Wednesday 28 February 2024

DIO BULDANA NEWS 28.02.2024

 



मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 28 : आगामी काळात लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. यात पोलिस विभागाची भूमिका महत्वाची राहणार आहे. मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी पावले उचलावीत, तसेच कठोर निर्णय घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, समाधान गायकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. महामुनी, जिल्हा सूचना अधिकारी सुनील खुळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या काळात निवडणूक विषयक कार्यवाही प्राधान्याचा विषय असणार आहे. निवडणूक कामकाजात विविध ॲपचा उपयोग होणार आहे. त्या अनुषंगाने याबाबतची माहिती यासंबंधित प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. या ॲपच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आलेली माहिती ही निवडणूक आयोगाला दिसणार आहे. त्यामुळे यात गांभीर्याने कामकाज करणे आवश्यक आहे. तसेच पथकाकडून केलेल्या कारवाईची माहिती अचूकपणे समाविष्ट करणे गरजेचे आहे. यात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. फिरत्या पथकाच्या प्रमुखाला दंडाधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विविध कारवाई करताना सोयीचे होणार आहे.

सी-व्हीजीलच्या माध्यमातून नागरिक आचारसंहिता भंगबाबत तक्रारी करू शकणार आहे. यावर आलेल्या तक्रारीवर फिरत्या पथकाने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तपासणी पथकाने गांजा, अवैध दारू किंवा इतर बाबतीत जप्तीची कार्यवाही करावी. बँकांनी रोख रक्कम वाहतूक करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. संपूर्ण निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी दक्ष राहावे. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम ही अत्यंत संवेदनशील आहे. याबाबत कोणतीही तडजोड करू नये. ईव्हीएमबाबत आलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी श्री. शेलार यांनी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली. श्री. महामुनी यांनी निवडणूक प्रक्रिया गांभीर्यपूर्वक घेऊन दररोज अहवाल सादर करावा, तसेच निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. प्रशिक्षणात श्री. गायकवाड यांनी आदर्श आचारसंहिता, श्री. खुळे यांनी सी-व्हीजील ॲप, शरद पाटील यांनी ईएसएमएस, श्री. पुरी यांनी निवडणूक खर्चाबाबत माहिती दिली. श्रीमती गोणेवार यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सूचना सांगितल्या.

00000

अधिकृत कंपनीमार्फत आरोग्य मित्राची नियुक्ती

बुलडाणा, दि. 28 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य मित्रांची नियुक्त करण्यात आली आहेत. काही संस्थाद्वारे आरोग्यमित्र नियुक्तीसंदर्भात जाहिराती व्हायरल होत आहे. अशा मेसेज, अफवा व भाम्रक जाहिरातीवर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांनी केले आहे.

जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी आरोग्य मित्रांची नियुक्ती अधिकृत विमा कंपनीकडून केली जाते. सद्यास्थितीत अधिकृत विमा कंपनीकडून नियुक्तीसंदर्भात कोणतेही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, तसेच केंद्र शासनाची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २०१८ पासून राज्यात राबविली जाते. रुग्णांना मार्गदर्शन करणे, तसेच प्रणालीवर रुग्णांच्या कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी आरोग्यमित्रांची नियुक्ती केली जाते. आरोग्य मित्रांची नियुक्ती विमा कंपनीच्या तृतीय पक्ष प्रशासकाव्दारे कार्यरत एम. डी. इंडिया, मेडी असिस्ट, पॅरामाऊंट व हेल्थ इंडिया इन्शुरन्स या चार कंपन्यांद्वारे केली जाते.

सदर दोन्ही योजना २०२० पासून एकत्रित करण्यात आल्या आहे. मागील काही दिवसांपासून विविध यंत्रणा व संस्थांद्वारे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने करीता आरोग्यमित्र नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती व संदेश व्हायरल होत आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात कंपनीकडून प्रसिद्ध झाली नाही. अशा अफवा, भ्रामक जाहिरातीला बळी पडू नये, याबाबत सजग रहावे, तसेच गरजू रुग्णांना मोफत मार्गदर्शनाकरीता 18002332200 वर संपर्क साधावा आणि आयुष्मान भारत beneficiary.nha.gov.in मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतः केवायसी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000






भाषेला महत्त्व आहेच, पण मातृभाषेचे  महत्त्व अतूट

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 28 : भाषा हेच एकमेव माध्यम आहे, ज्यामुळे एकमेकांसोबत जुळल्या जाते. त्यामुळे जगातील प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. मात्र मातृभाषेचे महत्व आतूट असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार संजिवनी मुपळे, माया माने, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बस्सीये, साहित्यिक विक्रांतसिंह राजपूत, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव वैशाली तायडे, नायब तहसीलदार प्रमोद करे, श्री. हिवाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच भाषा हा विषय कायम मागे असतो. भाषेची नीट तयारी केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरण व्यवस्थित नसते. मात्र प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. त्यातही जन्मल्यापासून मातृभाषा कायम कानावर पडत असते आणि हिच भाषा कायम कामाला येते. मातृभाषा शिकण्यासाठी कोणतेही कष्ट लागत नाही, मात्र परकीय भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. त्यामुळे मातृभाषेसह इतरही भाषा शिकाव्यात. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे. आज मराठी भाषा सर्व ठिकाणी उपयोगी आणता येऊ शकते. भाषा शिकताना विद्यार्थ्यांनी पाया मजबूत ठेवावा. शासनाने 2013पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे राज्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आपली कला, संस्कृती आदर्श असून हा वसा पुढे नेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक मार्ग शोधावा, कोणत्यातरी मार्गावर यश जरूर मिळेल.

वैशाली तायडे यांनी मराठी भाषेचा ऱ्हास होत असताना तिचे संवर्धन करण्यात येत आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून शिकावी. मात्र अस्सल जीवन जगताना मातृभाषा हिच कामी येते. मातृभाषेने समृद्ध भाषा जगली पाहिजे. मराठीच्या संवर्धनासाठी न्यायालयापासून शुभेच्छा देण्यासाठी मराठीचा उपयोग व्हावा. बडबड गीते आणि जात्यावरच्या ओवीनी मराठी भाषा विकसित झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने मराठीला विसरू नये, असे आवाहन केले.

विक्रांतसिंह राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला.  शिवचरित्रातून मराठी संस्कृतीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग स्फुर्तीदायक आहे. त्यांचा प्रत्येक पराक्रम हा आठवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन प्रामुख्याने मराठीतून समोर आले. त्यामुळे शिवाजी महाराज हा विषय डोक्यात घेण्याचा विषय आहे. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. मराठीचा सन्मान व्हायला हवा. शिवाजी महाराजांचा प्रताप मराठी भाषेसह ब्रज भाषेत कविराज भूषण यांनी रुपात मांडला आहे. त्यांनी त्यांच्या काव्यातून स्फुर्ती निर्माण केली आहे. शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून तो आता एक शक्ती आणि विचार झाला असल्याचे सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी प्रास्ताविकातून सर्वांनी मातृभाषा मराठीचे संवर्धन जाणिवपूर्वक करण्याचे आवाहन केले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मिनाक्षी पटेल, पूनम बसू यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले. तहसिलदार माया माने यांनी आभार मानले.

000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : दर महिन्यात पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील, असे पाठवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.

00000

कौशल्य विकास अंतर्गत बांधकाम कामगारांना संधी

बुलडाणा, दि. 28 : महाराष्ट्र इंटरनॅशनल आणि एनएसडीसी इंटरनॅशनल मार्फत इस्त्राईलमधील कुशल बांधकाम कामगारांसाठी नोकरीची संधी उपलबध करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेंतर्गत इस्त्राईलमध्ये कुशल बांधकाम कामगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींकरीता सुमारे 1.40 लाख ते 2 लाखापर्यत मासिक वेतन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक व्यक्तींना इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक व्यक्तींनी rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

बाल विकास कार्यालयाकडून भाडेतत्वावरील वाहनासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 28 : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालयाकडून भाडेतत्वावरील वाहनासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, बुलढाणा (दक्षिण) या कार्यालयासाठी भाडेतत्वावर वाहन घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. अटीशर्तीनुसार या कार्यालयासाठी भाडेतत्वावर वाहन घेणेकरीता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, बुलढाणा (दक्षिण), एकता नगर, नगर परिषद शाळेसमोर, बुलढाणा येथे दि. ६ मार्च २०२४ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मं. मा. पांचाळ यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment