Wednesday 13 September 2023

DIO BULDANA NEWS 13.09.2023

 



जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यालयाची पाहणी

बुलडाणा, दि. 13 : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागांची पाहणी केली. प्रामुख्याने परिसरातील जुन्या इमारतीमधील विभागांची पाहणी दुरूस्ती आणि देखभालीच्या सूचना यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास केली.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पाणीटंचाई, भूसंपादन, नोंदणी शाखा, नैसर्गिक आपत्ती, सेतू, बैठक हॉल, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे दालन, अभिलेख कक्ष आदीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, तहसिलदार संजिवनी मोफळे, उपविभागीय अभियंता श्री. एकडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सध्या असलेल्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात याव्यात. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करावे. जुन्या इमारतीमधील मोडक्या दरवाजे आणि खिडक्या बदलविण्यात याव्यात. नवीन खिडक्या बसविताना त्या उघडणाऱ्या असाव्यात. नोंदणी शाखेचे कामकाज संगणकीकृत करण्यावर भर देण्यात यावा, यासाठी आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध करून ई-ऑफीस प्रणालीचा उपयोग कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

अभिलेख कक्षामधील उपलब्ध कागदपत्रे स्कॅन करून जतन करण्यात यावीत. तसेच ही कागदपत्रे सहज शोधता येतील, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. इमारतीमधील नादुरूस्त भागाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. तसेच इमारतीमध्ये दुरूस्तीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी. तसेच नादुरूस्त आणि उपयोगात नसलेली संगणक आणि इतर साधने जमा करून त्याची विल्हेवाट करावी. इमारतीची स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना सोयीचे होईल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000





जिल्हास्तर शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 13 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तर शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा 14, 17, 19 वर्षाआतील मुलेमुलींच्या क्रीडा स्पर्धा दि. 12 ते 13 सप्टेंबर 2023 दरम्यान शेगाव येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालयात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, पी. एन. कोल्हे उपस्थित होते. श्री. यादव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून पी. एन. कोल्हे, तर शेखर खराटे, श्री. चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले. उद्घाटन कार्यक्रमाला श्री. सिरास, संकेत धामंदे, तसेच विविध शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्यातून 26 संघानी सहभाग नोंदवला. तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले.

00000

नेहरू युवा केंद्रातर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा

बुलडाणा, दि. 13 : नेहरु युवा केंद्रातर्फे शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे

या स्पर्धेत ‘महात्मा गांधी - आज की दुनिया में गांधीवादी विचारों की प्रासंगिकता’ हा आहे. स्पर्धेसाठी दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी वय 18 ते 29 असावे. तसेच स्पर्धेसाठी भाषा हिंदी, इंग्रजी असणार आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा विजयी स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र राहणार आहे. राज्यस्तरावरील विजयी स्पर्धकांना दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्ताने आयोजित लोकसभेतील कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी दि. 14 सप्टेंबर 2023 पर्यंत आपली नावे नेहरु युवा केंद्र कार्यालयात नोंदवावीत, अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

00000

डाक अदालतीचे शुक्रवारी आयोजन

            बुलडाणा, दि. 13 : डाक घर अधीक्षक कार्यालयातर्फे शुक्रवारी, दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा आणि ग्राहकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमधील काही त्रृटीमुळे काही प्रसंगात पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार होतात. तक्रारींचा योग्यप्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खाते डाक अदालत घेते. यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.

            पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाते. टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डरबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबतची तक्रार डाक घर अधीक्षक गणेश आंभोरे, बुलडाणा विभाग, बुलडाणा 443 001 यांचे नावे दोन प्रतीत दि. 14 सप्टेंबरपर्यंत पोहचतील, असे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

अध्यापक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती

बुलडाणा, दि‍. 13 : बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहाय्यक प्राध्यापक नियुक्ती साठी अध्यापन शास्त्रात गणित व विज्ञानसाठी पदसंख्या 1 असून शैक्षणिक अर्हता एमएससी, एमएड्, नेट, सेट, शिक्षणशास्त्रात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी सकाळी 11 ते 12 यावेळेत मुलाखत होणार आहे. आरोग्य आणि शारिरीक शिक्षणामध्ये आरोग्य आणि शारिरीक शिक्षणासाठी पदसंख्या 1 असून, शैक्षणिक अर्हता एमपीएड, योग शिक्षण असणे गरजेचे असून नेट, सेट, शारिरीक शिक्षणात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. उपयोजित कलासाठी उपयोजित कला पदासाठी पद संख्या 1 असून शैक्षणिक अर्हता उपयोजित कलामधील पदव्युत्तर पदवी किंवा एमएफए नेट, सेट, उपयोजित कलेमध्ये पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. ललित कला शिक्षकासाठी द्रुक कला साठी पद संख्या 1 असून शैक्षणिक अर्हता एमएफए नेट, सेट, दृक कलेमध्ये पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी संपुर्ण माहितीसह अर्ज आणि आवश्यक त्या मूळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायाप्रतीसह वेळापत्रकानुसार स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. घड्याळी तासिका तत्वावरील नियुक्ती ही शैक्षणिक सत्र 2023-24 साठी राहणार आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतरच मानधन देय होईल. घड्याळी तासिका मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहील. अर्जाचा नमुना gcebedbuldan.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा लिंगायत यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment