Thursday 8 February 2024

DIO BULDANA NEWS 08.02.2024

 मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या क्षेत्रात जनजागृती करणार

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणार

बुलडाणा, दि. 8 : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 70च्या वर नेण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येतील. यात प्रामुख्याने मतदानाच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 32 मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणुकीशी संबंधीत कामकाजांना वेग देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मृत्यू झालेले आणि इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची प्रामुख्याने 18 ते 19 वयोगटातील युवकांची नवमतदार म्हणून नोंदणी करण्यात येत आहे. युवकांनी मतदार नोंदणी करून मतदानासाठी पुढे यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये 18 ते 19 वयोगटातील 27 हजार मतदार आहेत.

सुमारे 29 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सुमारे 20 लाख मतदार नोंदणी झाली आहे. यात जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर हे 934 आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरू आहे. यात नोंदणी करण्यासाठी अद्यापही संधी आहे. यात 66 हजाराहून अधिक नोंदणी झालेल्या आहे. जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्र राहणार आहे. यात सुमारे 100 ठिकाणी चार हून अधिक मतदान केंद्र एकाच ठिकाणी राहणार आहे.

यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाववेळी आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. यात नागरी भागात 66, तर ग्रामीण भागात 54 मतदान केंद्र आदर्श बनविण्यात येणार आहे. तसेच 72 मतदान केंद्र युवा अधिकारी-कर्मचारी, तर 36 मतदान केंद्र महिला अधिकारी-कर्मचारी हाताळणार आहेत. तसेच काही ठिकाणी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र सांभाळणार आहे. सुमारे 1 हजार 200 मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दोन मतदान केंद्रावर 20 टक्क्यापेक्षा कमी मतदान झाले होते. यात जळगाव आणि मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राचा समावेश आहे. तसेच 21 ते 40 टक्केदरम्यान बुलडाणा 29, सिंदखेड राजा 1 अशा 30 मतदान केंद्राचा समावेश आहे. तसेच 41 ते जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या 850 मतदान केंद्राच्या क्षेत्रात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

00000

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2021-22 साठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

केंद्र शासनातर्फे युवा क्षेत्रामध्ये कार्यरत युवक, युवती आणि संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2021-22 या वर्षाकरीता राष्ट्रीय युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील युवांनी yas.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000

माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात स्वच्छता मॉनिटर अभियान

बुलडाणा, दि. 8 : रोहित आर्या यांच्या प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानाला वाढता प्रतिसाद आणि परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या अभियानाच्या दुसऱ्या टप्‍प्याला ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक उपक्रमात सर्वाधिक १० गुणांचे महत्त्व दिले आहे.

अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांनी प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियान व्यवस्थित समजून परिणामकारक राबवण्यासाठी कार्यशाळा, नियोजन केले आहे. या अभियानासाठी विभाग समन्वयक मंगेश भोरसे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी बी. आर खरात, सिद्धेश्वर काळूसे, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर कार्यरत आहेत.

शैक्षणिक वर्षाअखेर या अभियानात जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 200हून अधिक शाळांनी swachhtamonitor.in संकेतस्थळावर सहभाग नोंदवला आहे. मागील प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानात जिल्ह्यातील 23 शाळांनी राज्यातील सर्वोत्तम शाळेचा मान पटकावला आहे. दुसऱ्या टप्यातही जिल्ह्यातील शाळा सहभागी आहेत. राज्यातून कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाची सवय कायमस्वरूपी मोडून काढण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शाळांनी अभियानाचे स्वरूप समजून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment