Monday 18 September 2023

DIO BULDANA NEWS 16.09.202


 नवमतदारांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
बुलडाणा, दि. १६ : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यात अर्हता प्राप्त नवमतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. 
या कार्यक्रमांतर्गत दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी आणि दि. 5. जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस 15 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. त्यानुसार मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त दि. 15 व 16 सप्टेंबर 2023 रोजी शाळा, महाविद्यालयामध्ये निवडणूक या विषयावर वकृत्त्व, रांगोळी, निबंध आदी स्पर्धाचे आयोजन करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सर्व तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तसेच शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासोबत समन्वय साधून शाळा, महाविद्यालयांमध्ये मतदार जनजागृतीपर स्पर्धा घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये दि. 15 व 16 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धांचे घेऊन मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  
पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने अर्हता धारण करणाऱ्या नवमतदार, दिव्यांग व तृतीयपंथी यांनी मतदार नोंदणी संबंधित तहसिल कार्यालय किंवा पंचायतस्तरीय अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधून ऑफलाईन पध्दतीने मतदारनोंदणी करावी, तसेच ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी वोटर पोर्टल, वोटर हेल्पलाईन अँपच्या माध्यमातून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000





'आयुष्मान भव' जिल्हास्तरीय अभियानास सुरुवात
पात्र लाभार्थ्यांपर्यंत आयुष्मान, आभा कार्ड पोहोचवावे
- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. १६ : जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची सर्वंकष जबाबदारी घेऊन त्यांना उपचारासाठी लागणारे सहकार्य करण्यात येत आहे. त्यासाठी 'आयुष्मान भव' योजनेतून पात्र लाभार्थ्याला आयुष्मान आणि आभा कार्ड देण्याचे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय 'आयुष्मान भव' अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खिरोडकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, 'आयुष्मान भव' हे अभियान राबविण्यात आशा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग राहणार आहे. आयुष्मान आणि आभा कार्ड वाटप करून प्रत्येकाला हे कार्ड मिळेल, याची खात्री देणे, हा अभियानाचा एक भाग आहे. चांगली आरोग्य सेवा पुरविणे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. 'आयुष्मान भव' अभियानातून अवयवदान मोहीम, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा व आयुष्मान सभा व अंगणवाडीमधील मुलांची तपासणी, असे उपक्रम राबवून नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून द्यावे.  
जिल्ह्यात तंबाखू मुक्तीचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. प्रधानमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हा 2024पर्यंत तंबाखू मुक्त होणार आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास बळकट व्हावा आणि त्यांना चांगल्या आरोग्य उपचाराची व्यवस्था निर्माण व्हावी. यातून आयुष्य निरामय जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी, तालुकास्तरावरील तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी आयुष्मान भव अभियानाबाबत नागरिकांना माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी 'आयुष्मान भव' अभियानाची माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी आयुष्मान भव अभियानात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती दिली.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात आभा व आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले. क्षयरोग रुग्णांना पोषण आहार वितरीत करण्यात आला.जिल्ह्यातील क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात मोलाचे कार्य करणाऱ्या निक्षय मित्रांचा देखील ह्यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थितांना तंबाखूमुक्ती व अवयवदानाची शपथ देण्यात आली. 
देशपातळीवरील व राज्यपातळीवर शुभारंभ कार्यक्रमात सहभागी 'आयुष्मान भव' अभियानाचा देशपातळीवरील शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच राज्य पातळीवर शुभारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत प्रमुख उपस्थित होते. दृकश्राव्य माध्यमाद्वारे या दोन्ही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
0000

No comments:

Post a Comment