Tuesday 26 September 2023

DIO BULDANA NEWS 22.09.2023

 


गणेश विसर्जन शांततेत होण्यासाठी उपाययोजना कराव्यात

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*गणपती उत्सवाबाबत कायदा व सुव्यवस्थेची बैठक
बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिस विभागाने जिल्ह्याभरात बैठका घेतल्या आहे. मात्र तरीही गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार, दि. 21 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, उत्सवाच्या काळात जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी, यासाठी गणेश मंडळांच्या बैठका घेऊन सूचना देण्यात याव्यात. आगामी निवडणुका लक्षात घेता समाज विघातक प्रवृत्तीकडून बाधा होऊ नये, यासाठी तडीपारीच्या प्रकरणी निर्णय घेणे आवश्यक आहे. अशी प्रकरणेही निकाली काढण्यात यावी. तसेच या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेशही काढण्यात यावा.
येत्या कालावधीत गणेश विसर्जन महत्त्वाचे राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून गणेश विसर्जनाच्या स्थळाचे जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या ठिकाणी फलक लावण्यात यावे. विसर्जनासाठी मार्ग निश्चित करून देताना रस्त्याच्या मध्ये दुभाजक टाकण्यात यावे. तसेच विसर्जन स्थळी ॲम्ब्युलन्स, क्रेन, लाईट आदीची व्यवस्था करण्यात यावी.
जिल्ह्यातील खामगाव शहर अतिसंवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अभिवाथित राखण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. तसेच वीज वितरण कंपनीला विसर्जन काळात अखंडित वीज पुरवठा करण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच मार्गावरील विजेच्या तारा सुस्थितीत करण्याची तातडीने कारवाई करावी. विसर्जन कालावधीत मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावी. तसेच मिरवणुकीला अडचणीची होईल, असा कचरा, बांधकाम साहित्य त्या ठिकाणाहून हलविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
00000

पशुसंवर्धन विभागातर्फे वैरण बियाणे वाटप
*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. २२ : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे 
दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत वैरण बियाणे वाटप करण्यात येत आहे.
सन २०२३-२४ या वर्षात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम सर्वसाधारण योजनेतून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पशुपालकांना वितरीत करावयाच्या वैरण पिकाच्या सुधारीत प्रजातीच्या बियाणांचा प्रती लाभार्थी एक एकराच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर दिड हजार रुपयांच्या मर्यादेत पुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत वैरण बियाणांचा पुरवठा करताना लाभार्थ्यांकडे स्वतःची शेतजमीन आणि सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःची किमान ३ ते ४ जनावरे असावीत. 
या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी (वि), पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
000000

खाद्य पदार्थांमधील भेसळीची तक्रार करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. २२ : गौरी गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या दिवसामध्ये ग्राहकांकडून खाद्य पदार्थांची मागणी वाढते. यात भेसळीची शक्यता असल्याने ग्राहकांनी सजग राहुन खाद्य पदार्थांमधील भेसळीची तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खाद्य पदार्थांच्या मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे खाद्यतेले, तसेच खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये भेसळ निदर्शनास आल्यास यासंदर्भात तक्रार नोंदवावी. तक्रार करायची असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाचे fssai.gov.in या संकेतस्थळावर, तसेच FOOD SAFETY CONNECT हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्यावर तक्रार नोंदवावी.
खाद्य पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आल्यास नागरीकांनी संकेतस्थळ, ॲपवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
00000

दिव्यांगासाठी मिनी पिठाची गिरणी योजना
*१० ऑक्टोबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. २२ : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे ५ टक्के दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी १० ऑक्टोबर २०२३ पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२३-२४ या वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांकरीता मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज पंचायत समितीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरीता ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे दि. १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत सादर करावे लागणार आहे.
या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपूते आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
00000

स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
*30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार
बुलडाणा, दि. २२ : नाविन्यता सोसायटीमार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनाना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज आयोजन करण्यात येत आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगाना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप बळकट करणे, इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक संपदा हक्कासाठी अर्थसहाय्य ग्रेड चॅलेंज स्टार्टअप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे, त्यांच्या नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठबळ पुरवणे मुख्य उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या msins.in या संकेतस्थळावर स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेचे समन्वय करण्यात येत आहे. स्पर्थेसाठी जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थी स्पर्धेसाठी पात्र आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना msins.inschemes.msins.in या संकेतस्थळावर दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयास प्रत्यक्ष अथवा 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.
00000

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी एचआयव्हीबाबत जनजागृती करावी
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि. २२ : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ही एचआयव्ही, एड्स करीता कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था नॅको, नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. या संस्थेच्या सहकार्याने सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये एचआयव्ही, एड्स जनजागृती करण्याकरीता प्रत्येक गणेश मंडळामध्ये फलक लावण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळांनी स्वखर्चाने एचआयव्ही, एड्स जनजागृती करण्याकरीता दोन बॅनर्स गणेश मंडळामध्ये लावावेत. याबाबत अधिक माहितीसाठी भागवत कव्हळे, क्रमांक ९९२२३४३४६९ यावर संपर्क करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती यांनी केलेले आहे.
000000


शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविणार
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*फळबाग क्षेत्र दुप्पट करण्याचे लक्ष
*वैरण विकासाचा उपक्रम राबविणार
बुलडाणा, दि. २२ : शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरतील अशा योजना आणि उपक्रम एकत्रितपणे राबविल्यास शेतीच्या उत्पादकतेत निश्चितपणे वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीशी निगडित सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक गुरुवारी, दि. 22 सप्टेंबर घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावर्षीच्या खरीप हंगामाचा आढावा घेतला. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून या पिकावरील प्रादुर्भावाची माहिती घेतली. तसेच यावर करावयाच्या उपायोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात यावी, असे सागितले. जिल्ह्यातील सध्याची पावसाची स्थिती पाहता येत्या काळात चाराटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चाऱ्याच्या सुधारीत वाणांचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने अधिकचा निधी घेऊन वैरणासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी बांध-बंधिस्त करणे गरजेचे आहे. तसेच येत्या काळात जलयुक्त शिवार, वनराई बंधारे, नदी-नाले, तलाव खोलीकरण करणे आवश्यक आहे. पाणी अडवण्यासाठी जिल्ह्यात पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. हे बंधारे श्रमदानातून बांधण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात यावी. तसेच तलाव, नदी आणि नाल्यातील गाळ काढून शेतीमध्ये टाकण्यासाठी घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. जिल्ह्यात कृषी सौर योजना दोन हजार हेक्‍टरवर राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा टंचाई मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून कामे घेण्यात यावी. प्रत्येक गावात जलयुक्त शिवारचा उपक्रम राबविण्यात यावा. प्रामुख्याने खारपान पट्ट्यात शेततळे घेण्यात यावे. या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसायासोबत मत्स्यबीज उत्पादनही घेण्यात यावे. शेततळ्यांना अस्तरीकरण करण्यात यावे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यात यावा.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मदती आणि अनुदानाचे वाटप, तसेच लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई केवायसी अशा प्रलंबित बाबी सेवा सप्ताहामध्ये हाती घेऊन त्याचा मोठा प्रमाणावर निपटारा करावा. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणीला प्रोत्साहन देण्यात यावे. प्रत्येक शेतकऱ्याने नुकसानीचा फोटो काढून अपलोड करावा. शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होण्यासाठी पावसाच्या खंडाची माहिती कळविण्यात यावी. विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना मदत देण्यास अनुत्सुक असल्याने पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठीच्या आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात याव्यात.
जिल्ह्यात विविध उपक्रम राबविल्यानंतर पाण्याची उपलब्धता होत असल्यास जिल्ह्यात संत्रा आणि सिताफळ या पिकांचे क्षेत्र दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात यावे. तसेच उत्पादकता दीडपट  वाढवण्याचे लक्षांक ठेवावे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी गट, कंपनीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.
सध्या भरडधान्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके घेण्याऐवजी भरडधान्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करावे. तसेच सेंद्रिय शेतीसाठीही मार्गदर्शन करण्यात यावे. जिल्ह्यातील शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी नाविन्यपूर्ण सूचनाही देण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
000000

No comments:

Post a Comment