Monday 18 September 2023

DIO BULDANA NEWS 18.09.2023

 






‘अमृत कलश’ उपक्रमाला शेतकरी, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

*उपक्रम यशस्वी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

*‘अमृत कलश’साठी गावातून माती संकलन

बुलडाणा, दि. 18 : ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात गाव आणि शहरातील वार्डस्तरावर माती आणि तांदूळ संकलित करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मातीविषयी अभिमान वाटावा आणि शूरविरांना वंदन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानास जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रतिनिधीसह सर्वसामान्य नागरिक यात सहभागी होत आहेत.

‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमातील अमृत कलशमध्ये माटरगाव येथे आमदार आकाश फुंडकर यांनी माती जमा केली. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोनगाव, ता शेगाव, सुटाळा खुर्द, ता. खामगाव येथे नागरिकांकडून माती गोळा करण्यात आली. येऊलखेड, ता. शेगाव येथेही माती गोळा करण्यात आली. शिरजगाव निळे येथे पंचप्राण शपथ देऊन श्रमदान करण्यात आले.

‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमातील दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर माती गोळा करण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. पहिला टप्प्यात दि. 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येईल. यात शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. शेती असणाऱ्या कुटुंबाकडून एक मुठ माती जमा करण्यात येणार आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये जादा गावे असल्यास प्रत्येक गावातून एक कलश तयार करण्यात येणार आहे. यावेळी पंचप्रण शपथही घेतली जाईल. वाजतगाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे.

दि. 1 ते 13 ऑक्टोबरपर्यंत तालुकास्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. प्रत्येक गावातून आलेल्या माती एकत्र करून तालुकास्तरावर प्रातिनिधी स्वरूपात एक कलश तयार करण्यात येईल. यावेळी जिल्हा किंवा शहरातील सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले वीर जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा यावेळी गौरव करण्यात येईल. मातीचा कलश तयार करून युवकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील अमृत कलश मुंबई मार्गे दिल्ली येथे नेण्यासाठी दोन स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन स्वयंसेवक, युवकांना अमृत कलश यात्रेसाठी मुंबई येथे पाठविण्याची जबाबदारी ग्राम विकास विभागावर सोपविण्यात आली आहे. तालुक्यातील प्रतिनिधींना घेऊन एकत्रितरित्या जिल्हास्तरावरून पाठविण्यात येणार आहे. अमृत कलश घेऊन जाताना स्वयंसेवक, युवा हे पारंपारिक वेशभुषा केलेले राहणार आहे. राज्यस्तरावर दि. 22 ते 27 ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात राज्यभरातील कलश घेऊन येणारे स्वयंसेवक सहभागी होतील. राज्यातील स्वयंसेवक दि. 27 ऑक्टोबरला मुंबई येथून दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमासाठी रवाना होतील. अमृत कलशातील माती दिल्ली येथील अमृत वाटीत वापरण्यात येणार आहे. प्रधानमंत्री यांच्या हस्ते दि. 1 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे.

गाव, वार्ड, तालुका आणि जिल्हास्तरावर ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग वाढवावा. तसेच merimaatimeradesh.gov.in या पोर्टलवर उपक्रमाचे छायाचित्र, सेल्फी अपलोड करावे. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत मेरी ‘माटी मेरा, देश’ या उपक्रमामध्ये अमृत कलश यात्रेचे सूक्ष्म नियोजन करून हा उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000

गतीमान सेवेसाठी सेवा पंधरवाडा साजरा करावा

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 18 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध सेवा देण्यासोबतच कार्यालयाची स्वच्छता आणि अभिलेख सुव्यवस्थित करून गतीमान सेवेसाठी सेवा पंधरवाडा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सेवा पंधरवाड्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात कार्यालयांमध्ये कार्यालयीन स्वच्छता करण्यात यावी, सहा गठ्ठे पद्धतीनुसार अभिलेख लावण्यात यावे, प्रकरणांची निंदणीकरण करून अ, ब, क, ड वर्गवारीनुसार यादी करावी, सदर अभिलेख अभिलेख कक्षात जमा करावी. ड वर्ग प्रकरणांची यादी करुन संबधित अधिकाऱ्याच्या मान्यतेने ही प्रकरणे नष्ट करावी. सर्व कार्यालयातील अभिलेख कक्षात अभिलेखांचे व्यवस्थितरीत्या निंदणीकरण करुन अ, ब, क वर्गवारीनुसार ठेवण्यात यावे. विभागनिहाय शासकीय योजनांचा फलक दर्शनी भागात लावण्यात यावा. कार्यालयीन फर्निचर, टेबल, खुर्ची यांची रचना व्यवस्थित असावी. कार्यालयीन फर्निचरची दुरूस्ती आवश्यक असल्यास दुरुस्ती करण्यात यावी. याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. कार्यालयामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करावे आणि सेवा पंधरवाडा यथोचित रित्या साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले आहे.

00000

खरीप, रब्बी हंगामासाठी पुरेसा खत साठा उपलब्ध

*खरीपासाठी एक लाख 20 हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध झाला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये आतापर्यंत १ लाख २० हजार २३३ मेट्रीक टन खतसाठा पुरवठा झाला आहे. रब्बी हंगाम २०२२-२३ मधील रासायनिक खत साठा ७८ हजार ६७१ मेट्रीक टन शिल्लक होता. त्यामुळे एकूण १ लाख ९८ हजार ९०४ मेट्रीक टन रासायनिक खत साठा उपलब्ध झाला आहे.

उपलब्ध खत साठ्यामधून आतापर्यंत १ लाख ३२ हजार ३५८ मेट्रीक टन खताची विक्री झाली आहे. यातून ६६ हजार ५४६ मेट्रीक टन रासायनिक खते शिल्लक आहे. आज रोजी डीएपी-६ हजार ८२१ मेट्रीक टन, २०.२०.०.१३ - १४ हजार १६० मेट्रीक टन, युरीया - ५ हजार ४९७ मेट्रीक टन, १०.२६.२६ - ७ हजार ४६३ मेट्रीक टन, एसएसपी - १७ हजार ७५९ मेट्रीक टन खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना कृषि केंद्रामध्ये उपलब्ध खताची माहिती adozpbuldana.blogspot.com/2022/04/blog- post.html या ब्लॉगस्पॉटवर उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांनी एकाच खताची मागणी करू नये. माती परिक्षणानुसार वेगवेगळ्या खताचा संतुलित वापर करावा, जेणेकरून जमिनीची सुपिकता टिकून राहून उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी अधिकृत परवानाधारकाकडून करावी, तसेच खरेदी केलेल्या रासायनिक खताचे पक्के देयक घ्यावे. डीएपी या खताला पर्यायी खते म्हणून १०.२६.२६, १२.३२.१६, २४.२४.० एसएसपी, २०.२०.०, २०.२०.०१३, ११.५२.०, युरीया आणि पोटॅश या रासायनिक खताचा वापर करून, जमीन आरोग्यानुसार शिफारस केलेल्या खताचा समतोल वापर करावा.

शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे, किटकनाशकाबाबत तक्रारीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 18 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबी घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी तपासणीच्या दिवशी स्थानिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठा गौरी पुजनानिमित्त स्थानिक सुट्टी असल्यामुळे या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.  

00000





मोताळा आयटीआयमध्ये प्रधानमंत्री कौशल्य दौड

बुलडाणा, दि. 18 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रधानमंत्री कौशल्य दौड व दिक्षांत सोहळा पार पडला. यावर्षी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना बोराखडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रमाणपत्र वितरण करण्यात आले

संस्थेचे आयएमसी अध्यक्ष पी. एन. जाधव यांनी प्रशिक्षणार्थ्यांना स्वयंरोजगाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. मोताळा येथील साई अॅकडमीचे संचालक पी. पी. कौस्कर यांनी स्पर्धा परीक्षेबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री कौशल्य दौड स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख बक्षिस आणि प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी प्रास्ताविक केले. अनंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वरीष्ठ लिपीक व्यंकट सरवदे आभार मानले.

000000




वृद्धावस्था सोनेरी व्हावी अभियानाला सुरूवात

बुलडाणा, दि. 18 : ‘वृद्धावस्था सोनेरी व्हावी’ अभियानाची सुरूवात रविवार, दि. 17 सप्टेंबर पासून करण्यात आली. गाव तेथे मानसोपचार या संकल्पनेनुसार अखिल भारतीय मानसोपचार तज्‍ज्ञ संघटनेच्या सहकार्याने वृद्धावस्थातील मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, अर्धांग वायूसाठी जिल्हा रुग्णालय, तसेच ब्रह्मकुमारीज मेडिकल विंग आणि संवाद हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने चर्चासत्र पार पडले.

चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे सदस्य कान, नाक, घसा तज्‍ज्ञ डॉ. जे. बी. राजपूत, ज्येष्ठ नेत्ररोग तज्‍ज्ञ डॉ. वसंत चिंचोले, जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पऱ्हाड उपस्थित होते.

डॉ. भुसारी यांनी जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या जीवनशैली संबंधित आजारासाठीच्या मोफत सेवा, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, अर्धांगवायू आदी आरोग्य सेवांची माहिती दिली. शासनाच्या १४५६७ या मोफत एल्डर लाईनचा ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य संबंधित अडचणीसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

नेत्ररोग तज्‍ज्ञ डॉ. मल्हार देशपांडे यांनी, शॉर्टलिस्ट आजार, जीवनशैली, आहार यासोबत आध्यात्मिक ज्ञानाचे जीवनशैली संबंधित मनुष्य जीवनातील महत्त्व विशद केले. त्यांनी शरीर, मन, ध्यान, आत्मा यावर प्रकाश टाकला. तसेच सकारात्मक शक्तिशाली भावना मनुष्याला निरोगी बनवितात, हे पटवून दिले. निवृत्त प्राध्यापक जगदीश खैरनार यांनी संगितीक योगाद्वारे जीवनशैली संबंधित आजारांवर उपचारात्मक शब्द प्रतिबंधक मात करता येते, त्याचे प्रत्यक्ष योगाद्वारे दाखवले. अखिल भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटना प्रेरित गाव तिथे मानसोपचार अंतर्गत वृद्धावस्था सोनेरी व्हावी यावर मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. लता बाहेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध भावना अधिक मानसिक समस्या उदासीनता, स्मृतीभ्रंश, संभ्रमावस्था आदी आजाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. आजारी व्यक्ती एवढेच काळजी घेणाऱ्यांनी सुद्धा स्वतः काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांचे सार्वभौमत्व जपत स्वतंत्रता समजूतदारपणा आणि सक्रियता ही त्रिसूत्री अखेरच्या टप्प्यात सोन्याची झळाळी प्रत्येकाला अनुभवता येईल, असे मत मांडले. डॉ. मधुकर पराड यांनी ज्येष्ठांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत असावे असे प्रतिपादित केले.

सुरवातीला डॉ. मल्हार देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, प्रा. जगदीश खैरनार, डॉ. लता बाहेकर, ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी उर्मिलादीदी यांनी दीप प्रज्वलन करून चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. उर्मिला दीदी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नवनिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मीनल आंबेकर यांनी आभार मानले.

00000


No comments:

Post a Comment