Monday 18 September 2023

DIO BULDANA NEWS 17.09.2023

 ‘मेरी माटी, मेरा देश’

'अमृत कलश'मध्ये सर्व घटकांना सहभागी करावे
 - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल
बुलडाणा, दि. 17 : 'मेरी माटी, मेरा देश'चा पहिला टप्पा यशस्वीपणे राबविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात अमृत कलश उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वस्तरातील नागरिकांकडून माती गोळा करण्यात येणार आहे. यंत्रणांनी जिल्ह्यातील सर्व घटकांना सहभागी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल यांनी दिल्या आहेत.
अमृत कलश हा उपक्रम गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, तसेच मातृभूमीच्या संरक्षणासाठी लढलेल्या शूरवीरांचा सन्मानार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी ते सर्वसामान्य नागरिकांकडून माती किंवा तांदुळ गोळा करण्यात येणार आहे. प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावात दि. 30 सप्टेंबरपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे. तसेच पंचप्रण शपथही देण्यात येणार आहे. 
आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकप्रतिनिधी, नागरिकांनी माती संकलन करुन अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटिल यांनी केले.
शासकीय यंत्रणांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून माती गोळा करावी. यात काही उपक्रम समारंभपूर्वक आयोजित करावेत. अमृत कलशात गोळा केलेली माती नवी दिल्ली येथे निर्माण करण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत समारंभपूर्वक विसर्जित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*अमृत कलश यात्रेविषयी*
पहिला टप्प्यात दि. 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येईल. यावेळी पंचप्रण शपथही घेतली जाईल. वाजतगाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे. 
दि.1 ते 13 ऑक्टोबरपर्यंत तालुकास्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. यावेळी जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा यावेळी गौरव करण्यात येईल.
दि. 22 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. दि. 27 ऑक्टोबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
दि. 28 ते 30 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "अमृत वाटिके"त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल. 
000000
कोतवाल पदभरतीचा कार्यक्रम निश्चित
*सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्त्वे जाहिर
बुलडाणा, दि. 17 : जिल्ह्यातील कोतवाल पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ही पदभरती सुरळीत होण्यासाठी सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्त्वे जाहिर करण्यात आली आहे. याबाबत दि. २५ सप्टेंबर रोजी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येणार आहे. 
सुधारीत कोतवाल पदभरती कार्यक्रमात रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कोतवालांचे सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्वे विहीत केली आहेत. 
कोतवाल पदभरतीसाठी सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्त्वे लागू राहणार आहे. यात कोतवाल पदासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक अर्हता चौथी पास इतकी असावी लागणार आहे. उमेदवार किमान १८ ते ४० वयोगटातील असावेत. कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती असणार आहे.
कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरताना १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न असणार आहे. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. 
नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीबाबत शासन निर्णयातील तरतूदींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्यानुसार आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात येणार आहे. सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्त्वानुसार कोतवालांची रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सहा उपविभागांतर्गत १३ तालुक्यात एकूण ५३५ तलाठी साजे अस्तित्त्वात आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील बिंदू नामावली मागासवर्ग कक्ष, आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडून मंजूर करून घेवून भरती राबवण्यात येणार आहे.
कोतवाल भरतीसाठी तहसिलनिहाय निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती अध्यक्ष हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राहणार आहे. संबंधित तालुक्याचे तहसिलदार सदस्य सचिव राहतील. संबंधित तालुकास्तरावरील गट अ किंवा ब दर्जाचा मागासवर्गीय अधिकारी आणि संबंधित तालुका स्तरावरील गट-अ किंवा ब दर्जाची महिला अधिकारी सदस्य राहणार आहे.
जिल्ह्यातील कोतवाल पद भरतीचा कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कोतवालांच्या रिक्त जागा भरण्याबाबत संबंधीत कार्यवाही करण्यात येणार आहे. निवड समिती व नियुक्ती प्राधिकारी यांनी कोतवालांचे मंजूर बिंदू नामावलीनुसार साज्यानिहाय रिक्त पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण दि. २१ सप्टेंबर २०२३ पूर्वी निश्चित करुन घ्यावी लागणार आहे. 
कोतवाल भरती कार्यक्रम - २०२३ नुसार कार्यवाही करण्यात येईल. आरक्षण निश्चीती ही दि. २१ सप्टेंबर २०२३ पूर्वी करण्यात येणार आहे. तहसिलदार दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरनामा प्रसिध्द करतील. उमेदवारांचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही दि. ६ ऑक्टोबर २०२३ राहणार आहे. अर्जाची छाननी करुन पात्र, अपात्र उमेदवारांची यादी गावनिहाय तयार करून दि. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहे.दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी आक्षेप निकाली काढून परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. रविवार, दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० पर्यंत लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक उत्तरतालिका दि. २३ ऑक्टोबर २०२३ प्रसिध्द करून अंतिम करण्यात येणार आहे. अंतिम उत्तरतालिका आधारे दि. २५ ऑक्टोबर २०२३ उत्तरपत्रिका तपासणी करण्यात येणार आहे. दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारुप निकाल प्रसिद्ध करून प्रारूप निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. प्रारुप निकालावर दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आक्षेप नोंदविणे, आक्षेप निकाली काढण्यात येणार आहे. दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम निकाल प्रसिध्द करून अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात देईल. निवड झालेल्या उमेदवारांना दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.
निर्धारीत केलेल्या कोतवाल भरतीच्या कालबध्द कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोतवालाची रिक्त पदे भरतांना सुसुत्रिकरण व समानता राखून कोणतीही अनियमितता होणार नाही किंवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवणार नाहीत, याची निवड समिती व नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटिल यांनी दिले आहेत.
००००००


नेहरु युवा केंद्राची भाषण स्पर्धा उत्साहात
बुलडाणा, दि. 17 : नेहरु युवा केंद्रातर्फे हिंदी दिवस व पंधरवाडा निमित्ताने जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा शासकीय अध्यापक महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हूणन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा लिंगायत, डॉ. हर्षानंद खोब्रागडे उपस्थित होते.
'गांधी का वैश्विक प्रभाव-आज के समय में गांधीवादी विचारों की प्रासंगिकता' या विषयावर स्पर्था घेण्यात आली. यात प्रथम हिवरा आश्रम येथील विवेक पिंजरकर, दुसरा अश्वीनी जाधव तर तृतीय क्रमांक पोखरी येथील अंजली औतकर यांनी पटकविला. प्रथम क्रमांक पटकविणारे विवेक पिंजरकर यांना दि.18 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. गुलाबराव सोनोने, डॉ.अनिल वरघट, रणजितसिंग राजपूत, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत उपस्थित होते. 
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुमित वाकोडे यांनी सूत्रसंचलन केले. अजयसिंग राजपूत यांनी संचलन मानले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, माजी स्वयंसेवक विलास सोनोने यांनी पुढाकार घेतला.
0000


प्रबोधनकार ठाकरे जयंतीनिमित्त 
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. १७ : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
नायब तहसीलदार प्रमोद करे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
000

No comments:

Post a Comment