Friday 8 September 2023

DIO BULDANA NEWS 08.09.2023

 भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

बुलडाणा, दि. 8 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांची सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे राज्यातील युवक आणि युवतींसाठी दि. 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत कोर्स क्र. 54 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीवेळी त्यांनी फेसबुल पेजवरील डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर सर्च करुन त्यामधील एसएसबी 54 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या किंवा व्हॉटस ॲप क्रमांक 9156073306 या क्रमांकावर एसएसबी 54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधीत परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. शिफारस पत्र आणि त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट दोन प्रतीत घेऊन आणि ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे लागणार आहे.

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पात्रता आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी  एक्झामिनेशन पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असणे आवश्यक आहे. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असणे आवश्यक आहे.

            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक, ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व भ्रमणध्वनी क्रमांक 9156073306 यावर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

00000

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

बुलडाणा, दि. 8 :  राज्यात सध्या कापूस पिक पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. काही तुरळक ठिकाणी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादूर्भाव पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

किडींची ओळख

गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पाते, फुले व बोंडावर लांबुळकी चपटी, मोत्यासाखी चकचकीत पांढरी अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते.

नुकसानीचे स्वरूप

        अंड्यातून बाहेर पडल्यावर अळी सुरुवातीला पाते व फुलांचे नुकसान करते व पुढील अवस्थेत बोंडात शिरते व आतील सरकी व कापूस खाऊन उपजिवीका करते. या किडीचा प्रादुर्भाव फुले आल्यानंतर झाल्यास प्रादूर्भावीत फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखे दिसतात. यालाच डोमकळी असे म्हणतात. बोंडे तयार झाल्यानंतर अळ्या बोंडांना छिद्रे पाडून आत शिरतात व बोंडांचे नुकसान करतात. अळीचे प्रवेश छिद्र बंद होत असल्यामुळे किडग्रस्त बोंडे बाहेरून ओळखता येत नाहीत. अशी बोंडे फोडून पाहिल्यास आत गुलाबी रंगाच्या अळ्या दिसतात. किडग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात.

एकात्मिक व्यवस्थापन

शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून सदर किडीच्या नियंत्रणासाठी किड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. यात एकरी दोन याप्रमाणे पिकाच्या उंचीच्यावर एक फुट याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. पिकातील डोमकळ्या नियमीत शोधून त्या अळीसहीत नष्ट कराव्यात. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडीरेक्टिन (३००० पीपीएम) १० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. तसेच रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. यात ५ ते १० टक्के प्रादूर्भाव असल्यास क्विनालफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के १० मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

१० टक्‍क्यावर प्रादूर्भाव असल्यास अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादूर्भाव पुढे वाढू नये, यासाठी मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रॉनिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन ४.६ टक्के - ५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के - २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के अधिक अॅसीटामाप्रिड ७.७ टक्के १० मिली. वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

बुलडाणा, दि. 8 : सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. यावेळी मावा आणि पांढरी माशीचा प्रादूर्भाव होऊ शकतो. सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूमुळे उद्भवतो. पांढरी माशी ही किड या रोगाचा प्रसार करते. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर आढळून येतो. मुग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इ. यजमान पिकांवर तो जिवंत राहू शकतो व सोयाबीन पिकावर संक्रमित होत राहतो. यासाठी सोयाबीनवरील मोझॅक रोगांच्या नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रोगाची लक्षणे

सुरवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके, हलके चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या, चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडते. हरितद्रव्याचा ऱ्हास झाल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होतात व आकार लहान होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस - करपट रंगाचे ठिपके दिसतात. प्रादूर्भावग्रस्त झाडांना शेंगा कमी प्रमाणात लागतात, त्यातील दाणे लहान राहतात. बहुतांश वेळी शेंगा, दाणे विरहीत व पोचट राहिल्याने उत्पादनात लक्षणीय घट होते.

एकात्मिक व्यवस्थापन

निरोगी झाडावर होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रादूर्भावीत पाने किंवा झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावेत. पिक तन मुक्त ठेवावे. रोगवाहक किडींचे (पांढरी माशी व मावा) नियंत्रण करताना शेतामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे एकरी २५ या प्रमाणे पिकाच्या समउंचीवर लावावेत. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडीरेक्टिन (३००० पीपीएम) १० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. थायमिथॉक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन ९.५० टक्के झेडसी २.५ मिली किंवा असिटामेप्रिड २५ टक्के अधिक बायफेन्थ्रीन २५ टक्के डब्लूजी २.५ ग्रॅम किंवा बीटा सायफ्लुथ्रीन ८.४१ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ओडी ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.

00000

सोयाबीनवरील चक्रीभुंगाचे ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन

बुलडाणा, दि. 8 : राज्यात सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. या किडीचा प्रादूर्भाव उगवणीनंतर २० ते ६० दिवस या कालावधीमध्ये होतो. सोयाबीनचे खोड पोखरणारी ही महत्वाची किड आहे. चक्रीभुंग्याच्या प्रादूर्भावामुळे ३५ टक्क्यापर्यंत नुकसान होते. सोयाबीन व्यतिरिक्त मुग, उडीद, चवळी, तूर, भुईमुग, मिरची, कारली आदी पिकांवर देखील चक्रीभुंग्याच्या प्रादूर्भाव होतो. यावर नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

किडींची ओळख

प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा ७ ते १० मिमी लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. अंडी फिकट पिवळसर लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते व डोक्याच्या मागील बाजूस थोडी मोठी असते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये जवळपास ७८ अंडी घालते.

नुकसानीचा प्रकार

प्रौढ भुंगा व अळी या दोन्ही अवस्था सोयाबीन पिकाचे नुकसान करतात. प्रौढ भुंगा पानाच्या मुख्य शिरा, देठ किंवा खोड यावर खरवडतो, त्यामुळे सोयाबीनचे जास्त नुकसान होत नाही. परंतू या किडीच्या अळी अवस्थेमुळे मुख्यत्वे पिकाचे नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करतो व खालच्या खाचे जवळ अंडी घालण्यासाठी तीन छिद्रे पाडतो. खोडावर खाचा केल्यास २ ते ३ दिवसांनी वरचा भाग सुकायला सुरुवात होते. पानाच्या देठावर खाचा केल्यास पान वाळून जाते. पिक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामानाने प्रादुर्भाव ४५ ते ६० दिवसांनी झाल्यास कमी प्रमाणात नुकसान होते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात, तसेच शेंगा पूर्ण भरत नाहीत. एकरी झाडांची संख्या कमी होऊन नुकसान होते.

एकात्मिक व्यवस्थापन

पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिक तणमुक्त ठेवावे. चक्री भुंगा प्रादूर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या तात्काळ गोळा करून आतील किडीसह नष्ट करावेत.  सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव कमी असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पिक घेऊ नये. आर्थिक नुकसान पातळी  १० ते १५ टक्के प्रादूर्भावग्रस्त झाडे ओलांडल्यास क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ एस ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९० ई सी ९ मिली किंवा प्रोफॅनोफोस ५० ईसी २० मिली किंवा टेट्रॅनीलीप्रोल १८.१८ एससी ५-६ मिली किंवा बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमीडॅक्लोप्रीड १९.८ टक्के ओडी ७ मिली किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन ९.५० झेडसी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल ९.३० अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन ४.६० झेडसी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात या रासायनिक कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

लेख

 

‘शासन आपल्या दारी’बद्दल महिलांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रीया

शासन आपल्या दारीचा जिल्हास्तरीय लाभ वाटपाचा कार्यक्रम बुलडाणा येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. उपस्थिती, शासकीय योजनांचा लाभ आणि शासनाच्या लाभाविषयी प्रतिक्रिया देण्यात महिला आघाडीवर होत्या.

शासनाच्या प्रत्येक योजनात महिलांना प्राधान्याचे स्थान देण्यात आले आहे. प्रामुख्याने महिला बचतगटांना कर्ज, अनुदानाची मदत करून त्यांच्यातील उद्योजकतेला वाव दिला आहे. बचतगटातील उत्पादनांना वैश्विक ओळख मिळाली आहे. त्यासोबतच गावागावात गृहउद्योग उभारल्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. शासन आपल्या दारीनिमित्त आलेल्या या महिलांनी शासनाच्या योजनांचे कौतुक केले.

सुषमा सुरडकर यांनी कामगार विभागाकडून मुलाच्या शिक्षणाला मिळालेल्या मदतीचा उल्लेख केला. तर उषा रमेश देवकर यांनी मुलाच्या शिक्षणासाठी वार्षिक 60 हजार रूपयांच्या शिष्यवृत्तीचा प्रामुख्याने उल्लेख केला. शासनाच्या मदतीमुळे मुलाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त केला. शितल राजपूत यांनी मलकापूर येथे हिरकणी गृहउद्योग उभारला आहे. यातून त्या वाळवणचे उत्पादन करीत आहे. बचतगटातून दिड लाख आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पाच लाख रूपयांचे कर्ज मिळाले आहे. पाच लाखाच्या कर्जामधून कापडी पिशवी निर्मितीच्या उद्योगातून सहा महिलांना रोजगार दिला आहे.

प्रमिला सुर्वे या गृहिणीने उमेदचे काम हाती घेतले आहे. घरी राहणारी महिला आज उमेदचे काम बघते आहे. हे काम करताना चांगला अनुभव आला आहे. त्यामुळे स्वत:ची प्रगती साधली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. रंजना आखाडे यांनी वेगवेगळ्या पिठ उद्योगाची उभारणी केली आहे. बॅकेनी त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आता त्यांनी 12 महिलांना रोजगार पुरविला आहे. महिला उद्योग चालविण्यास सक्षम आहेत. त्यांना उत्पादन विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा अनिता सुर्वे यांनी व्यक्त केली. मंदा मगर यांनी गोळा केलेले मध पॅकींग करण्याचा उद्योग उभारला आहे. त्यांच्यासोबत 11 महिलांना रोजगार मिळाला आहे.

रत्ना पवार या फासेपारधी समाजातील महिलेने बचतगटातून विकास साधला. त्यांना 15 हजार रूपयांचे मानधन आणि एक लाख रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. तसेच त्यांनी पाच लाख रूपयांचे कर्ज घेऊन अगरबत्तीचा उद्योग उभारला आहे. त्यांच्या या कृतीमुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. शितल खंडागळे यांना प्रधानमंत्री मातृवंदन योजनेतून तीन टप्प्यात पाच हजाराची मदत झाली आहे. निर्मला देशमुख, रा. मेहकर आणि मंगला शेजोळ, रा. देऊळगाव माही या दोघींना ट्रॅक्टरचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रॅक्टर चालविण्याचा व्यवसाय त्या स्वत: करणार आहेत. तर प्रियंका गजानन ताटे, रा. बुलडाणा यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 50 लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले. यातून त्या फ्लेक्स आणि मल्टीसर्व्हीसेसचा व्यवसाय करणार आहेत.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात महिलांचा पुढाकार आहे. अनुदान, सवलतीच्या व्याजदरात कर्ज आणि वेगवेगळ्या मदतीमुळे महिलांनी रोजगाराभिमुख विकासाकडे पाऊल टाकले आहे. त्यांच्या प्रयत्नांना शासन मदत करीत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात महिलांच्या उद्योगाचे जाळे निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

 

गजानन कोटुरवार.

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

00000


No comments:

Post a Comment