Tuesday 26 September 2023

DIO BULDANA NEWS 23.09.2023

 शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनवरील रोगाचे व्यवस्थापन करावे

*कृषी विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे. पिकाची उपादकता वाढावी, यासाठी शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकावरील रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बीटी कापसावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करताना पीक उगवणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर फेरोमन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यांमध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. तसेच मास ट्रॅपिंगकरिता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावे. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात त्यामुळे पुढील पिढ्यांची रोकथाम होईल.
प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के आढळून आल्यास किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडॉक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ज्याठिकाणी प्रादुर्भाव 10 टक्यापेक्षा जास्त आहे तिथे आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यात क्लोरानटीनीप्रोल 9.3 टक्के अधिक लॅमडासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडॉक्सकार्ब 14.5 टक्के अधिक अॅसिटामिप्रीड 7.7 टक्के 10 मिली फवारणी करावी.
सोयाबीनवरील खोडमाशी आणि चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे या दोन्ही किडींचे नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के आणि 6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के 3.0 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅब्डासायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी 2.5 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी स्पोडोप्टेरा व हेलीकोवर्पा किडीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व सापळ्यात अनुक्रमे स्पोडोल्युर व हेलील्युरचा वापर करावा. प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली किंवा फ्लुबेडाअमाईड 39.35 टक्के 3 मिली किंवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅमडा–सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीन पिकातील पिवळ्या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांमधील व बांधावरील तण नियंत्रण करावे. रस शोषणाऱ्या किडींना रोखण्यासाठी पिवळ्या चिकट सापळ्यांचा 15 x 30 सेंमी आकाराचे 10 प्रति एकर उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावेत. उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या पांढरी माशी व मावा या किडीच्या व्यवस्थापनासाठी फ्लूनिकामाईड 50 टक्के डब्ल्यूजी 3 ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम 25 टक्के डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करपा व इतर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी टुबेकॉनेझोल 10 टक्के अधिक सल्फर 10 टक्के 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनवर रोगांची लक्षणे आढळल्यास नियंत्रणाचे उपाय शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि बुलडाणा कृषि विज्ञान केंद्राने केले आहे.
00000

खामगाव येथील गुरुवार, शुक्रवारचा आठवडी बाजार रद्द
बुलडाणा, दि. 23 : गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने खामगाव शहरामध्ये गुरुवार, दि. 28 सप्टेंबर आणि शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.
खामगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीमध्ये 15 ते 20 हजार लोकांचा सहभाग असतो. तसेच याच दिवशी ईद-ए-मिलाद सण असल्याने उत्सव साजरा करण्यात येतो. खामगाव शहर संवेदनशील असून याच दिवशी खामगाव शहरामध्ये आठवडी बाजार भरविण्यात येतो. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, याकरीता खामगाव शहरामध्ये दि. 28 सप्टेंबर 2023 आणि दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, यासाठी खामगाव शहरामध्ये दि. 28 सप्टेंबर 2023 आणि दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.
000000
किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी
*कृषि विभागाचे आवाहन              
बुलडाणा, दि. 23 : किसान सन्मान योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि आधार जोडणी करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. 
किसान सन्मान आणि नमो योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे. किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी जिल्ह्यातील 9 हजार 80 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 19 हजार 225 शेतकऱ्‍यांचे आधार लिंकींग (सीडिंग) प्रलंबित आहे. ई-केवायसी आणि आधार लिंकींग अभावी हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार नाही.
किसान सन्मान आणि नमो योजनेची हप्ता वेळेत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग दि. 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000



जिल्हाधिकारी यांची लोणार सरोवराला भेट
लोणार सरोवर विकास आराखड्यातील कामांची पाहणी
बुलडाणा, दि. २३ : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज दि. 23 सप्टेंबर रोजी लोणार येथे भेट दिली. त्यांनी वनकुटी येथे यंत्रणांची आढावा बैठक घेऊन लोणार सरोवर विकास आराखड्यातील विकासकामांची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सरोवर परिसरात वृक्ष लागवड, चेनलिंक फेन्सिंग, पर्यटकांकरीता स्वच्छतागृह, सरोवरातील वेडीबाभूळ काढणे, अतिक्रमणे काढून सरोवराचे जतन करण्याची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देऊन सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना दिल्या. 
जुन्या सांडपाणी प्रकल्पातील पाणी सरोवरात जाणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा उपसा करणे, लोणार शहराकरीता पाणीपुरवठा योजना, पुरेसे व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत गटार योजना, स्मशानभूमी, भारतीय पुरातत्व विभागाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
लोणार सरोवरापासून समृद्धी महामार्ग जवळ असल्याने पर्यटकांसाठी येथे पोहोचणे सहज झाले आहे. त्यामुळे येथील पर्यटनक्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. सोबतच जैववैविध्याची काळजी घेऊन सरोवराचे संवर्धन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
यावेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गिते, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. शेळके, वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी प्रकाश सावळे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विभा वराडे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment