Wednesday 14 February 2024

DIO BULDANA NEWS 14.02.2024

 










'निश्चय पूर्तीचा महामेरू' महानाट्यास उस्फूर्त प्रतिसाद

*खामगाव येथे महासंस्कृती महोत्सव

बुलडाणा, दि. १३ : खामगाव येथील महासंस्कृती महोत्सवात आज दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'निश्चय पूर्तीचा महामेरु' महानाट्य सादर करण्यात आले. आहे. या महानाट्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महानाट्याच्या सुरुवातीला आयोजित कार्यक्रमात महानाट्य आयोजनासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी आमदार ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील क्रीडा संकुलात महासंस्कृती महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास खामगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात पारंपरिक कला प्रकारही स्थानिक कलाकारांकडून सुरुवातीला सादर करण्यात आले. या महोत्सवातील महानाट्यास नागरिकांना प्रवेश विनामुल्य आहे.

०००००










महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

*गायक राहुल सक्सेना यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाने सुरुवात

बुलडाणा, दि. १२ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे आज दि. १२ फेब्रुवारी रोजी थाटात उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, मुख्याधिकारी प्रशांत शेळके आदी उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सवास आज पासून सुरुवात झाली आहे. खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आज पहिल्या दिवशी दि. १२ फेब्रुवारी रोजी गायक राहुल सक्सेना यांच्या समूहाचा संगीत रजनी कार्यक्रम झाला. गणेश वंदनाने संगीत रजनीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राहुल सक्सेना यांनी विविध गीते सादर केली. शामल देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

महासंस्कृती महोत्सवात मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निश्चयपूर्तीचे महामेरू हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे.

महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पन्नासहून अधिक विविध स्टॉल्स लावण्यात आलेले आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागांचे स्टॉल लावण्यात आलेले आहे. तसेच खाद्य संस्कृती जपणाऱ्या बचतगटांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. स्टॉल्समध्ये प्रामुख्याने स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, वन विभागाचे माहिती, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळाची माहिती, स्थानिक पारंपरिक वस्त्रांचे दालन आदींचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत.

000000

भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता समितीकडे

तक्रार दाखल करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता समिती सभा आयोजित करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार शासकीय कामामध्ये विलंब, गैरव्यवहार व अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भष्ट्राचाराचे तक्रारीची दखल घेण्याकरीता बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील खाते प्रमुख स्तरावरील विभागनिहाय दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करव्यात. सदर तक्रारीबाबत तक्रारकर्त्याचे समाधान झाले नसल्यास तक्रारीच्या अहवालासह जिल्हास्तरीय दक्षता समितीमध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे.

000000

नवीन संस्था, अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 14 : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यासाठी नवीन संस्था आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाइी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन संस्थांनी मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम किंवा तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक संस्थांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, गणेशनगर, एचपी गॅस गोडाऊन समोर, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

मंडळाद्वारे मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांची यादी, सविस्तर अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य, अभ्यासक्रमांची समकक्षता, संबंधित शासन निर्णय, माहिती पुस्तिका, अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक आदी सर्व माहिती मंडळाच्या msbsvet.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, व्ही. बी. बचाटे यांनी केले आहे.

00000

रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धन वापरास सूट

बुलडाणा, दि. 14 : शासनाच्या निर्णयानुसार ध्वनीवर्धन वापरात 15 दिवसांची सूट जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार 12 दिवसांसाठी ध्वनीवर्धन वापरास सूट देण्यात आली आहे. यामुळे सूट असलेल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धन वापरात येणार आहे.

ध्वनीवर्धन वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्गा बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक पोलीस आयुक्त यांच्याशी सल्लामसलत करुन जिल्हयासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 15 दिवस निश्चित करून त्याची आगाऊ यादी तयार करण्याबाबत सूचना आहेत. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी ध्वनीपेक्षक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 12 दिवस अटी आणि शर्तीच्या अधिन राहून जाहीर करीत आहे. यात शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवातील 4 दिवसात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी, नवरात्री उत्सवामधील 2 दिवसात अष्टमी व नवमी, दिवाळीतील 1 दिवस लक्ष्मीपूजन, 31 डिसेंबर रोजी एक दिवस असे एकूण 12 दिवस वरीलप्रमाणे 12 दिवस जाहिर करण्यात आले आहे. उर्वरीत 3 दिवस राखीव ठेवण्यात आले असून महत्त्वाचे वेळी व गरज भासल्यास त्या वेळी निश्चित करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment