Tuesday 13 February 2024

DIO BULDANA NEWS 13.02.2024

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांची पदभरती

बुलडाणा, दि. 13 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची सरळ सेवेची पदे फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून भरण्यात येत आहे. यासाठी दि. 3 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.

या पदभरती मध्ये कल्याण संघटक 40 पदे, वसतिगृह अधीक्षक 17 पद, कवायत प्रशिक्षक 1 पद, शारीरिक प्रशिक्षण निदेशक 1 पद, वसतिगृह अधिक्षिका 3 पदे, वसतिगृह अधिक्षिका गट क 3 पदे भरण्यात येणार आहे. या पदाकरीता सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नींना प्राधान्य देण्यात येणार आहे. उपलब्धता नसल्यास सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून वसतिगृह अधिक्षिका गट-क पदाकरिता अर्ज करू शकतील. या पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.

सदर भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे दि. 12 फेब्रवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून दि. 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रूपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार जोडणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 13 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार जोडणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दि. 21 फेब्रुवारी 2024 पूर्वी प्राधान्याने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन‍ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 2 हजार 704 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 8 हजार 326 शेतकऱ्‍यांचे आधार लिंकींग प्रलंबित आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सीएससी केंद्रामार्फत ई-केवायसी करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार सीडींग करण्याचे काम दि. 21 फेब्रुवारी 2024 पूर्वी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया प्रलंबित असल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार लिंकींग करणे आवश्यक आहे. आधार लिंकींग अभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

चर्मकार प्रवर्गातील युवकांना प्रशिक्षणाची संधी

बुलडाणा, दि. 13 : लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात दि. 20 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान बुलडाणा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयाचा समावेश राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षिताना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनाचा लाभ घेता येईल. या प्रशिक्षणातून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा, असा उद्देश आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान सातवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा मो. क्र. ८२७५०९३२०१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मध केंद्र योजनेच्या जनजागृतीसाठी आज शिबीर

बुलडाणा, दि. 13 : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मध केंद्र योजनेची माहिती देण्यासाठी बुधवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी जनजागृती शिबीराचे सायखेडा, ता. संग्रामपूर येथे सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना ही मधमाशापालन संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झाली आहे. या योजनेंतर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ नागरीक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतकरी, भूमीहिन, पारंपारिक कारागीर आदी घटकांना मध योजनेचा लाभ घेता येतो. तसेच मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजना राबविण्यात येतात. सदर योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मध योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तीना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सदर योजनांची माहिती होण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कृषी, वन विभाग, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयाचा सहभाग राहणार आहे. हा मेळावा नि:शुल्क आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी करून शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment