Thursday 7 September 2023

DIO BULDANA NEWS 07.09.2023

 


राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त अभिवादन

बुलडाणा, दि. 7 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर, सुरेश खोडके, सपना मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

000000

सार्वजनिक गणेशोत्सवांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा

*जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : येत्या दि. 19 सप्टेंबरपासून जिल्ह्यात गणेशोत्सवा साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

श्री गणेश चर्तुथी दि. 19 सप्टेंबर ते अनंत चतुर्दशी दि. 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या दृष्टीकोणातून योग्य उपयायोजना अंमलात आणण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सवाच्या मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा. तसेच कृत्रिम तलाव निर्माण करुन त्यामध्ये मुर्त्यांचे विसर्जन करावे. मुर्त्यांच्या विसर्जनामुळे नैसर्गिक जलास्त्रोत प्रदूषित होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

होमगार्डच्या वाहनांचा जाहिर लिलाव

बुलडाणा, दि. 7 : जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या निर्लेखित करण्यात आलेल्या चार वाहनाचा जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. इच्छुकांनी दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील निर्लेखन झालेल्या वाहनांची विक्री लिलावाने करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक नागरिकांनी दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा होमगार्ड कार्यालय, चिखली रोड, बुलडाणा येथे उपस्थित राहावे. जाहिर लिलावाने विक्री करावयाचे वाहने ही जिल्हा समादेशक होमगार्ड, बुलडाणा यांचे कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत ही वाहने पहावयास मिळतील. त्याच दरम्यान लिलावाच्या अटी आणि शर्तीबाबत पत्रक दाखविण्यात येणार आहे.

या लिलावाचे सर्व अधिकार लिलाव समितीकडे राहतील. लिलावात ट्रुफ कॅरियर टाटा-407, वाहन क्रमांक एमएच 28 सी 6122, मॉडेल वर्ष सन 2005, टाटा स्पेसीओ जीप क्रमांक एमएच 28 सी 6112 मॉडेल वर्ष सन 2004, कंमाडर पिजोड जीप क्रमांक बीएलबी 4638 मॉडेल वर्ष सन 1987, जीप ट्रॉली क्रमांक एलएमव्ही 5741, मॉडेल वर्ष सन 1987 या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

या लिलावात इच्छुकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक आणि अपर जिल्हा पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी केले आहे.

000000

लेख

50 स्टॉल, शेकडो योजना

‘शासन आपल्या दारी’च्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी 50 स्टॉल्स उभारण्यात आले. याठिकाणी जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयांनी आपआपल्या कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. एकूण 50 स्टॉलमधून शेकडो योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले.

कार्यक्रमस्थळी हजारो नागरिक येणार हे गृहित धरून याठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणारे 50 स्टॉल उभारण्यात आले. यात कामगार, महावितरण, कृषी, मत्स्य, आदिवासी विकास, बँक, समाज कल्याण, कौशल्य विकास, उमेद, उप प्रादेशिक परिवहन, माविम, नोंदणी व मुद्रांक, उद्योग केंद्र, संजय गांधी योजना, पुरवठा, निवडणूक आदी विभागांनी स्टॉल्स उभारून या‍ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

कृषी विषयक माहिती देणाऱ्या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. याठिकाणी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेली माहिती एका मॉडेलमध्ये दाखविण्यात आली. या मॉडेलला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. सुमारे साडेसात हजार नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली. अग्रणी बँकेनी याठिकाणीच जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून विमा काढण्याची सोय करून दिली. समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे वितरण केले. दोन हजाराहून अधिक नागरिकांना पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. कौशल्य विकास विभागाने उपस्थित युवकांना नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीला कशाप्रकारे समोर जावे, याबाबत समुपदेशन केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दोन हजाराहून अधिक नागरिकांना दिली.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सारथी आणि वाहन पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या फेसलेस सुविधांची माहिती देण्यात आली. विभागाच्या अर्ज प्रक्रियेमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून घरबसल्या सुविधांचा लाभ मिळत असल्याबद्दल माहिती देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टॉलवर जिल्ह्यातील बचतगटाने तयार केलेले उत्पादन आणि त्यासाठी बनविण्यात आलेल्या कॅटलॉगमध्ये उत्पादनाची संपूर्ण माहिती देण्यात आली. मुद्रांक व नोंदणी विभागाने सलोखा योजनेची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने अलिम्को तर्फे देण्यात येणाऱ्या कृत्रिम अवयव साहित्याबाबत दिव्यांगांना माहिती दिली.

जिल्हा उद्योग केंद्राने उद्योजक पुस्तिका, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कर्जसुविधा आणि त्यासंबंधीची माहिती उपलब्ध करून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, निवडणूक विभागाने आपल्या विभागाची माहिती स्टॉलवर दिली.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी 50 स्टॉल लावण्यात आले होते. याठिकाणी कार्यक्रमाच्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिकांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यास मदत झाली.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

0000000

लेख

वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन, चोख अंमलबजावणी

‘शासन आपल्या दारी’च्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या गावावरून आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यांच्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमासाठी शेकडो वाहने येणार असल्याने त्यांच्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सहा ठिकाणी सुसज्ज वाहनतळाची व्यवस्था केली. वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन आणि चोख अंमलबजावणीमुळे सर्वकाही सुरळीत पार पडले.

कार्यक्रमासाठी 337 बसेस, 83 खासगी बसेस, 392 चारचाकी वाहने आणि 111 दुचाकी वाहनांची नोंद परिवहन विभागाने वाहनतळावर घेतली. या वाहनांमधून सुमारे 23 हजार लाभार्थी कार्यक्रमस्थळी आल्याचे दिसून येते. तसेच असंख्य वाहने खासगी जागेत उभी करण्यात आली होती.

शासनाच्या योजनांची माहिती विस्तृत स्वरुपात प्रसार, प्रचार करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी वाहनतळाची व्यवस्था परिवहन विभागाने केली.

जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांच्या एसटी बसेससाठी पार्किंगची सोय आयटीआय कॉलेजच्या मागील मैदानात करण्यात आली. याठिकाणी 341 एवढ्या बसेस उभ्या राहू शकतील अशी सोय करण्यात आली. सर्व तालुक्यातील बचतगटाची वाहने हेंड सुझुकी शोरुमच्या बाजुला असलेल्या मैदानात करण्यात आली. याठिकाणी 700 चारचाकी आणि 1 हजार दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय केली.

सर्व शासकीय वाहनांसाठी रिलायन्स मॉलच्या मागे, बुलडाणा रेसिडेन्सी समोरील मैदानात 300 चारचाकी आणि 100 दुचाकींना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. मोताळा, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील राजूर घाटातून येणारी वाहने आरटीओ ऑफिसच्या बाजूला थांबविण्यात आली. याठिकाणी 500 चारचाकी, 500 दुचाकीची व्यवस्था करण्यात आली.

शारदा ज्ञानपीठ आणि भारत हायस्कूलच्या मैदानावर बुलडाणा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली. याठिकाणी 500 चारचाकी, 1000 दुचाकीची व्यवस्था करण्यात आली. लाभार्थ्यांना शारदा विद्यापीठ आणि भारत हायस्कुल मैदानापासून कार्यक्रमस्थळी जाण्याकरीता 4 बसेसची व्यवस्था करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुलात 500 चारचाकी, 500 दुचाकीसाठी पार्कींगची राखीव व्यवस्था ठेवण्यात आली.

पार्किंगच्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्यात आली. मंडप, टेबल, खुर्च्या, पिण्याच्या पाणीची व्यवस्था, मेगा फोन, फिरते शौचालय, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. पार्किंगच्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक, लाईटची व्यवस्था, वॉकी टॉकी, तालुकानिहाय फलक, येण्या-जाण्याच्या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहन पार्कींग केलेल्या जागेसंबंधीची माहिती फलक, तालुक्यातील वाहनांना बुलडाणा शहरात कुठल्या ठिकाणी पार्कींग व्यवस्था केली आहे, त्याबाबत माहिती, सुचना देण्यात आली,

परिवहन विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी येऊनही वाहतूक सुरळीत सुरू राहिली. जिल्हाभरातून हजारो लाभार्थी येऊनही एकाही लाभार्थ्यांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कार्यक्रमासाठी आलेले प्रत्येक लाभार्थी घरी पोहोचेपर्यंत शासकीय यंत्रणा शेवटपर्यंत कार्यरत होती, हे विशेष.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

0000000

लेख

हजारो लाभार्थ्यांच्या साक्षीने

शासन आपल्या दारी यशस्वी

‘शासन आपल्या दारी’चा जिल्हास्तरीय कार्यक्रम रविवारी दिमाखात पार पडला. भव्यदिव्य प्रमाणातील कार्यक्रम प्रशासनातील उत्कृष्ट समन्वयाने हा देखणा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील लाभार्थींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. साधारणपणे 25 हजाराहून अधिक लाभार्थी, बचत गटाच्या महिला आणि नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यासोबतच हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीने शासन आपल्या दारीचा जिल्हास्तरीय लाभ वाटपाचा कार्यक्रम यशस्वी ठरला.

जिल्हाभरातील लाभार्थींना आणण्यासाठी 350 बसेसचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीवर यामुळे भार येऊ नये म्हणून अकोला, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील बसेस परिवहन महामंडळाने मागविल्या. लाभार्थी आणि बचतगटाच्या महिलांना आणण्यासाठी रूट मॅप तयार करण्यात आले. एका बसमध्ये 40 लाभार्थी आणि त्यांच्या सोयीसाठी एक कर्मचारी, दोन आरोग्य सेवक आणि एक पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे प्रवासादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

लाभार्थ्यांना आणण्याची जबाबदारी जिल्ह्यातील प्रत्येक विभागांना देण्यात आली. तालुक्यातून किती लाभार्थी येणार याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार बसेसची उपलब्धता करून देण्यात आली. वेळीच एखादा लाभार्थी कार्यक्रमाला येणार नसल्यास त्याच्या जागी पर्यायी लाभार्थीही ठेवण्यात आले. कार्यक्रम दुपारचा असल्याने सकाळी घरून निघताना लाभार्थींना जेवण दिले गेले. तसेच प्रवासादरम्यान एक पाण्याची बॉटल दिली गेली. कार्यक्रमस्थळी आल्यानंतरही त्यांच्यासाठी पाण्याची मुबलक उपलब्धता करून देण्यात आली. कार्यक्रमानंतर त्यांना आलेल्या त्याच बसमध्ये परत जाण्याची सोय केली. तसेच बसमध्येच जेवण, पाणी उपलब्ध करून दिले गेले. तसेच या कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना एक रोपटे भेट दिले गेले.

कार्यक्रमासाठी आलेले लाभार्थी, बचतगटाच्या महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली. कार्यक्रमासाठी आलेली वाहने पार्किंगच्या जागेत उभी करण्यात आली. कार्यक्रमस्थळी येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग केला. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत संयम पाळला गेला. कार्यक्रमानंतरही लाभार्थींनी शिस्तीत आपल्या वाहनापर्यंत अगदी रांग लावून परतीचा प्रवास केला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत शिस्तबद्धता पाळल्याने कार्यक्रमात कुठेही विसंगती आढळून आली नाही. आलेला प्रत्येक लाभार्थी स्वयंशिस्तीत असल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले नाही. सर्वार्थाने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून बुलडाणा जिल्ह्याची मान उंचावल्या गेली आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला कार्यक्रम यशस्वी झाल्याची पावती दिली.


गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

0000000

No comments:

Post a Comment