Monday 5 February 2024

DIO BULDANA NEWS 05.02.2024

 मताधिकार बजावण्यासाठी मतदारांनी मतदार नोंदणी करावी

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदारयादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री मतदारांनी करावी, यादीत नाव नसल्यास मताधिकार बजावण्यासाठी मतदारांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या buldhana.nic.in संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांनी 'मतदाता सेवा पोर्टल’ या संकेतस्थळावर electoralsearch.eci.gov.in वर जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करावी, यासोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही.

पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोंबर या बहुअर्हता तारखा ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे अद्याप नाव नोंदणी केलेली नसल्यास युवांना मतदार नोंदणीची अद्यापही संधी आहे.

मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना 6 भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नजरचुकीने जर एखाद्या मतदाराच्या नावाची वगळणा जरी झालेली असेल त्यांनी सुध्दा आपल्या नावाची मतदार यादीमध्ये पडताळणी करून संबंधित कार्यालय, बीएलओ किंवा ऑनलाईन स्वरूपात नव्याने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

तसेच राजकीय पक्षांनीही आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिर्धीच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. तसेच नागरिकांना मतदार नोदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच 'मतदाता सेवा पोर्टल’ आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप’ यावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

00000

डाक विभागातर्फे महिला सम्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना अभियान

बुलडाणा, दि. 5 : देशातील नारी शक्तीसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 पासून देशातील पोस्ट ऑफिसमधून नारी शक्तीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेत महिला खातेदार स्वतःसाठी किंवा पालक आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे कमीत कमी 1 हजार रूपये ते जास्तीत जास्त 2 लाख रूपयांपर्यंत जमा करता येणार आहे. यावर वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकतात. यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

खातेदार दि. 31.03.2025 पर्यंत दोन खात्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवून खाते काढू शकतो. तसेच सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची एक लहान बचत ठेव योजना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग आहे. या योजनेमार्फत 10 वर्षापर्यंतच्या मुलींचे पालक आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे एका वर्षात कमीत कमी 250 रूपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये जमा करून वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळवू शकतील. सदर रकमेचा उपयोग मुलीच्या शिक्षण, तसेच लग्नासाठी करता येऊ शकतो.

सदर योजने अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात दि. 1 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नारी शक्तीसाठी महिला बचत पत्र अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महिलांनी महिला सम्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होण्यासाठी डाक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

00000

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 5 : माहिती व तंत्राज्ञान विभागामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परिक्षा फी व इतर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा mhadbt.maharashtra.gov.in वर दि. 11 ऑक्टोंबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तथापि दि. 5 फेब्रुवारी 2024 अखेर महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील 6 हजार 742 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरलेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 53 टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरलेले आहेत. तसेच महाडीबीटी पोर्टलवर इतर मागास प्रवर्ग, विजाभज प्रवर्ग व विमाप्र प्रवर्गातील 19 हजार 91 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 58 टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत. त्यानुषंगाने सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, फ्रिशिपचे अर्ज तातडीने भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी अनुसूचित जाती प्रवर्गाचे 3 हजार 886 विद्यार्थी आणि विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 10 हजार 517 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तात्काळ आपल्या महाविद्यालय स्तरावरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज तपासणी करुन पात्र शिष्यवृत्ती अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा यांच्याकडे मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करावे. या आर्थिक वर्षात प्राप्त निधी खर्च होण्यासाठी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतरच शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाच्या खात्यावर महाडीबीटी पोर्टलद्वारे वितरित होतील. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास विद्यार्थी, पालक व महाविद्यालय जबाबदार राहील. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जबाबदार राहणार नाही, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment