Wednesday 7 February 2024

DIO BULDANA NEWS 07.02.2024

 




जिल्ह्यात खामगाव, चिखली येथे महासंस्कृती महोत्सव

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

*राज्यातील संस्कृतीचे आदान-प्रदान

बुलडाणा, दि. 7 : पर्यटन व सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासनाच्या वतीने खामगाव आणि चिखली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव येथे दि. 12 आणि 13 फेब्रुवारी, तर चिखली येथे दि. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव होणार आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानात सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. सोमवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी संगीत रजनी होणार असून यात राहूल सक्सेना आणि त्यांचा संच मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील. मंगळवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनवर आधारीत महानाट्य ‘निश्चय पूर्तीचा महामेरू’ होणार आहे. तसेच शनिवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे.

चिखली येथे तालुका क्रीडा संकुलात मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कलाविष्कार महाराष्ट्राचा महानायक अनिरूद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करणार आहे. बुधवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम नक्षत्रांचे देणे कार्यक्रम सारेगम विजेता ऋषिकेश रानडे, फिल्मफेअर अवार्ड विजेती आनंदी जोशी आणि सहकलाकार सादर करतील. गुरूवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी जागर लोककलेचा कार्यक्रमात झाडीपट्टी ग्रुप दंडार, नंदकिशोर ग्रुप भारूड, इंगळे आणि सहकारी गोंधळ, पोवाडा, गणेश कदम वासुदेव कला सादर करतील. तसेच नामांकित कलाकारांचे कवि, हास्य संमेलन आणि दिप्ती आहेर यांचा लावणीचा कार्यक्रम सादर करतील. याच ठिकाणी रविवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे.

जिल्ह्यात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यातून लोकधारा आणि संस्कृतीचे आदान-प्रदान होणार आहे. तसेच लोककलांचे जतन होणार आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी

नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 7 : जानेवारी ते डिसेंबर २०२४मध्ये मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, तसेच मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाही अशा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार, आरक्षणाची सोडत काढण्याकरता विशेष ग्रामसभेची सूचना दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात येणार आहे. विशेष ग्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत दि. 9 फेब्रुवारी करण्यात येणार आहे. दि. 12 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसुचनेला (नमुना ब) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात येणार आहे. दि. 13 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी हा दि. 13 ते 16 फेब्रुवारी असणार आहे. उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन दि. 21 फेब्रुवारी पर्यंत अभिप्राय देणे अपेक्षित आहे. उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अंतिम अधिसूचना (नमुना अ) दि. 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांची मान्यता देण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देण्यात येणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, तसेच मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाही अशा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच वितरणाची अफवा

बुलडाणा, दि. 7 : बांधकाम कामगार यांना गृहपयोगी संच म्हणजेच भांड्याचा सेट मिळेल, अशा स्वरुपाची जाहिरात, व्हॉट्सअप मॅसेज जिल्ह्यामध्ये विविध माध्यमांद्वारे, तसेच विविध त्रयस्थ व्यक्तींकडून पसरविल्या जात आहे. ही अफवा असल्याने बांधकाम कामगारांनी याला बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई मार्फत विविध शैक्षणिक तसेच कल्याणकारी योजना विनामूल्य राबविल्या जातात. त्याबाबत कामगारांकडुन कुठल्याही प्रकारचे अर्ज कार्यालयात अथवा अन्य प्रतिनिधीद्वारा शुल्क आकारुन स्विकारले जात नाही, कामगारांचे विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे स्विकारण्यात येतात.

            गृहपयोगी संच देण्याची कोणत्याही प्रकारची योजना मंडळाकडून राबविण्यात येत नाही. अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी कोणत्याही व्यक्तीबरोबर रोख रकमेचे व्यवहार करु नये, तसेच कोणत्याही दलालांच्या अमिषाला बळी पडु नये, यात फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच पैश्याची मागणी करणाऱ्या व्यक्ती, त्रयस्थ व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी तथा उपकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आ. शि. राठोड यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येणार

बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यात दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षा चांगल्या वातावरणात होण्यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते दि. १९ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच दहावीची माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षा दि. १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात परीक्षा संचालन योग्यप्रकारे व्हावे, तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी परीक्षेपुर्वी दक्षता समिती मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परीसरातील कॉम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरु होण्यापूर्वी २ तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध राहणार आहे. यंत्रणा कार्यरत असून चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खातरजमा करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्राचे झूम व्हिडीओच्या माध्यमातून गैरप्रकार होऊ नये, यासाठी नियंत्रण केले जाणार आहे.

कॉपी मुक्त अभियान गैरमार्गाशी लढा या संदर्भात सर्व विभाग प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांस भेट देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये १६ परिरक्षक केंद्र राहणार आहे. सर्व परिरक्षक केंद्रावर सीसीटीव्ही कार्यान्वित असणार आहे. तसेच परिरक्षक केंद्रावरून पेपर घेतल्याची वेळ व पेपर जमा करण्याची वेळेबाबत सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

परिरक्षक केंद्रावरून पेपर घेऊन जाणे आणि जमा करण्यासाठी ज्या संस्था, शाळेचे परीक्षा केंद्र आहे, त्या शाळेच्या संस्था प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रसंचालकामार्फत नियुक्त असलेला रनर शिक्षक यांना चारचाकी वाहन देण्यात येणार आहे. त्यांना मोटारसायकलचा वापर करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये ११७ परीक्षा केंद्र राहणार आहे. यात मुले १९ हजार ३५१, मुली  १५ हजार ४०६ असे एकुण ३४ हजार ७६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण १५६ परीक्षा केंद्र राहणार आहे. यात मुले २२ हजार ६४ आणि मुली १८ हजार १९४ असे एकूण ४० हजार २५९ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाची बैठे पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. बैठे पथक परीक्षा सुरु होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावर पाठवेपर्यत थांबणार आहे. परीक्षेशी संबधित घटकांनी नियमबाह्य पद्धतीने मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व शातंतापूर्ण वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. परीक्षेत गैरप्रकारांना वाव मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन शैक्षणिक दर्जा घसरु शकते. भावी पिढी सक्षम होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावणे, टिकविण्यासाठी सदर परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, तणावमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी परीक्षेशी संबधित अधिकारी, कर्मचारी शिक्षकांनी पारदर्शकपणे कार्य करावे, तसेच पालकांनी पाल्यांना कॉपीमुक्त, तणावमुक्त वातावरणात परीक्षेकरीता प्रोत्साहित करावे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

000000

No comments:

Post a Comment