Tuesday 12 September 2023

DIO BULDANA NEWS 12.09.2023




जिल्हाधिकारीपदी डॉ. किरण पाटील रूजू

बुलडाणा, दि. 12 : जिल्हाधिकारी पदी डॉ. किरण पाटील आज रूजू झाले आहेत. त्यांनी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारली. जिल्ह्याची बलस्थाने ओळखून विकासात्मक कामे करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर विविध विभागाप्रमुखांशी संवाद साधला. समस्या जाणून प्राथम्याने कामकाजाच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती, त्यावरील उपाययोजना, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना करावयाची मदत याबाबत आढावा घेतला. विभागप्रमुखांनी सक्रीय कामकाज करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्यानुसार येत्या दहा-वीस वर्षाचा कालावधीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. हा आराखडा अंतिम स्वरूपात आला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्याला नवीन दिशा देण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रशासकीय कामकाजासोबतच येत्या काळात कृषी, महसूल, पुरवठा, निवडणूक, नियोजन, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण या विभागाच्या विकासात्मक योजनांतून मागास राहिलेल्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या सूचनाही डॉ. पाटील यांनी दिल्या.

000000





विकास आराखड्यासाठी विभागानी सूचना कराव्यात

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 12 : देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेसाठी जिल्हा केंद्रबिंदू मानण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची बलस्थाने ओळखून प्रत्येक विभागाने आर्थिक विकासासाठी अल्प आणि दिर्घ कालावधीसाठी पाच सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्याच्या विकास आराखडा संदर्भात बैठक घेण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, गोखले इंस्टिट्यूटचे प्रा. नरेश बोडके उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याची बलस्थाने, कमजोरी आणि त्यानुषंगाने करावयाच्या कार्यवाही संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासानुसार प्रत्येक विभागाने नियोजन करावे. यात जिल्ह्याचे बलस्थाने आणि कमजोरी लक्षात घ्यावी. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि क्षेत्रात नियोजन करून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच कौशल्य प्रशिक्षण दिल्यास यातून विकासाच्या संधी वाढविता येऊ शकणार आहे.

जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाने योगदान देणे आवश्यक आहे. हा आराखडा अल्प, मध्यम आणि दिर्घ मुदतीचा तयार करण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य आणि सामाजिक क्षेत्राचा महत्वाचा वाटा राहणार आहे. कृषि हे महत्वाचे क्षेत्र असून शेतकऱ्यांचे उत्पन्‍ दुप्पट करण्यासाठी क्लस्टर उभारण्याची गरज आहे. यासाठी व्हीजन देणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्राला पशूसंवर्धन विभागाची जोड देणे आवश्यक आहे. या आराखड्याचा शेतकरी हा गाभा असणार आहे. कृषि क्षेत्रात मुल्यवर्धीत साखळी निर्माण झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्ना निश्चितच वाढ होणार आहे.

येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देताना विकास आराखडा विचारात घेतल्या जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासकामे करताना आणि जिल्ह्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक विभागाने यात योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने पाच दिर्घ आणि पाच अल्प मुदतीच्या विकासाची कामे सूचविण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे येथील गोखले इंस्टिट्यूटशी करार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि प्रा. नरेश बोडके यांनी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे गोखले इंस्टिट्यूट विकास आराखड्याशी संबंधित एकत्रित करण्यात आलेल्या डाटावरून महत्वपूर्ण सूचना करणार आहे.

00000

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी परवानगी काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : जिल्ह्यात यावर्षी दि. 19 ते 28 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गणेशोत्सवासाठी जाहिरनामा घोषित करण्यात आला आहे. यानुसार गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व शहर, गाव, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्या हेतूने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी, अगर मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 याप्रमाणे विविध निर्बंध घालण्यात आले आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत दोन्ही दिवस धरुन श्री गणपती स्थापनेप्रित्यर्थ अगर विर्सजनाप्रित्यर्थ मेळावे किंवा पालख्या किंवा  वाद्यांसह मिरवणूक काढावयाची झाल्यास, अगर नाच-गाणे किंवा कुस्त्यांचे सामने करावयाचे असल्यास त्या व्यक्तीने संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखी परवानगीशिवाय सदर कालावधीत कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांना हे परवाने पाहिजे असतील त्यांनी अशी मिरवणूक काढावयाच्या 36 तास अगोदर लेखी अर्जाद्वारे संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराकडे विहित माहिती भरुन देणे गरजेचे आहे. मुख्य आयोजकाचे पूर्ण नाव व पत्ता, ज्या कारणासाठी परवाना पाहिजे ते कारण, मेळावा अगर मिरवणुकीचे वर्णन आणि मंडळाचे नाव, कोण कोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारीख आणि वेळ, ज्या रस्त्याने मिरवणूक अगर मेळावा जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारीख व वेळ, मिरवणूक चालक आणि सदस्यांचे पूर्ण नाव व पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणुकीतील किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे, असे अर्जावर लिहून देणे आवश्ययक आहे.

मिरवणुकीत वापरायचे वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून तपासून घेतल्याचे प्रमाणपत्र, अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे, असे अर्जावर लिहून द्यावे लागणार आहे. अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळावा सार्वजनिक जागेतून नेताना संबंधित व्यक्ती जवळ बाळगणे गरजेचे आहे. दंडाधिकारी अगर पोलिस अंमलदार यांनी तो  पहावयास मागितल्यास त्यांना दाखवला जावा. श्री गणपती विर्सजनाचे दिवशी मिरवणूक अगर मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात नमूद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुसऱ्या रस्त्याने त्यांना जावू दिले जाणार नाही व वहीवाट अगर इतर सबब ऐकली जाणार नाही. मिरवणुकीमुळे इतर मिरवणुकीस अगर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे. अडथळा झाला तर त्याबद्दल तो मुख्य आयोजक जबाबदार धरला जाईल.

तसेच ज्याचे बरोबर वाद्य साहित्य, खेळ, दिंड्या, आखाडे, सोंग फलके आहेत अशा लोकांनी रस्त्याने जाताना नागरिकांना त्रास होईल अशा रितीने थांबू नये, अगर गाणे गावू नये. ज्यावेळी एखादा जनावर बुजाडण्याचा संभव असेल, त्यावेळी अशी जनावरे तेथून निघून जाईपर्यंत वाद्य वाजविणे एकदम बंद ठेवावे.

मशिदीजवळून मिरवणूक जातांना मशिदीपुढे न थांबता पूढे निघून जावे, रेंगाळू नये. मेळावे किंवा मिरवणूकीच्या रस्त्याने जात असता किंवा रस्त्याने मेळाव्यातील मुले पदे म्हणू लागली असता अगर रस्त्याने काही वेळ पर्यंत मेळाव्यास उभे राहणे भाग पडले असता मेळाव्याचे अगर मिरवणुकीच्या मुख्य आयोजकाने रस्त्यावरून गाडी वगैरे वाहनास अडथळा होणार नाही, अशी व्यवस्था करावी. अडथळा झाल्यास मुख्य आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल. मेळावा अगर मिरवणूक रस्त्याने जात असतांना त्यातील कोणत्याही इसमाने विशेष परवान्याशिवाय कोणतेही अग्निशस्त्र, मशाल (टेंभे), तलवार, खंजीर, कट्यार, चाकू, काठ्या, बांबू, छोटे, दगड, गोफन अगर कोणत्याही प्रकारचे शस्त्र अगर ज्यामुळे दुखापत होईल, असे कोणतेही शस्त्र किंवा पदार्थ घेऊन जावू नये अथवा जवळ बाळगू नये. ज्यांचे जवळ असे शस्त्र किंवा वस्तू सापडतील त्यांचे जवळून ते घेवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येतील.

मिरवणूक विर्सजन वेळेच्या आत केले पाहिजे. कोणत्याही प्रसंगी मिरवणूक अथवा मेळावा यांनी प्रेतयात्रेला अग्रक्रम दिला पाहिजे. व्यक्ती, प्रेत अगर त्यांच्या प्रतिमा यांचे सर्वाजनिक जागेत प्रदर्शन करण्यास मनाई आहे. उत्सवाच्या काळात सभ्यता अगर नितीमत्तेचे बिघाड होईल किंवा कायद्याविषयी तिरस्कार निर्माण होईल किंवा निरनिराळ्या जमातीतील शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य किंवा गैरवर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे तंटेबखेडे निर्माण होतील अगर निरनिराळ्या भागात किंवा जमातीत संघर्ष निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, भाषण, जाहिरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

000000

शुक्रवारी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

            बुलडाणा, दि. 12 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करीअर सेंटरतर्फे शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात पीपल ट्री, व्हेंचर, धुत ट्रान्समिशन यासाख्या नामांकीत कंपनीने रोजगार मेळाव्यासाठी पदे अधिसुचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याद्वारे कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येवुन त्यांची प्राथमिक निवड करतील. यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्ड वापरुन लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज करुन यात सहभागी होऊ शकतील. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार आहे त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगइनमधून रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतील.

पात्र गरजू व नौकरी इच्छुक उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्तपदासाठी अर्ज करु शकतील. उमेदवारांनी दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या सेवायोजन कार्डच्या युझर आयडी आणि पासवर्ड वापर करुन आपले लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज करावा, तसेच ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, तसेच याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 आणि भ्रमणध्वनी क्र. 7447473585 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

 

00000

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदया उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी, तसेच महानगरपालिका, विभागस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरपासून 5 किमीच्या परिसरामध्ये स्थापित असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे.

त्यानुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन दस्ताऐवज उपलोड करुन अर्ज दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी हे अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लाख रूपयांचे आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे, सदरचे खाते आधारकार्डशी संलग्न असावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावे.

सदर विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांचे संस्थेमधील, महाविद्यालयातील उपस्थिती 80 टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक राहिल. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली संस्था शासन मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करुन जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्‍नाचा दाखला, आधारकार्ड, प्रवेश पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाची मार्कशीट, राष्ट्रीयकृत बँकेचे खातेबुक आधार संलग्न असलेले हे मुळ दस्तावेज स्कॅन करुन ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे.

महाविद्यालयाने विद्यार्थ्याने भरलेला ऑनलाईन अर्ज विहित दस्तावेजांची पडताळणी करुन ऑनलाईन व हार्ड कॉपी प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी, व्यवसाय करत नसावा. एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.

केंद्र शासनाच्या पोस्ट बेसिक मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्याने त्याचे स्वयंघोषणापत्र व वडिलांचे घोषणापत्र ऑनलाईन व हार्डकॉपी सादर करणे बंधनकारक राहील. सदर योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील,  असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे. 

00000000

25 सप्टेंबरपूर्वी पाणी मागणी सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : जिल्हास्तरीय आकस्म‍िक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची सभा दि. 5 ते 15 ऑक्टोबर 2023 दरम्यान आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात दि. 25 सप्टेंबर 2023 पूर्वी पाणी मागणी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पावरुन पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्याबाबत, सर्व नगर परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती, संबंधित ग्रामपंचायतींनी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्याकडे दि. 25 सप्टेंबर 2023 पुर्वी पाणी मागणी सादर करावी लागणार आहे. यामुळे जिल्हास्तरीय आकस्म‍िक पिण्याचे पाणी निश्चिती समिती सभेमध्ये सदर मागणी उपस्थित करणे शक्य होईल. सदर सभेमध्ये प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजूरी देण्यात येईल. याची सर्व संबंधीत बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

000000

बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये

*कामगार विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 :  बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषास बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नुतणीकरण आणि विविध कल्याकारी योजनांचे लाभ संगणकीकृत प्रणालीद्वारे केले जातात. या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या अर्ज नोंदणीसाठी वार्षिक 1 रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यांची रीतसर पावती देण्यात येते. याव्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषला बळी पडू नये. त्यांनी आपली नोंदणी व नुतणीकरणनियमाप्रमाणे करुन घ्यावे. याबाबतीत आपली फसवणूक झाल्यास कामगार कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्ती विरुद्धनजिकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment