Wednesday 21 February 2024

DIO BULDANA NEWS 21.02.2024

 













‘नक्षत्रांचे देणे’ने चिखली महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 21 : सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाला ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाने सुरुवात झाली. आमदार श्वेता महाले यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, तहसिलदार माया माने आदी उपस्थित होते.

सुरवातीला शाहिर डी. आर. इंगळे यांच्या समूहाने पोवाडा सादर केला. तालुका क्रीडा संकुलात दि. २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवास आज, दि. 20 फेब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात आली.

ऋषिकेश रानडे यांनी गणपती बाप्पा मोरया, कानडा राजा पंढरीचा, लव कुश रामायण गाती, पूत्र मानवाचा आणि विठ्ठल नामाचा रे टाहो अशी भक्तीगीत सादर केली. आनंदी जोशी यांनी फुलले रे क्षण माझे, का रे दुरावा ही गाणी सादर केली. ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी चंद्र आहे साक्षीला, फिटे अंधाराचे जाळे आदी सुरेल गीते सादर केली.

कार्यक्रमस्थळी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रांचे दालन आणि पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहे. सुरवातीला या दालनाला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार माया माने यांनी भेट दिली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची मराठी, हिंदी गाणी सादर केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे कवी, हास्यकवी संमेलन होईल. त्यानंतर दीप्ती आहेर आणि समूह पारंपरिक लावणी सादर करतील.

तसेच गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील.
महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

नामांकीत शाळेत प्रवेशाची संधी

बुलडाणा, दि. 21 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये पहिली, दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अकोला येथील प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला तसेच नजीकच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत विनामुल्य‍ प्रवेश अर्ज मिळतील. विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून, तसेच नजीकच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा.

अर्ज सादर करताना विद्यार्थी इतर कोणत्याही शाळेत प्रवेशीत नसावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल 2024 आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. जातीचा दाखलाची साक्षांकीत प्रत सोबत जोडावी. दारिद्र्य रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमूद करावा. पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाखाच्या आत असावे. यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. तसेच विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी. पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्षे पूर्ण असावे. सोबत जन्मतारखेचा पुरावा जोडावा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमती पत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे.

आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येईल. दुसरीसाठी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्यापकाचे प्रमाणपपत्र, आधारकार्डच प्रत जोडावी लागणार आहे. अपूर्ण कागदपत्रे, तसेच खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

आरसेटीतील भोजन पुरवठ्यासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 21 : बुलडाणा येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थींना भोजन पुरविण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आली आहे. ही निविदा दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावी लागेल. इच्छुक पुरवठादारांनी कार्यालयात भेट देऊन निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांनी केले आहे.

000000

जिल्ह्यातील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

बुलडाणा, दि. 21 : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या राज्याबाहेर प्रक्षेत्र भेटी आयोजित करण्यात येतात. यातून जिल्ह्यातील 28 शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी बेंगलोरकडे रवाना झाले.

अभ्यास दौरा हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर हिसारगड, बेंगलोर येथे आहे. सदर अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील २८ शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी रवाना झाले. अभ्यास दौऱ्यात बेंगलोर येथील प्रक्षेत्र भेट, फलोत्पादन विषयक विषयांचे व्याख्यान, तसेच बेंगलोर येथील प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतावर भेटी देण्यात येणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत राज्यात फळ उत्पादक शेतकरी, तसेच शेतकऱ्यांमध्ये उत्पादनविषयक जिज्ञासा व आवड निर्माण करणे हा हेतू आहे. तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी व शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञान व काढणी पश्चात तंत्रज्ञान बाबत सखोल व शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञान उपलब्ध करून देणे, फलोत्पादन विषयक शेतीचा विकास करणे, यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीने झाली असून तालुका बुलढाणा, चिखली, मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

00000

जिल्ह्यात प्रथमच शीतवाहन सुविधा उपलब्ध

बुलडाणा, दि. 21 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथमच शीतवाहन सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना माल दूरवर पाठविण्यास मदत होणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अर्थसहाय्याने शीतवाहन अमरावती विभागातून जिल्ह्यात प्रथमच डोंगरखंडाळा येथील शेतकरी मंदाकिनी तेजराव सावळे यांना देण्यात आले आहे. या शीतवाहनाचे उद्‌घाटन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले. यावेळी कृषि उपसंचालक एस. आर. कणखर, कृषि अधिकारी उमेश जाधव, कृषि पर्यवेक्षक दीपक हिवाळे आदी उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण, फलोत्पादित, औषधी व सुंगधी वनस्पती पिकांचा दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढविणे, बाजारपेठेमध्ये फलोत्पादित औषधी आणि सुंगंधी वनस्पतीच्या पुरवठ्यात सातत्य ठेवणे, ग्राहकाला आवडीप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाच्या मालाचा पुरवठा करणे, फलोत्पादित, औषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाऊपणा वाढविणे हे आहे. याचे प्रकल्प मूल्य रक्कम ४० लाख असून ९ लाख १० हजार रूपये अनुदान देण्यात आले आहे.

फलोत्पादन पिकाचे मुल्यवर्धन प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके, त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शीतवाहनासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुंगधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे, तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढून भाव कोसळणे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शीतवाहन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

000000

No comments:

Post a Comment