Tuesday 27 February 2024

DIO BULDANA NEWS 27.02.2024






भाषेला महत्त्व आहेच, पण मातृभाषेचे  महत्त्व अतूट

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 27 : भाषा हेच एकमेव माध्यम आहे, ज्यामुळे एकमेकांसोबत जुळल्या जाते. त्यामुळे जगातील प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. मात्र मातृभाषेचे महत्व आतूट असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार संजिवनी मुपळे, माया माने, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बस्सीये, साहित्यिक विक्रांतसिंह राजपूत, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव वैशाली तायडे, नायब तहसीलदार प्रमोद करे, श्री. हिवाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच भाषा हा विषय कायम मागे असतो. भाषेची नीट तयारी केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरण व्यवस्थित नसते. मात्र प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. त्यातही जन्मल्यापासून मातृभाषा कायम कानावर पडत असते आणि हिच भाषा कायम कामाला येते. मातृभाषा शिकण्यासाठी कोणतेही कष्ट लागत नाही, मात्र परकीय भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. त्यामुळे मातृभाषेसह इतरही भाषा शिकाव्यात. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे. आज मराठी भाषा सर्व ठिकाणी उपयोगी आणता येऊ शकते. भाषा शिकताना विद्यार्थ्यांनी पाया मजबूत ठेवावा. शासनाने 2013पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे राज्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आपली कला, संस्कृती आदर्श असून हा वसा पुढे नेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक मार्ग शोधावा, कोणत्यातरी मार्गावर यश जरूर मिळेल.

वैशाली तायडे यांनी मराठी भाषेचा ऱ्हास होत असताना तिचे संवर्धन करण्यात येत आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून शिकावी. मात्र अस्सल जीवन जगताना मातृभाषा हिच कामी येते. मातृभाषेने समृद्ध भाषा जगली पाहिजे. मराठीच्या संवर्धनासाठी न्यायालयापासून शुभेच्छा देण्यासाठी मराठीचा उपयोग व्हावा. बडबड गीते आणि जात्यावरच्या ओवीनी मराठी भाषा विकसित झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने मराठीला विसरू नये, असे आवाहन केले.

विक्रांतसिंह राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला.  शिवचरित्रातून मराठी संस्कृतीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग स्फुर्तीदायक आहे. त्यांचा प्रत्येक पराक्रम हा आठवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन प्रामुख्याने मराठीतून समोर आले. त्यामुळे शिवाजी महाराज हा विषय डोक्यात घेण्याचा विषय आहे. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. मराठीचा सन्मान व्हायला हवा. शिवाजी महाराजांचा प्रताप मराठी भाषेसह ब्रज भाषेत कविराज भूषण यांनी रुपात मांडला आहे. त्यांनी त्यांच्या काव्यातून स्फुर्ती निर्माण केली आहे. शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून तो आता एक शक्ती आणि विचार झाला असल्याचे सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी प्रास्ताविकातून सर्वांनी मातृभाषा मराठीचे संवर्धन जाणिवपूर्वक करण्याचे आवाहन केले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मिनाक्षी पटेल, पूनम बसू यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले. तहसिलदार माया माने यांनी आभार मानले.

000000







 बचतगटांच्या नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 27 : नवतेजस्व‍िनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयातर्फे महिला बचतगटद्वारे उत्पादित वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात नव तेजस्विनी महोत्सव २०२४ या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी, दि. २४ फेब्रुवारी रोजी गांधी भवनात पार पडला.

नव तेजस्विनी महोत्सव दि. २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान बुलडाणा येथे पार पडला. आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, शकुंतला रत्नपारखे, वर्षा गवई, रेखा शिंदे, राहुल तायडे यावेळी उपस्थित होते.

आमदार गायकवाड यांनी तालुक्यातील बचतगटासाठी बचतभवन आणि १०० बचतगटांना उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी गाळे, तसेच महिला बचतगट संस्था लोक संचलित साधन केंद्र कार्यालय  बांधून देण्याचे आश्वासन दिले. महिलांना मार्गदर्शन करताना छोट्या उद्योगासह शाश्वत उपजिविकेसाठी पावले उचलावीत, महिलांची कंपनी स्थापन करून महिलांना शाश्वत रोजगार मिळावे याबद्दल बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. समीर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. वर्षा गवई यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनीमध्ये महिलांनी विविध प्रकारच्या उत्पादित वस्तूंचे स्टॉल उभारले होते.

00000

अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत नाविन्यपूर्ण योजना

बुलडाणा, दि. 27 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम पोटजातीतील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित बुलडाणा मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, म्हणून समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे, ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण हवे, त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्याकरीता २०० प्रशिक्षण योजनेचे उद्द‍िष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा जिल्हा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

अर्जासोबत अर्जदाराने जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराचा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा ३ लाखापर्यंत तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा, नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ५० वर्षे असावे, प्रशिक्षणार्थिंनी यापूर्वी शासन, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, प्रशिक्षणार्थींना आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागणार आहे.

00000

No comments:

Post a Comment