Thursday 14 September 2023

DIO BULDANA NEWS 14.09.2023




 जिल्हा विकास आराड्यासाठी सूचना द्याव्यात

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि‍. 14 : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी जिल्ह्याची बलस्थाने ओळखून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जाणकारांनी सूचना द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज केले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्हा विकास आराखड्यासंदर्भात पत्रकारांशी विचारविनीमय केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी, जिल्ह्याचे बलस्थान ओळखून येत्या काळात त्यानुसार विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कृषि क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात महत्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करून नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचे राहणीमान सुसह्य होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील कृषि, पर्यटन, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक विकासासाठी या विविध क्षेत्रातील जाणकारांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील कृषि उत्पादनावर याच ठिकाणी प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी याठिकाणी गुंतवणूक झाल्यास रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना अभ्यासकांनी नोंदवाव्यात. जिल्ह्यातील नागरिक, संस्था आणि आस्थापना यात योगदान देऊ शकतील. केंद्र शासनाने सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे.

भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्ट्य जाहीर केले आहे. सन 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट, तसेच 2047 पर्यंत संपूर्णपणे विकासित राष्ट्र होणे गरजेचे आहे. विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टीकोन विकसित करणे शक्य होईल, असा सर्वसमावेशक विकास राहणार आहे. तसेच शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूक आणि विकासाला चालना देऊ शकणाऱ्या बाबीबाबत नागरिकांचे अभिप्राय घेतले जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी आणि संलग्न सेवा, वस्तूनिर्माणासह उद्योग, जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन आदी क्षेत्रांच्या वृद्धीबाबत अभिप्राय. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करावयाचे आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजना आणि अभिप्राय जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

00000

दिड हजार मतदार असणाऱ्या मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण

*मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

बुलडाणा, दि. 14 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. एक हजार 500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण आणि पुनर्रचना करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. 1 जून 2023 ते दि. 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीकरिता निर्धारित केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि. 22 ऑगस्ट 2023 ते दि. 29 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये मतदानकेंद्राचे स्थान आणि संबंधित यादी भागाची संपूर्ण प्रत्यक्ष पडताळणी करून मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण करण्यात येणार आहे.

मतदानकेंद्रावर 1 हजार 500 पेक्षा जास्त मतदार आहेत, अशा मतदान केंद्रावर, मतदान केंद्राचे मतदान केंद्र मार्गदर्शक सूचना 2022 मधील सुचनांना अनुसरून सुसूत्रिकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये नवीन मतदान मतदान केंद्र तयार करताना शक्य असेल तितक्या जास्तीत जास्त भागाचे समायोजन नजीकच्या मतदान केंद्रात करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. ज्या मतदान केंद्रावर 1 हजार 500 पेक्षा जास्त मतदार आहेत, अशा मतदान केंद्रावरील मतदार नजीकच्या मतदान केंद्रात समायोजित होत नसल्यास नवीन मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. तसेच मतदान केंद्राच्या ज्या इमारती खराब झालेल्या किंवा मोडकळीस आलेल्या आहेत, अशा मतदान केंद्राचे इतर शासकीय इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.

एक हजार 500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रावरील मतदार नजिकच्या मतदान केंद्रात समायोजित करताना कुटुंबातील सर्व सदस्य एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी ठेवले जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी कळविले आहे.

00000

उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

*दि. 15 सप्टेंबर अंतिम मुदत

बुलडाणा, दि. 14 : राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांना दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

राज्यभरातील ४४ गणेशोत्सव मंडळांमधून पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २.५० लाख रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज  pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच या स्पर्धेत जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

00000

ई-टेंडरींग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

बुलडाणा, दि. 14 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणारा सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींमध्ये  उद्योग वाढीला चालना देऊन शासकीय व इतर संस्थेची कामे करण्यासाठी ई-टेंडरिंग प्रशिक्षण कार्यक्रम बुधवार, दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे.

एक दिवसीय प्रशिक्षणातून सुशिक्षित बेरोजगारांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात ई-निविदा धोरण, सरकारी कंत्राटदार, सरकारी खरेदी धोरण, ई-निविदा शोधणे, ई-निविदा दाखल करणे, डेमो आणि दस्ताऐवज अपलोड करणे, डिजिटल स्वाक्षरी, शासकीय कार्यालयामध्ये नोंदणी, महाटेंडर पोर्टलवर नावनोंदणी, प्रोफाइल व अकाऊंट  करणे, ई-निविदा पाठपुरावा, ईएमडीचा फॉलोअप, बँक गॅरंटी, बँक सॉल्व्हेंसी आणि बोली क्षमता बीओक्यू  तयार करणे, तसेच उद्योग सुरु करण्यासाठी सहकार्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य आणि उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहिती आदीबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षणासाठी नोंदणी आणि अधिक माहितीसाठी गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा, मोबाइल क्रमांक ८२७५०९३२०१, ८६०५५३२१२७ यांच्याशी  संपर्क साधावा, असे आवाहन  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

000000

        गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन

बुलडाणा, दि‍. 14 : यावर्षीचा गणेशोत्सव दि. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. संपूर्ण राज्यात हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येतो. हा गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी करावयाच्या उपययोजना व मार्गदर्शन जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मागील वर्षीप्रमाणे गणेश मुर्तीचे उंचीवर बंधन राहणार नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना आकर्षक पद्धतीची सजावट, देखावे, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मुभा आहे. श्री गणेश मंडळाचे मंडप, सजावट आदींची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी तथा ठाणेदार यांनी करुन मंडप उभारणी तथा सजावट व्यवस्थित असल्याची खात्री करावी.

गणेशोत्सवादरम्यान संवेदनशील ठिकाणी आवश्यकतेनुसार कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करुन त्याबाबतची खात्री उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी यांना करावी लागणार आहे. तसेच अतिसंवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी नेमण्याची आवश्यकता भासल्यास तसा प्रस्ताव तात्काळ जिल्हादंडाधिकारी कार्यालय पाठवावा लागणार आहे. श्री गणपती उत्सवाचे दरम्यान पिण्याचे पाणी पुरवठा मुबलक व नियमितपणे केल्या जाणार आहे.

श्री गणपती उत्सवादरम्यान वीज पुरवठा अखंड सुरु राहण्याची दक्षता वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. याबाबत ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सवाचे दरम्यान कोठेही उघड्यावर मास विक्री केल्या जाणार नाही, तसेच जिल्ह्यात गणपती स्थापना दि. 19 सप्टेंबर 2023 आणि विसर्जन दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी मांस विक्री होणार नाही, याची दक्षता उपआयुक्त पशुसंवर्धन, नगरपालिका, पोलीस यंत्रणा घेणार आहे. ग्रामीण भागात पोलीस पाटील, सरपंच याबाबत कार्यवाही करतील.

गणपती उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरे वास्तव्यास राहणार नाहीत, याची दक्षता नगरपालिका व पोलीस यंत्रणा घेणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरी भागातील रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवण्याची दक्षता जिल्हा शल्य चिकीत्सक, आणि जिल्हा आरोग्य अधिकारी घेणार आहे. श्री गणेश स्थापना आणि विसर्जनाचे दिवशी शहरी किंवा ग्रामीण भागातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, तसेच विद्युत मंडळाचे अधिकारी  व कर्मचारी हे त्यांचे मुख्यालय सोडणार नाही, याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल.

 श्री गणेश स्थापना आणि विसर्जनाचे दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी दारुची दुकाने, बिअर बार, परवाना कक्ष कटाक्षाने बंद ठेवण्याची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक करतील. बंदचे दरम्यान अवैध दारुविक्री होणार नाही, याची दक्षता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणा घेणार आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबधिताविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात येणार आहे.

महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन संयुक्तरित्या करावे. श्री गणपती उत्सवाचे दरम्यान आक्षेपार्ह कापडी फलक सार्वजनिक ठिकाणी तसेच मंडप दरम्यान लावले जाणार नाहीत, याची दक्षता पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी घ्यावी. आढळल्यास तात्काळ हटविण्याची कार्यवाही करावी. श्री गणेशोत्सवाचे दरम्यान जिल्ह्यात कोठेही लॉटरी, कुपन्स, लकी ड्रॉ तसेच विविध आमिषे असलेली लॉटरी काढल्या जाणार नाही, याची दक्षता पोलिस अधिकाऱ्यांनी करावी लागणार आहे.

नवीन गणेश मंडळाची नोंदणी, नुतनीकरण, हिशोब तपासणीची कामे धर्मादाय उप आयुक्तांनी यंत्रणेमार्फत तालुक्याच्या ठिकाणी शिबिर आयोजित करुन तातडीने करावी. श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांची तपासणी करुन घेतल्याची खात्री करुन घेतल्याशिवाय मिरवणूकीत सामील होण्याची परवानगी संबंधीत ठाणेदार यांना देता कामा नये. श्री गणेश उत्सवाचे दरम्यान जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करुन कृत्रिम टंचाई निर्माण केल्या जाणार नाही याची दक्षता महसूल अधिकाऱ्यांनी घ्यावी. असे प्रकार घडत असल्यास पोलिस अधिकाऱ्यांनी व महसूल अधिकाऱ्यांनी छापे घालून गुन्हे नोंदवावेत, केरोसीनची अवैधरीत्या विक्री होणार नाही, याची दक्षता जिल्हा पुरवठा अधिकारी. घेणार आहे.

गणेशोत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

ग्रंथालयातील ग्रंथांची नोंद करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि‍. 14 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे ग्रंथांची विहित नमुन्यातील एमएस एक्सेलमध्ये नोंद करण्यासाठी पुरवठादार व्यक्ती, संस्थाकडून दरपत्रक मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी यासाठी दरपत्रक भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथील कार्यालयात उपलब्ध असलेल्या सुमारे 1 लाख 32 हजार 765 ग्रंथसंपदेची विहित नमुन्यातील विवरणपत्रात एमएस एक्सेल शिटमध्ये ऑफलाईन पद्धतीने काम करुन देण्यास इच्छुक असलेल्या अनुभवी कंत्राटदार संस्था अथवा व्यक्तीकडून अटी व नियमांच्या अधिन राहून दरपत्रक मागविण्यात येत आहे.

ग्रंथांची नोंदणी करणे, बारकोड लेबलचे स्टीकर लावणे, ग्रंथ संग्रहाची दाखल नोंद क्रमाने कपाटामध्ये मांडणी करणे आदी कामे करावयाची आहेत. सदर काम बाह्य यंत्रणेकडून करावयाचे आहे. शासनाने निर्गमीत केलेले शासन परिपत्रकांमध्ये नमूद सूचनांचया अधीन राहून केवळ करार पद्धतीने काम करुन देण्यास इच्छुक असलेल्या अनुभवी कंत्राटदार संस्था अथवा व्यक्तीकडून अटी व नियमाच्या अधिन राहून दर पत्रक मागविण्यात येत आहे. कामाचा तपशील प्रती ग्रंथाची संगणकामध्ये ग्रंथसूचीत नोंद किंवा डाटा एंट्री करणे, मराठी, हिंदी, इंग्रजी, प्रत्येक ग्रंथाचा ई-ग्रंथालय आज्ञावलीमध्ये बारकोड जनरेट करणे व बारकोड स्टिकर प्रत्येकी दोन नग लेसर प्रिंटर, पेस्टींग करणे व दाखल नोंदीनुसार कपाटांमध्ये मांडणी करुन द्यावी लागणार आहे.

सदरचे काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्ती, संस्थांनी मोहोरबंद लिफाफ्यामध्ये आपले दरपत्रक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. 18 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत, निविदा मंजूर करणे अथवा नाकारणे अथवा निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी राखून ठेवले आहे.

000000

No comments:

Post a Comment