Thursday 1 February 2024

DIO BULDANA NEWS 01.02.2024

 नवमतदारांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*लोकसभा निवडणुकीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 1 : राज्यात येत्या कालावधीत लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. यात मतदान करण्यासाठी नवमतदारांना अद्यापही संधी आहे. यासाठी नवमतदारांनी पुढाकार घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, नुकत्याच झालेल्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये नवमतदारांनी नोंदणीसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे नवमतदारांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे. दि. १ जानेवारी २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण १ लाख ५ हजार ८८४ नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे.

मागील कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये १९ हजार ५९ मतदारांची नव्याने भर पडली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदारसंख्या ६ हजार ११८ होती. ती २३ जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत २५ हजार ९७७ इतकी आहे. तसेच २० ते २९ या वयोगटात २७ हजार २६ मतदारांची वाढ झाली आहे. तसेच प्रारूप यादीतील मतदार संख्या ३ लाख ७७ हजार ७४१ होती, ती अंतिम यादीत ४ लाख ४ हजार ७६७ इतकी झाली आहे.

तहसिल आणि मंडळस्तरावर प्रत्येक बुधवारी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून मतदारयादीमध्ये पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या पुनरीक्षण कार्यक्रमात दि. 1 ऑक्टोबर 2024 या तारखेस 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या युवकांना पूर्व नोंदणी करता आली. ही प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याने युवकांनी नाव नोंदणी करावी.

मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना ६ भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, तसेच सर्व राजकीय पक्षांनीही पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येणार आहे, तसेच मतदाता सेवा पोर्टल आणि वोटर हेल्पलाइन अॅपवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदारयादीमध्ये मतदारांनी आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

0000000

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मानधनावर पदभरती

बुलडाणा, दि. 1 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कत्रांटी पध्दतीने पदे नियुक्त करण्यात येणार आहे.

यात सभामंडप मॅनेजर 1 पद फक्त माजी सैनिक, सफाई कर्मचारी 1 पद माजी सैनिक, सिव्हिलियन यातून भरण्यात येणार आहे. या पदाकरीता इच्छुक सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या आणि पात्रता पूर्ण करत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपले अर्ज तात्काळ दि. ९ फेब्रुवारीपर्यंत आपल्या डिस्चार्ज बुक, पीपीओ, ओळखपत्र, एम्लायमेंट कार्ड व वैयक्तिक अर्जासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत.

सभामंडप मॅनेजर पदासाठी शिक्षण दहावी पास, सैन्य दलातील हुद्दा जेसीओ, तर मासिक मानधन हे २४ हजार ७९ रूपये राहणार आहे. सैन्य दलातील चारित्र्य हे कमीत कमी 'गुड', मेडिकल कॅटेगिरी शेप-१, वयोमर्यादा ५८ वर्षापर्यंत असावे. महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ४० शब्द पद असावे लागणार आहे. सफाई कर्मचारी पदासाठी शिक्षण दहावी पास, वयोमर्यादा ६० वर्षापर्यंत असून मासिक मानधन ११ हजार ८६९ रूपये राहणा आहे.

00000

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

बुलडाणा, दि. 1 : फेब्रुवारी महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशा पाठवाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.

000000

नियोजन कार्यालयातील पदभरती रद्द

बुलडाणा, दि. 1 : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयात ३ डाटा एंट्री ऑपरेटरची पदे ११ महिन्याकरीता कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत जाहिरात देण्यात आली. मात्र सदर भारती प्रक्रिया अपरीहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment