Tuesday 6 February 2024

DIO BULDANA NEWS 06.02.2024

 सीसीआयतर्फे कापूस खरेदीस सुरवात

बुलडाणा, दि. 7 : भारतीय कापूस महामंडळातर्फे जिल्ह्यातील पाच केंद्रावर कापूस खरेदीस सुरवात करण्यात आली आहे.

कापूस पणन महासंघाच्या खामगाव विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चिखली, खामगाव, खामगाव-बी, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा या 5 कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळामार्फत एफएक्यू प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु झाली आहे. तसेच सीसीआयमार्फत जिल्ह्यात जळगाव जामोद आणि शेगाव या 2 केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन खामगाव येथील विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारावर

 गुरुवारपर्यंत हरकती आमंत्रित

बुलडाणा, दि. 6 : राज्याच्या क्रीडा विभागातर्फे क्रीडापटू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यावर गुरूवार, दि. 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.

सन 2022-23च्या पुरस्कारासाठी संचालनालयाच्या sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर पुरस्कार या टॅबमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर विहीत नमून्यात सूचना आणि हरकती सादर कराव्यात, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

बांधकाम कामगारांनी खोट्या अमिषाला बळी पडू नये

*कामगार विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 6 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटीत कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा कार्यालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने केले जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

कार्यालयातील कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रुपया शुल्क आकारण्यात येत असून, त्यांची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

            बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या अमिषाला बळी पडू नये. नियमानुसार नोंदणी व नूतनीकरण करून घ्यावी. याबाबतीत फसवणूक झाल्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

00000

गटई कामगारांनी स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2023-24 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना दि. 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटविलेला व परिपूर्ण अर्ज सादर करावा, अर्जदार हा राज्यातील रहिवासी आणि अनुसुचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने दिलेला उत्पनाचा दाखला आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

अर्जदाराची स्टॉल मागणीची जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावनी बोर्ड किंवा महानगरपालिकेनी त्याला भाडे, करारनामा, खरेदी अगर मोफत, परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व:मालकीची असावी. यासाठी वरीलपैकी एक प्रकारचे कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची प्रत, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला आदी स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

सदर व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घ्यावा. त्यासह आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावेत. अर्जदारास अर्जातील त्रृटी पुर्ततेबाबत कळविल्या जाणार नसल्याने अर्जदारांनी आवश्यक त्या कागपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 6 : समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील शासनमान्य शाळामधील पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर शिष्यवृत्ती सन २०२३-२४ पासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाचवी ते सातवी, आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी, शिक्षण फी, तसेच अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांचे पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या पाल्यांना शिष्यवृत्ती, या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ चे सर्व पात्र विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणाली वेबलिंक prematric.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

सारथी प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी

बुलडाणा, दि. 6 : सारथी प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे वाहन चालक अनुज्ञप्तीचे कार्यालयीन आणि शिबीर कार्यालयाचे कामकाज बाधीत झाले आहे. सदर अडचणीचे निराकरण झाल्यानंतर कामकाज पूर्ववत सुरु होईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment