Friday 7 January 2022

DIO BULDANA NEWS 7.1.2022

  


कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण बैठक
  • जिल्ह्यातील सर्व कोविड रूग्णालय, कोविड केअर सेंटर सुरू करावीत
  • औषधीसाठा व ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी ठेवा

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : सध्या राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातील रूग्णवाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणेनी सज्ज रहावे. जिल्ह्यात सध्या सक्रीय रूग्णसंख्या वाढत आहे. तरी प्रत्येकाने तोंडावर मास्क वापरावा, लसीकरण केले नसल्यास लसीकरण करून घ्यावे, दुसरा डोस आलेल्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा, गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक सुरक्षा अंतर पाळावे. अशाप्रकारे कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सूचना देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सवडे, सहायक आयुक्त (औषध प्रशासन) श्री. बर्डे आदी उपस्थित होते.

   जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांमधील ऑक्सिजनची व्यवस्था अद्ययावत करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजनची व्यवस्था पाहण्यासाठी स्वत: दौरा करणार आहे. तसेच अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करावे. या पथकानेही जिल्ह्यात दौरा करून सर्व रूग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा, पाईप लाईन, ऑक्सिजनचा साठा आदींची पाहणी करावी. तसेच ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची चाचणी घेवून तपासणी करावी. जिल्ह्यात मागील लाटेत जास्तीत जास्त 18 मे. टन ऑक्सिनची गरज होती. त्यानुसार यावेळी नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पीएसए प्लँट सुरू करून तपासून घ्यावा. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करावे. त्यासाठी लसींची अधिकची मात्रा ठेवण्यात यावी.  

  ते पुढे म्हणाले, चाचण्यांची संख्याही वाढविण्यात यावी. सध्या आरटीपीसीआर किटचा पुरवठा 1000 चा होत असून गरज 15000 ची आहे. त्यानुसार मागणी नोंदविण्यात यावी. सिं. राजा येथे नवीन एलएमओ टँक बसविण्यात यावा. सर्व एलएमओ व पीएसए प्लँट सुरू करून पहावे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.  मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध पोलीस विभागाने कारवाई करून रात्रीचा जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. ओमायक्रॉन या नविन व्हेरींएंटचे रूग्ण असल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. त्यांची तपासणी करून घ्यावी.

     जिल्ह्यात इयत्ता 1 ते 8 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी सुचना देवून शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सध्या 17 पीएसए प्लँट, 4 एलएमओ प्लँट व 45 ड्युरा सिलेंडर मधून 99.90 मे.टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिला डोसचे काम  90 टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसरा डोसचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा 5298 पुरवठा आहे, अशी माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली.  बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

                                                                                    **********

 

 

 

क्रीडा संकुलांमधील सुविधांचा दर्जा सुधारण्यात यावा

                       

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती बैठक
  • क्रीडा संकुलातील मानधन तत्वावरील व्यक्तींचे मानधन वाढवा

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुल आहेत. अनेक ठिकाणी क्रीडाविषयक सुविधा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आल्या आहेत.  तसेच काही ठिकाणी क्रीडा सुविधा देण्याचे प्रस्तावित आहेत. तरी उपलब्ध क्रीडा सुविधांचा दर्जा सुधारण्यात येवून प्रस्तावित ठिकाणी दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.  

   जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, अशासकीय सदस्य संदीप मेहेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिक्षणाधिकारी श्री.मुकुंद  आदी उपस्थित होते.  

   क्रीडा संकुलांमध्ये मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचे मानधन वाढविण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, सध्या कार्यरत असलेल्या मानधन तत्वावरील व्यक्तींना तुटपुंजे मानधन देण्यात येते.  तरी शिपाई पदावर कार्यरत असलेल्यांचे मानधन 3 हजार रूपये व लिपीकाचे मानधन 5 हजार रूपये करावे. तसेच क्रीडा संकुलांमध्ये साफ सफाईची कामे नियमितपणे करण्यात यावी. यासाठी तालुका क्रीडा अधिकारी यांना समितीच्या निधीमधून स्थानिक स्तरावर 10 हजार रूपये खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रेक्षक गॅलरी करण्यात येवून लाईट्स लावण्यात यावे. जेणेकरून खेळाडू व प्रेक्षकांना सुविधा होईल. जिजामाता व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडून गाळ्यांसाठी नियमानुसार भाडे आकारणी करण्यात यावी. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        ********

 

                      कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी, इयत्ता 1 ली ते 8 वी शाळा बंद

  • प्रत्यक्ष अध्ययन बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : कोविड 19 च्या विषाणू प्रकारातील ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना व योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषाणू प्रादुर्भावावर सध्या 15 वर्षाखालील मुलांना सद्यस्थितीत लस उपलब्ध नसल्यामुळे तसेच शाळा सुरू झाल्यामुळे सदर रोगाचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा व  साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम अन्वये कोविडच्या प्रसार रोखण्यासाठी इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष अध्ययन पद्धतीने बंद ठेवून पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये केला आहे.  

    तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग कोविड 19 च्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्ययन कार्य सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेवून याबाबत 31 जानेवारी 2022 नंतर पुढील आदेश निर्गमीत करण्यात येणार आहे. इयत्ता 9 वी व पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी आरटीपीसीआर किंवा रॅपीड टेस्ट करण्यात यावी. शाळेत सोशल डिस्टसिंग, थर्मल स्कॅनिंग, सॅनीटायझेशन व मास्कचा वापर करून सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या कालावधीत सर्व शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच सर्व शिक्षकांनी 15 वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने पुर्ण करून घ्यावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहीता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहीतामधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.  

                                                                        *****

 

चिकू, रामफळ व चिंच फळांच्या लिलावाचे 11 जानेवारी रोजी आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्हा फळरोप वाटिका बुलडाणा येथील सरकारी बगीचा येथे असेलेले चिकू मातृवृक्ष संख्या 105, रामफळ मातृवृक्ष संख्या 38 व चिंच मातृवृक्ष संख्या 8 या झाडांच्या फळांचा जाहीर लिलावाचे 11 जानेवारी रोजी जिल्हा फळरोपवाटीका, धाड रोड, बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी जाहीर लिलावास इच्छुक असणाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि अधिकारी सचिन चेके यांनी केले आहे.

                                                                                    **********

आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासचे मिळणार स्मार्ट कार्ड

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : परिवहन महामंडळाकडून नव्याने स्मार्ट कार्ड द्वारे आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना सुरू होत आहे. या योजनेतंर्गत 4 दिवस व 7 दिवस चे पास हे स्मार्ट कार्ड द्वारे मुख्य बसस्थानकावरून वितरीत करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट कार्डद्वारे पास घेतल्यास प्रवाशांना नोंदणी एकदाच करावी लागणार आहे. दरवेळेस फॉर्म व फोटो द्यावा लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होईल. या स्मार्ट कार्डवर फोटो उपलब्ध असल्यामुळे दुसरे फोटो ओळखपत्र बाळगण्याची गरज नाही. ज्या ज्या वेळेस आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा 4 किंवा 7 दिवसाचा लाभ घ्यावयाचा असल्यास सदरचे स्मार्ट कार्ड केवळ टॉप अप करावयाचे आहे. टॉप अप कोणत्याही बसस्थानकावरून करता येणार आहे. स्मार्ट कार्ड असल्यानंतर 4 किंवा 7 दिवस तसेच साधी, शिवशाही बसचा दोन्हीही प्रकारच्या पासचे टॉप अप करता येणार आहे. तरी प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

                                                            ******

No comments:

Post a Comment