Friday 1 September 2023

DIO BULDANA NEWS 01.09.2023

 ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात

एक लाख लाभार्थ्यांना मदतीचे वाटप

*17 कोटींची मदत होणार वितरीत

बुलडाणा, दि. 1 : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांपैकी ईकेवायसी झालेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पिक नुकसानीसाठी 71 हजार 545 लाभार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे. यात डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरीत 224 लाभार्थी, ऑक्टोबर 2021 मधील मेहकर तालुक्यातील 7 हजार 641 लाभार्थी, जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 66 हजार 931 लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आला आहे. तसेच येत्या काळात 62 हजार 854 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. तसेच एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या 826 लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.  

12 हजार एपीएल कार्डधारकांना डीबीटी द्वारे 54 लाख रूपयांचा लाभ देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 15 हजार 936 विविध प्रकारचे दाखले आणि एकाला अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह, महिला बाल कल्याण विभागातर्फे पिठाची गिरणी, शिलाई मशिन, प्रादेशिक मोटार परिवहन विभागातर्फे दिव्यांग व्यक्तीला मदत देण्यात येणार आहे.

कृषी विभागातर्फे अपघातग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना दहा लाख रूपयांचा विमा संरक्षण निधी देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणात  195 लाभार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 47 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील 1 हजार 192 लाभार्थींना 5 कोटी 41 लाख 27 हजार रूपये देण्यात येतील. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 3 हजार 134 लार्थींना 3 कोटी 24 लाख रूपयांचे वाटप करण्यात येतील. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत 1 कोटी 64 लाख 78 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, ड्रोन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तीक शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून पीएमएफई, एमकेएपीपीजी फंड, सीआयएफ बी लिंकेज, आदिवासी विकास विभाग, कामगार विभाग विभागातर्फे शैक्षणिक कल्याण,    सामाजिक कल्याण, सुरक्षा संच, जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्थसहाय्य, नगर परिषद बुलडाणातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात 25 लाख 50 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पीएम स्वनिधीचे वाटप करण्यात येणार आहे.

बुलडाणा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारार्थीं, जिल्हा अग्रणी बॅकेतर्फे पीएमएफएमई, मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र या 31 लाभार्थ्यांना 4 कोटी 17 लाख 14 हजार रूपये वाटप करण्यात येणार आहे.

000000





रविवारी बुलडाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

*कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा

बुलडाणा, दि. 1 : जिल्ह्याचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता मलकापूर रस्त्यावरील कऱ्हाडे ले आऊट, परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागील मैदानात होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचा खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला.

यावेळी आमदार संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कार्यक्रमास्थळी उभारण्यात आलेल्या स्टॉल, स्टेजची पाहणी केली. तसेच विविध विभागांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचे आवाहन केले.  खासदार प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रमासाठी लाभार्थी येणार आहे. त्यामुळे नियोजनात कोणतीही उणीव राहू नये. तसेच कार्यक्रम सुरळीत सुरू होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी महिला मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा प्राधान्याने उभारण्यात याव्यात. तसेच लाभार्थींना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी. लाभार्थी निवडताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे. कार्यक्रमात 30 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ तर 75 हजार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आमदार संजय गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी वाहनांसाठी पार्कींगची मुबलक व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

सुरुवातीला श्री. गिते यांनी, कार्यक्रमस्थळी विविध विभागांना 50 स्टॉल उभारण्यात आले आहे. सदर स्टॉल ताब्यात घेऊन या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावे. तसेच स्टॉलसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात यावा. तसेच कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना आणण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बसचा मार्ग ठरविण्यात यावा. तसेच लाभार्थ्यांच्या पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. लाभार्थ्यांना आणणे आणि नेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी वाहनतळांची माहिती दिली.

000000

‘शासन आपल्या दारी’साठी वाहनतळाची व्यवस्था

बुलडाणा, दि. 1 : शासन आपल्या दारी उपक्रमाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी बुलडाणा येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शासनाच्या योजनेची माहिती विस्तृत स्वरुपात प्रमाणावर प्रसार करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने तालुक्याच्या ठिकाणावरुन बुलडाणा शहरात येणाऱ्या वाहनाच्या पार्किंग ठिकाणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व तालुक्यामधून येणाऱ्या लाभार्थ्यांच्या एसटी बससाठी पार्किंगची सोय आयटीआय कॉलेजच्या मागील मैदानात करण्यात आली आहे. याठिकाणी 341 बस उभ्या करण्याची सोय करण्यात आली आहे. सर्व तालुक्यातील बचतगटाची वाहने हेंड सुझुकी शोरुमच्या बाजुला, मलकापूर रोड येथे करण्यात आली आहे. येथे 700 चारचाकी, 1000 दुचाकी वाहनांसाठी सोय केली आहे. सर्व तालुक्यातील शासकीय वाहनांना रिलायन्स मॉलच्या मागे, बुलडाणा रेसीडेन्सी समोरील मैदानात 300 चारचाकी आणि 100 दुचाकी थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोताळा, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातून राजूर घाटातून येणारी वाहने आरटीओ ऑफिसच्या बाजूला थांबविण्यात येतील. याठिकाणी 500 चारचाकी, 500 दुचाकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

शारदा विद्यापीठ आणि भारत हायस्कुल येथील पार्किंगमध्ये बुलडाणा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार तालुक्यातून बोथा मार्गे येणारी वाहने त्रिशरण चौक, सर्कुलर रोड, बाल शिवाजी कान्व्हेंट विद्यालयापासून उजवीकडे पार्किंग, चिखलीमार्गे येणारी वाहने सोसायटी पेट्रोल पंप, सर्कुलर रोड, बाल शिवाजी कान्व्‍हेंट विद्यालयापासून उजवीकडे पार्कींग. धाड आणि अजिंठामार्गे येणारी वाहने धाड नाका, सर्कुलर रोड, बाल शिवाजी कान्व्हेंटपासून डावीकडे पार्किंग. याठिकाणी 500 चारचाकी, 1000 दुचाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. शारदा विद्यापीठ व भारत हायस्कुल मैदानापासून कार्यक्रम ठिकाणी येण्या-जाण्याकरीता 4 बस ठेण्यात येणार आहे.

एसटी वर्कशॉप समोरील रिलायन्स पेट्रोल पंप, क्रीडा संकुल रोड मार्गे वळवून जिल्हा क्रीडा संकुलात पार्कींगची राखीव व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 500 चारचाकी, 500 दुचाकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

पार्किंग ठिकाणी आवश्यक सुविधा देण्यात येत आहे. मंडप, टेबल, खुर्च्या, पिण्याच्या पाणीची व्यवस्था, मेगा फोन, फिरते शौचालय/स्वच्छतागृह, पार्कींग ठिकाणी आवश्यक सुचना फलक, लाईट व्यवस्था (हायमास लॅम्प,इतर सुविधा), वॉकीटॉकी, पार्कींग ठिकाणी तालुका निहाय फलक, येणाचा व जाण्याच्या मार्गावर दिशा दर्शक फलक, कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहन पार्कींग केलेल्या जागेसंबंधीची माहिती फलक, पार्कींग ठिकाणी तालुक्यातील वाहनांना बुलडाणा शहरात कुठल्या ठिकाणी पार्कींग व्यवस्था केली आहे त्याबाबत माहिती,सुचना देण्यात याव्यात,

0000000

रविवारी ‘शासन आपल्या दारी’ मध्ये

पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 1 : बुलडाणा येथे रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी उपक्रमांत पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यात इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात मलकापूर रस्त्यावरील परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागे येथे रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यात दहापेक्षा अधिक उद्योजकांनी त्यांच्याकडील 940 पेक्षा अधिक पदासाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पुरुष, महिला उमेदवारांची निवड करणार आहे. या मेळाव्याद्वारे महिंद्रा, हिताची, डीएम इंटरप्रायझेस, आयसीआयसीआय, ब्रिटानिया या नामांकित कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महिंद्रा, हिताची, डीएम इंटरप्रायझेस, आयसीआयसीआय, ब्रिटानिया या नामांकीत कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकतील. इच्छुक उमेदवारांनी रविवार. दि. 3 सप्टेंबर रोजी आवश्यक कागपत्रांसह मुलाखत द्यावी, जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment