Thursday 29 February 2024

DIO BULDANA NEWS 29.02.2024

वयस्कर, दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट व्यवस्था

*अर्ज करून घरूनच मतदानाची सुविधा

बुलडाणा, दि. 29 : आगामी लोकसभा निवडणुकीत 80 वर्षाहून अधिक वयोवद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना 12 डी हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. यामुळे या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे.

मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेले असणाऱ्या 80 वर्षाहून अधिक वय असणारे नागरीक आणि दिव्यांग जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, अशा मतदारांना 12 डी हा फॉर्म भरून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, अशा मतदारांनी स्थानिक स्तरावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. याप्रकारे मतदान करण्यासाठी फॉर्म 12 डी आणि दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जेणेकरून निवडणुकीच्या दिनांकापूर्वी संबंधित निवडणूकीचे अधिकारी घरी येऊन मतदानाची संधी संबंधी दिव्यांग आणि वयस्क मतदारांना पूर्व सूचना देऊन येतील.

या सुविधेचा लाभ जे मतदार मतदान केंद्रावर येऊ शकणार नाही, अशा मतदारांनी घ्यावा. तसेच 12 डी फॉर्म भरून देण्याची काळजी घ्यावी. यात अडचणी असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा संपर्क क्रमांक देऊन मदत करण्यात येणार आहे, तसेच अडचण असल्यास 1950, वोटर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

कौशल्य विकासाचा दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षणाचा सक्षम दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातर्फे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास केंद्र योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून हे प्रशिक्षण संपूर्ण जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे. या योजनेचा सक्षम दिव्यांग लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाच्या 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी सन 2023-24 या शैक्षणिक सत्रातील भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनेचे लाभ मिळण्याकरिता नवीन अर्ज, तसेच नुतनीकरण अर्ज भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संकेतस्थळ ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित झाले आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक सत्रामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ mahadbt.maharashtra.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन भरावे लागणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन महाविद्यालयास सर्व दस्ताएैवज जोडून सादर करावे लागणार आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय स्तरावरील फलकावर सूचना, तसेच नोटीस देऊन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अवगत करावे. तसेच सन 2021-22 व 2022-23 या वर्षात महाविद्यालयस्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज, तसेच नुतनीकरण अर्ज तात्काळ त्रृटी पुर्तता करुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या लॉगीनला मंजूरीसाठी पाठवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी महाविद्यालयस्तरावर जतन करुन ठेवण्यात यावी. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या प्रणालीवर भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

0000000

यवतमाळ येथे आज विभागीय रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 29 : अमरावती विभागातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती तसेच लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 1 मार्च रोजी करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात 20 पेक्षा अधिक उद्योजकांनी त्यांच्याकडील 1300 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजु व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. यासोबतच उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांनी दि. 1 मार्च रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविदयालय, यवतमाळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभागी व्हावे. पात्र, गरजू व नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मेळाव्यासाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी.

याबाबत समस्या आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment