Friday 14 January 2022

DIO BULDANA NEWS 14.1.2022

  जिल्हा कृती दला मार्फत रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार सर्वेक्षण

 बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : कोरोना महामारीमुळे अनेक बालकांचे मातृपितृ छत्र हरविल्यामुळे त्यांना रस्त्यावर राहवे लागत आहे. तसेच अनेक बालके ही रोजगार मिळवून उपजीविकेसाठी कुटुंबांसोबत स्थलांतरीत होत असून त्यांच्या मुलभूत बाल हक्कांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोविड काळात संकटात सापडलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या बालकांची देखरेख व संरक्षण करणे संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला निर्देश प्राप्त झालेले असून महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यावर कुटुंबासोबत राहणाऱ्या तसेच अनाथ, एकपालक, बेवारस, सोडून दिलेल्या, हरवलेल्या स्थितीत सापडलेल्या व बाल कामगार बालकांचा शोध घेण्यात येणार आहे.

       सदर सर्वेक्षण समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा, सामजिक संस्था, शासकीय अधिकारी / कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालये, कामगार कार्यालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन, एकात्मिक बाल विकास शहरी व नागरी प्रकल्प, रेल्वे पोलीस, महामार्ग पोलीस, शहर,वार्ड आणि ग्राम बाल संरक्षण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कुटुंबापासून विभक्त झालेल्या अनाथ, एक पालक आणि हरवलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना जिल्हा बाल कल्याण समिती मार्फत करण्यात येणार आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने निदर्शित केल्याप्रमाणे रस्त्यावर राहणारी बालके शोधून आणि निश्चिती करून माहिती संकलनाचे कार्य मानक कार्यप्रणाली २.० नुसार राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या संकेत स्थळावर माहिती देण्यात येणार आहे. सदर बालकांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी देखील एकत्रित प्रयत्न करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांचे मार्फत सदर बालकांचे श्रेणी निहाय वर्गीकरण करण्यात येणार आहे ज्यात आधार नसलेली बालके, असे बालक जे दिवसभर रस्त्यावर राहतात आणि रात्री त्यांच्या कुटुंबांसोबत घरी जातात व जवळच्या झोपडपट्टी राहतात आणि कुटुंबा सोबत जे रस्त्यावर राहणारी बालके या स्वरुपात बालकांचे सर्वेक्षण होणार असून बालकांना जिल्हा कृती दला मार्फत प्रधानमंत्री बाल साह्य्ता निधी अंतर्गत शालेय साहित्य, वस्तीशाळा फी, शिक्षणाचा अधिकार कलम १२(१)(क) प्रमाणे लाभ शिफारस इत्यादी लाभ देण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण ऑनलाई स्वरूपाचे असल्याने कोरोना नियमांचे पालन  करून आढळून आलेल्या बालकांची माहिती भरणे संबंधिताना शक्य होणार आहे. 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी याबाबत नमूद केले की, जिल्ह्यात रस्त्यावरील बालकांना शोधून त्यांना निश्चित करणे व मा. बाल कल्याण समिती मार्फत बालकांना पुनर्वसन सेवा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे सदर बालकांचा समावेश बाल गुन्हेगारीत तसेच बाल कामगार, दुर्लक्षित स्थितीत राहू नये यासाठी सर्वांच्या मदतीने रस्त्यावरील प्रत्येक बालक यंत्रणे पर्यंत पोहचविण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती उज्वला कस्तुरे म्हणाल्या, सर्वेक्षणात सापडलेले बालकांचे प्रश्न अधिक गंभीर असणार आहेत अशा बालकांना दत्तक विधान, बाल संगोपन, कायदेशीर पालकत्व तसेच आर्थिक मदतीची गरज भासणार आहे अशा एक पालक, अनाथ, बाल कामगार, हरविलेल्या बालकांना समिती तत्काळ मदत देणार आहे.

    जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे  याविषयी नमूद करतात, की बालकांचे सर्वेक्षण करणे हा पहिला टप्पा असून काळजी आणि संरक्षनाची अत्यावश्यक गरज असलेल्या बालकांना जिल्हा कृती दला मार्फत मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाल संरक्षण समिती, समाजिक संस्था, सुज्ञ नागरिक, इतर सर्व विभाग यांच्या मदतीने सदर बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे सोपे होणार आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज लोणार येथे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 15 जानेवारी 2022 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक व बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

*****

जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा

• आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

    कंपनीकडे 5000 रूपये जमा केल्यास कंपनी एक शेळी खरेदी करणार होती. शेळी 7 महिन्यामध्ये एकवेळ 2 पिल्लांना जन्म देते. एक शेळी 14 महिन्यात 4 पिल्लांना जन्म देते, तसेच 14 महिन्यात एक पिल्लू किंवा 4 हजार रूपये ग्राहकाला परतावा म्हणून देणार व शेळीची रक्कम कंपनीकडे तशीच जमा राहणार. दरवर्षी शेळीचा घसारा 20 टक्के अर्थात 1 हजार रूपये कपात होणार, परतावामध्ये 14 महिन्यांची एक टर्म धरण्यात आली होती. तसेच 5 टर्म पूर्ण केल्यानंतर व दरवर्षी परतावा परत न घेतल्यास कंपनीकडे ग्राहकाने विश्वास दाखविला म्हणून एकदम 10 शेळीचे पिल्ले परत करणार व रोख रक्कम हवी असल्यास त्या 10 पिल्लांचा दर प्रत्येकी 5 हजार रूपये गृहीत धरण्यात येईल, असे एकूण 50 हजार रूपये ग्राहकास देण्यात येतील. अशी कंपनीची परतावा पॉलीसी होती.

   तरी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 व 07262-245989 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अलका निकाळजे आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 1208 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 209 पॉझिटिव्ह

  • 15 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1417 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1208 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 209 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 147 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 82 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 439 तर रॅपिड टेस्टमधील 769 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1208 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 82, बुलडाणा तालुका : येळगाव 2, माळवंडी 1, तांदुळवाडी 5, देऊळघाट 1, दत्तपूर 2, सागवन 3,  दहीद 1, कोलवड 2, माळविहीर 1,  चिखली शहर : 5, चिखली तालुका : पिंपळगांव 1,  अमडापूर 1, शेलूद 1,  किन्होळा 1, तेल्हारा 1,  मोताळा शहर : 3, मोताळा  तालुका : धा.बढे 2, अंत्री 1,  खामगांव शहर : 20, खामगांव तालुका : कंझारा 1, वसाडी 1, पिं. राजा 2,   चिंचपूर 1, शेलोडी 2,    मेहकर शहर  :2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 2,  सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, दे. राजा तालुका : कुंभारी 1, दे. मही 2, मलकापूर शहर : 4, मलकापूर तालुका : वरखेड 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, लोणार शहर : 5, नांदुरा शहर : 14, तालुका : निमगांव 1, वडी 1, विटाळी 1, जयपूर 1, शेगांव शहर : 23, शेगांव तालुका : टाकळी धारव 1,       परजिल्हा : काळेगांव जि. जालना 1. अशाप्रकारे जिल्ह्यात 209 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 15 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 757941 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87045 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87045 आहे.  आज रोजी 1012 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 757941 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 88413 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87045 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 692 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********

 

No comments:

Post a Comment