Tuesday 20 February 2024

DIO BULDANA NEWS 19.02.2024

 आजपासून चिखलीत महासंस्कृती महोत्सव

* तालुका क्रीडा संकुलात तीन दिवस लोककलांचा उत्सव
* नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 19 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात दि. २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सव घेण्यात येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी, दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या महोत्सवाचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उद्‌घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, ॲड. आकाश फुंडकर, राजेश एकडे, श्वेता महाले, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोज, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी उपस्थित राहतील.
चिखली येथील तीन दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह कवी संमेलन, लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यात मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची मराठी, हिंदी गाणी सादर करतील. बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे कवी, हास्यकवी संमेलन होईल. त्यानंतर दीप्ती आहेर आणि समूह पारंपरिक लावणी सादर करतील. गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील.  
तसेच दि. 20 ते 22 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान येथे स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भजन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय याठिकाणी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे.
महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन संस्कृतीचे आदान-प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांनी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
बुलडाणा, दि. १९ : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अभिवादन केले. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी राज्य गीत सादर करण्यात आले. 
000000
चिखलीतील महासंस्कृती महोत्सवासाठी वाहनतळाची व्यवस्था
बुलडाणा, दि. 19 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चिखली येथील महासंस्कृती महोत्सवासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
या महोत्सवासाठी येणाऱ्या नागरीकांच्या वाहनांसाठी नगर परिषदेतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात अति महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी तालुका क्रिडा संकुलामागे स्व. पंढरीनाथ पाटील समाधीस्थळ परिसरातील खुले मैदान, तर नागरीकांच्या वाहनांसाठी क्रीडा संकुल समोरील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वसतीगृहातील खुल्या मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे
मंगळवारी, दि. 20 फेब्रुवारी रोजी शाहिर डी. आर. इंगळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची मराठी, हिंदी गाणी सादर करतील. कार्यक्रमापूर्वी ढोलताशा पथकाचे सादरीकरण होईल.
000000

No comments:

Post a Comment