Thursday 15 February 2024

DIO BULDANA NEWS 15.02.2024






 निवडणुकीच्या प्रशिक्षणाने प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 15 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रशिक्षण जिल्हास्तरावरून देण्यात येत आहे. प्रशिक्षणातून प्रामुख्याने कामकाजाबाबत उजळणी करण्यात येत आहे. यात काही महत्वपूर्ण सूचना देण्यात येत आहे. निवडणूक विषयक प्रशिक्षणाने प्रत्यक्ष निवडणूक काळातील प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे फिरते पथक, दक्षता पथक, आदर्श आचार संहिता, व्हीडीओ सर्व्हेलंस टीम, व्हीडीओ व्ह्युव्हींग टीम, माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती, निवडणूक खर्च विषयक प्रशिक्षण आज घेण्यात आले. जिल्हा नियोजन सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निववडणूक अधिकारी सहासिनी गोणेनवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, कोणतीही निवडणूक भयमुक्त आणि योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात येते. या समितीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. प्रत्येक निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रशिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येकाने हे प्रशिक्षण गांभिर्यपूर्वक घ्यावे. प्रशिक्षणामुळे निवडणूक कालावधीतील कामकाजाची माहिती होते. तसेच यासाठी मनुष्यबळ तयार होते. तसेच चोख नियोजन करणे शक्य होते.

निवडणूक कालावधीत प्रत्येकाला निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात. या जबाबदाऱ्या आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरू होतात. त्यामुळे सोपविलेल्या कामात हयगय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. माध्यम समितीकडून निवडणूक कालावधीत प्रमाणिकरणाचे कार्य मोठ्या प्रमाणावर होते. प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या साहित्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. फिरते पथक आणि दक्षता पथकांनी तपासणी करून रोख रक्कम, दारू, मौल्यवान वस्तू आदींवर लक्ष ठेवावे.

निवडणूक विषयक कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी विविध अॅपचा उपयोग या कालावधीत केला जातो. काही ॲपवर नोंदणी आवश्यक असल्यास ती तात्काळ करून घ्यावी. तसेच नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याबाबतही योग्य ती कार्यवाही करून खुलासा सादर करावा. तालुकास्तरावरही झालेल्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड यांनी खर्च विषयक, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी मिडीया आणि सोशल मिडीया, उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी आदर्श आचार संहितेबाबत माहिती दिली.

000000

मंगळवारी महिला लोकशाही दिन

बुलडाणा, दि. 15 : महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी घेण्यात येतो. मात्र यावेळी शिवजयंतीनिमित्त सुट्टी असल्यामुळे हा माहिला लोकशाही दिन मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार फेब्रुवारी २०२४ मधील तिसरा सोमवार हा दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय सुटी असल्यामुळे सदर बैठक दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लोकशाही दिनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 15 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, समाधान गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, नाझर गजानन मोतेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

00000

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 15 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाचे सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाने नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सुरु झालेल्या सुविधा कर्ज योजना उद्दीष्टे 30 लाभार्थी असून प्रकल्प रक्कम 5 लाख, महिला समृध्दी योजना उद्दीष्टे 25 लाभार्थी असून प्रकल्प मर्यादा 1 लाख 40 हजार व शैक्षणिक कर्ज योजना देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख व परदेशांतर्गत 40 लाख रूपये आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेंतर्गत प्राप्त होणारे कर्ज प्रस्ताव beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. अर्ज केल्यानंतर त्यांच्या तीन प्रती मूळ कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे लागणार आहे.

कर्ज प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि. 11 मार्च 2024 आहे. अर्जासोबत अर्जदाराचा जातीचा दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत असून तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा, नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती जोडाव्यात, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, आधार लिंक मोबाईल कमांक, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल, त्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा, ज्याठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल, त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, एनएसएफडीसी योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आरटीओकडील प्रवाशी वाहतूक परवाना,  वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंग, किंमतीबाबत अधिकृत विक्रेता, कंपनीकडील दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र, तसेच अनुभवाचा दाखला, व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल, खरेदी करावयाच्या माल, साहित्याचे कोटेशन, प्रतिज्ञापत्र साद करावे लागणार आहे.

अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. उद्योग आधार, शॉप अॅक्ट लायसन्स, तसेच कर्ज मंजुरीनंतर कर्ज परतफेडीच्या हमीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येणार आहे. अर्जदाराचे सिबील स्कोअर 500च्या वर असावा. अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे, तसेच 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. कर्ज मंजुरीनंतर दोन सक्षम जामीनदाराच्या वैधानिक दस्तऐवजाची पूर्तता केल्यावरच कर्ज वाटप करण्यात येईल. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment