Friday 15 September 2023

DIO BULDANA NEWS 15.09.2023

 प्रधानमंत्री कुसुम योजनेतील त्रृटीची पुर्तता करण्याचे आवाहन

*शेतकऱ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत मुदत

बुलडाणा, दि. 15 : प्रधानमंत्री कुसुम योजना घटक-ब योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज नोंदणी केली आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रृटी असल्याने अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी रविवार, दि. 24 सप्टेंबरपर्यंत त्रृटीची पुर्तता करावी, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक प्रफुल तायडे यांनी केले आहे.

कुसुम योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे एकुण 24 हजार 987 ऑनलाईन अर्ज महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर नोंदणी झाले आहे. त्यापैकी 2 हजार 332  लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच 2 हजार 528 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रृटी असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. याबाबतची माहिती कुसुम पोर्टलवरून एसएमएसद्वारे लाभार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आली आहे.  तसेच महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्याकडून सर्व लाभार्थ्यांना त्रृटीची पुर्तता करण्यासाठी भ्रमणध्वनी आणि पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

            त्रृटी असलेले अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती येथे कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2452311 वर संपर्क करून अर्जामधील त्रृटींची पूर्तता करावी किंवा युजर नेम आणि पासवर्डचा उपयोग करून ऑनलाईन पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करावी, यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर kusum.mahaarja.com/benefhome भेट द्यावी, विहित मुदतीत त्रृटीची पूर्तता केली नसल्यास अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.

000000

लेख

व्यवसाय कर्जावरील व्याजाचा शासनाकडून परतावा

*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना

मराठा समाजातील बेरोजगार युवकांमध्ये उद्योजकता वाढावी, यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येते. यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदारांना कर्जावरील व्याजाचा परतावा देण्यात येतो.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आर्थिक मागास प्रवर्गातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येते. महामंडळाने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता अभियानातून मराठा समाजातील युवक-युवतींना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शेतीपूरक व्यवसायासोबत सेवा, उत्पादन, व्यापार आणि विक्री आणि ट्रॅक्टर व्यवसायासाठीच्या कर्जावर व्याज परतावा देण्यात येतो. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 15 लाख रूपयांपर्यंत, तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाखापर्यंत 12 टक्केच्या मर्यादेत कमाल 7 वर्षासाठी व्याज परतावा देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी राज्याचा रहिवासी असावा. वयोमर्यादेची अट महिला व पुरुष दोघांसाठीही 18 ते 60 वर्षे आहे. लाभार्थींना महामंडळाचे संकेतस्थळ udyog.mahaswayam.gov.in यावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. व्याज परतावा महामंडळाकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक युवकांनी आपले विविध प्रकारचे व्यवसाय उभे केले आहेत. लाभार्थी नियमित हप्ते भरत असल्यास त्यांना व्याज परतावा देण्यात येतो. जिल्ह्यातील युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, आवश्यक असल्यास अण्णासोहब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाशी संपर्क करावा.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

00000

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन

बुलडाणा, दि. 15 : जिल्ह्यात कापसाच्या लागवडीचे प्रमाण अधिक आहे. सध्यास्थितीत कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

कृषि विभाग व शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, सद्यस्थितीत कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. विशेष करून ज्या शेतांमध्ये पेरणी ही जूनच्या पहिल्या आठवड्यात केली आहे, अशा कपाशीवर सध्या फुले पात्या व लहान बोंडे आहेत. त्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव निदर्शनास आला आहे. कपाशीच्या शेतामध्ये जी फुले उमललेल्या अवस्थेत किंवा डोमकळी सदृश्य अवस्थेत होती, अशा प्रत्येक फुलात गुलाबी बोंड अळी आढळून आली, असे फुल अलगदपणे निघून येते. ती फुले काढून बघितली असता गुलाबी बोंड अळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलामधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आलेली आहे. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव सद्यस्थितीत ५ ते १० टक्के आढळून आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे, त्यांनी देखील निरीक्षण करणे गरजेचे आहे, असा प्रादुर्भाव इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता आहे. आपल्या पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात.

ज्या भागात कपाशीचे पीक ५० ते ६० दिवसांचे किंवा त्यापेक्षाजास्त मोठे झालेले आहे, तेथे कपाशीला फुले लागण्यास सुरुवात झालेली आहे, अशा परिस्थितीत गुलाबी बोंड अळीचा मादी उमलत असलेल्या फुलांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. त्यातून दोन ते तीन दिवसात सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात, उमळणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्याच्या सहाय्याने बंद करून अळी फुलांमध्ये उपजीविका करते. प्रादूर्भावग्रस्त फुले न उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. ती आपण सहज ओळखू शकतो, अशी प्रादूर्भावग्रस्त फुलाला 'डोमकळी' म्हणतात. त्यात हमखास गुलाबी बोंड अळी आपली उपजीविका करताना दिसते. फुलाच्या आतील भाग अळीने खाल्ल्यामुळे बहुदा फुलांचे रूपांतर बोंडामध्ये होत नाही. ते गळून पडतात व फुलाचे रूपांतर बोंडामध्ये झाल्यास अळी बोंडामध्ये शिरून पोखरते व त्यामुळे नुकसान होते.

शेतकऱ्यांनी उपाययोजनांमध्ये मिश्र खते व संजीविकांचा शिफारसी प्रमाणेच काटेकोर वापर करावा, गुलाबी बोंड अळीवर पाळत ठेवण्यासाठी पीक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर फेरोमन सापळयांचा वापर करावा यासाठी एकरी २ किंवा हेक्टरी ५ फेरोमन सापळे लावावे व सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये ८ ते १० पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करिता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे वापरावेत.

पिकातील डोंमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात म्हणजे पुढील पिढ्यांची रोखताम करता येईल. पीक उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडीरेक्टीन ३००० पीपीएम ४० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पीक उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा ट्रायडीबॅकटरी किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र कीटकांची १ लाख ५० हजार अंडी प्रती हेक्टरी चार वेळा सोडावीत. फुलांमध्ये प्रादुर्भाव ५% पर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५% ए.एफ २५ मिली. किंवा क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही २५ मिली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव ५ ते १० टक्के आढळून आल्यास किंवा क्विनॉलफॉस २०% ए.एफ. २५ मिली. किंवा  क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही २५ मिली. किंवा प्रोफेनोफोस ५० % ३० मिली. किंवा इंडॉक्साकार्ब १५.८% १० मिली. यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव १० टक्के पेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (क्लोरानटीनीप्रोल ९.३ % + लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ %) - ५ मिली. किंवा (क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५ टक्के) - २० मिली. किंवा (इंडॉक्साकार्ब १४.५ टक्के + ॲसिटामिप्रीड ७.७ %)- १०  मिली. सदर प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंनी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment