Thursday 22 February 2024

DIO BULDANA NEWS 22.02.2024








 महासंस्कृती महोत्सवात लोक कलेचा जागर

*दंडार, गोंधळाला नागरिकांची पसंती

* हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद

* लावणीवर धरला ठेका

बुलडाणा, दि. 22 : महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी, दि. 22 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे हास्यकवी संमेलन पार पडले. दीप्ती आहेर आणि समूहानी पारंपरिक लावणी सादर केली. उपस्थितांनी पारंपरिक गोंधळ, दंडारला पसंती दिली. हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद दिली. तसेच लावणीवर ठेका धरला.

यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रम सादर करण्यात आला.

यात बुलडाणा येथील अंध निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. नंदकिशोर यांच्या समुहाने गोंधळ सादर केला. गणेश कदम यांनी वासुदेव, शाहिर हरिदास खाडेभराड यांनी शेतकरी आत्महत्या, प्रमोद दांडगे यांनी भारूड, पांडुरंग ढिलावी यांच्या समूहाने दंडार, मेहकर येथील आई लोककला समूहाने गोंधळ सादर केला.

हास्य कवी संमेलनात स्वाती सुरंगळीकर, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर, वृशाली देशपांडे, बंडा जोशी यांनी सहभागी होत हास्य कविता सादर केल्या. बंडा जोशी यांनी याड लागलं हे विडंबन सादर केले. भालचंद्र कोळपकर यांनी बायकोवर कविता सादर केली. स्वाती सुरंगळीकर यांनी मुलाच्या लग्नातील किस्सा सांगितला. अनिल दीक्षित यांनी नोटबंदीवर कविता सादर केली.

दीप्ती आहेर आणि समूहानी सुरवातीला गौळण आणि पाटलाचा वाडा लावणी सादर केली. त्यानंतर माधवी यांनी 'या रावजी बसा भावजी', बुगडी शोधायला आणि दीप्ती आहेर यांनी हा साजन माझा, चंद्रा लावणी सादर केली. कामिनी पुणेकर यांनी कुणी तरी न्या हो मला फिरवायला, जरा सरकून बसाया गाण्यावर लावणी सादर केली. महोत्सवातील लावणीच्या कार्यक्रमात शेवटी कामिनी पुणेकर, माधव आणि दिप्ती आहेर यांनी पाटलाचा वाडा या गाण्यावर लावणी सादर केली. दिप्ती आहेर यांनी स्टेजखाली उतरून उपस्थितांच्या मध्ये जाऊन नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांचा आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमस्थळी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रांचे दालन आणि पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहे. महासंस्कृती महोत्सवात शेवटच्या दिवशी गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील. महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ मोहिम

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत दि. ३ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येईल. यामध्ये ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना या दिवशी पोलिओ डोस देऊन लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी, कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात यावी, यासाठी मोबाईल पथक, ट्रान्झीट टिम, आदी सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना दिल्या.

अभियानात आरोग्य विभागासोबत विविध विभागातून एकुण ५ हजार ५२१ कर्मचारी सहकार्य करणार आहेत. तसेच ४३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ११७ मोबाईल टिम, १४२ ट्रान्झीट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ लाख ८२ हजार ३०८ बालके, तर शहरी भागात ६१ हजार ९८ बालके अशाप्रकारे एकुण २ लाख ४३ हजार ४०६ बालकांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे. सर्व बालकांना लसीकरणाकरीता २ हजार ५२ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.

00000

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी दि. 1 मार्च 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2021-22 व 2022-23 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

क्रीडा धोरण 2001 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्य, योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू, दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 10 हजार रूपये असे आहे.

पुरस्काराचे निकष हे पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असावे व त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षांपैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना दि. 1 जुलै ते दि. 30 जुन असा आहे. या तिनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अनेकवेळा सादर करु नयेत. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबतचे संबंधित तहसिलदार यांचेकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे लागणार आहे. विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज प्राप्त करावे, तसेच परिपूर्ण बंद अर्ज कार्यालयास सादर करावेत.  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे.

0000000

कोलवड येथे ‘कॅच द रेन’मध्ये श्रमदान

बुलडाणा, दि. 22 : नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय जिजामाता महाविद्यालयाचे सेवा योजना यांच्या वतीने ‘कॅच द रेन’ पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत कोलवड, ता. बुलडाणा येथे बुधवार, दि. 21 फेब्रुवारी 2023 रोजी श्रमदान करण्यात आले.

श्रमदानात पैनगंगेत गावातून वाहून जाणाऱ्या 3 ठिकाणी खडे खोदण्यात आले. यात विटांचे तुकडे, मोठे दगड टाकून पाणी जिरवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील रस्ते व नाल्याची साफसफाई  करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ज्ञानोबा कांदे, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजश्री येवले, साहेबराव पाटील उपस्थित होते.

000000

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म उद्योग उपक्रमांना बीजभांडवल

बुलडाणा, दि. 22 : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे निमशहरी व ग्रामीण क्षेत्रातील लहान व सूक्ष्म उद्योग उपक्रमांना बीजभांडवल म्हणून कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेतून निमशहरी व ग्रामीण क्षेत्रातील अतिलहान व मुल्य उद्योग, उपक्रमांना बीजभांडवल उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. उद्योगांमधील यंत्रसामग्रीमध्ये स्थिर भांडवली गुंतवणूक 2 लाख रुपयापर्यंत आहे, अशा नव्याने स्थापन होणाऱ्या अतिलहान व सूक्ष्म उद्योग, उपक्रमांना या योजनेखाली मृदू कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य देण्यात येते. ही योजना एक लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या व दहा लाख लोकवस्तीच्या शहराच्या बाहेर 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील गावासाठी लागू आहे. या योजनेच्या लाभासाठी शिक्षण आणि वयाची अट नाही. परंतू लाभार्थ्यांकडे उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य किंवा अनुभव असणे अपेक्षित आहे.

योजनेंतर्गत बीजभांडवल सहाय्य मिळण्यासाठी उत्पादित व सेवा अतिलहान व सूक्ष्म उपक्रम पात्र आहेत. या योजनेमध्ये पात्र उद्योग आणि सेवा उद्योगाच्या प्रकल्प किंमतीची कमाल मर्यादा 2 लाख रूपये आहे. उद्योग घटकाच्या प्रकल्प किंमतीच्या एकूण स्थिर भांडवली गुंतवणूक व खेळत्या भांडवलाचे सिमांतिक भांडवल स्थिर भांडवलाच्या कमाल 30 टक्के मर्यादित राहणार आहे.

            बीजभांडवल सहाव्याचा आकृतीबंध हा सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थीची स्वंगुतवणुकीचे प्रमाण पाच टक्के असणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज म्हणून दरसाल 4 टक्के व्याजाने देण्यात येणार आहे. बीज भांडवल परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षे 6 महिने आहे. बिज भांडवल मिळाल्यानंतर 6 महिन्यात परतफेड देय राहणार आहे. परतफेड विहित कालावधी केली नसल्यास 1 टक्के दंड आकारण्यात येणार आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले आहे.

00000

भगरीतून विषबाधा रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन

*भगरीतून झालेल्या विषबाधेप्रकरणी कारवाई

बुलडाणा, दि. 22 : सोमठाणा, ता. लोणार येथे भगरीतून झालेल्या‍ विषबाधाप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने कार्यवाही केली आहे. भगरीतून विषबाधा रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खापरखेर्डा, सोमठाणा येथे दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी विठ्ठल मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहामध्ये भगर आमटीचा प्रसाद वाटप करण्यात आला. त्याच्या सेवनाने रात्री उशिरा साधारणतः २०० जणांना पोटदुखी, उलटी व मळमळीचा त्रास सुरु झाला. सदर घटनेच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी र. द्वा. सोळंके, जी. के. बसावे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यानुषंगाने भगर आमटी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कच्चे अन्न पदार्थ भगर, रिफाईंड सोयाबीन तेल, मिरची पावडर, शेंगदाने यांचे नमूने विश्लेषणासाठी घेतले आहे. भगर या अन्न पदार्थाच्या २६ कि.ग्रॅ., रिफाईड सोयाबीन तेलाचा ४४८.४ कि. ग्रॅ., मिरची पावडर २ कि.ग्रॅ. ६० ग्रॅ. असा एकूण ६० हजार ७०१ रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरचे अन्न नमूने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न विषबाधा रोखण्यासाठी बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी. शक्यतो पाकिटबंद भगर घ्यावी. ब्रॅण्डचे नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर घेऊ नये. भगर घेतांना पाकिटावरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासून घ्यावा. भगर साठवितांना स्वच्छ, कोरडया ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवावी. जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवणूक करु नये किंवा जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नये. शक्यतोः भगरीचे पिठ विकत आणू नये. भगरीच्या पिठामध्ये बाताबरणातील ओलावा शोषण घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता अधिक असते. भगरीचे पिठ आवश्यक तेवढेच दळून घ्यावे. जास्त दिवस पिठ साठवू नये व तसेच बाहेरुन दळून आणू नये, शक्यतो भगर पिठ घरीच दळून घ्यावे. भगर आणि शेंगदाने हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहे. दोन तीन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थाच्या सेवन अॅसिडीटी वाढविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास घेतात. या पदार्थाचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादीतच करावे.

धार्मिक कार्यक्रमात किंवा भंडारा असणाऱ्या ठिकाणी भगर खिचडी/भात तयार करतांना ती स्वच्छ व आरोग्यदायी ठिकाणी तयार करावी. भगरीचा भात किंवा खिचडी पूर्णपणे शिजवावी; अर्धवट शिजवू नये. भगर भात/खिचडी तयार केल्यानंतर ती लगेचच खाण्यासाठी वापरावी. भगरीचा भात किंवा खिचडी तयार करुन जास्त वेळ सामान्य तापमानात ठेवल्यास त्यामध्ये घातक सुक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असते. भगरीचा भात किंवा खिचडी तयार केल्यानंतर ती 60 पेक्षा जास्त तापमानाला ठेवावी. लगेच खाने शक्य नसल्यास सदरची भगर ही रेफ्रीजरेटरमध्ये ठेवावी. जेणेकरुन घातक सुक्ष्मजीवांची त्यात वाढ होणार नाही. भगरीचे सेवन करतांना उपरोक्त नमूद गोष्टी लक्ष्यात घेतल्यास संभाव्य अपाय टाळता येतील, असे सहायक आयुक्त स. द. केदारे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment