतून 5 एचपी विद्युत मोटार पंप, एचडीपीई पाईप, मागासवर्गीय  महिलांकरीता शिलाई मशिन पुरविण्याची योजना घेण्यात आली होती. सदर योजनेचे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज पंचायत समितीमार्फत समाज कल्याण विभागाकडे केले आहेत, अशा पात्र लाभार्थ्यांची निवड यादी पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लाभार्थ्यांनी आपली देयके पंचायत समितीमध्ये तात्काळ सादर करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आवाहन मनोज मेरत यांनी केले आहे.

000000

पाणी टंचाई निवारणार्थ टँकर मंजुर

बुलडाणा, दि‍. 11 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सुरा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी कळविले आहे.

00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

बुलडाणा, दि‍. 11 : जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती व इतर योजनांचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय निमशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयात राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ ऑक्टोबर 2023 पासून कार्यान्वित झाले आहे. त्यानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सर्व दस्तऐवज जोडून महाविद्यालयास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नवीन आणि नुतनीकरण अर्ज विहित मुदतीत अर्ज भरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावेत. तसेच गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांमधील त्रृटी पूर्ण करून प्रकल्प अधिकारी यांच्या लॉगीनला मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment