Monday 10 January 2022

DIO BULDANA NEWS 10.1.2022

 



नियोजन समिती निधीतून विधायक कामे करून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधावा

- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

* वित्तीय कमाल मर्यादेत सर्वसाधारणसाठी 257.22 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 127.05 कोटी

* आदिवासी उप योजनेसाठी 14.66 कोटी रूपये

* देवपूर, रणथमसह प्रकल्पांचा भुसंपादनचा मोबदला देण्यात यावा

* पंतप्रधान आवास योजनेचे डिपीआर मंजूर घरकुलांना निधीसाठी पाठपुरावा करावा

* खचलेल्या, बुजलेल्या विहीरींसाठी रोहयोतून मदत द्यावी

* महावितरणने पेड पेंडींग जोडण्या देण्याची कार्यवाही करावी

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 10 - सन 2022-23 करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना मिळून 398.93 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा 257.22, अनुसूचित जाती उपयोजनेचा 127.05 व आदिवासी उपयोजनेसाठी 14.66 कोटी रूपयांचा त्यामध्ये समावेश आहे. समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील निधीमधून आरोग्य, शिक्षण, रस्ते व ग्रामविकासावर प्राधान्य देणार आहे. या निधीचा उपयोग विधायक कामांसाठी करून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनातून पालकमंत्री डॉ. शिंगणे उपस्थित होते.  याप्रसंगी केंद्रीय ग्रामसमितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव,आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, प्र.जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे आदी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. तसेच ऑनलाईन पद्धतीने आमदार जि.प अध्यक्ष मनिषा पवार, आमदार श्वेताताई महाले, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, ॲड आकाश फुंडकर, जि.प उपाध्यक्ष कमलताई बुधवत, सभापती रियाजखा पठाण, राजेंद्र पळसकर, पुनमताई राठोड आदींसह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

    मागील दोन वर्षापासून कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाला कोविड नियंत्रणासाठी निधी देण्यात आल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात आलेल्या निधीचा उपयोग आरोग्य यंत्रणा सुदृढ करून पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी करावा. जिल्ह्यात पाझर तलाव, लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात येते. मात्र अद्यापही भूसंपादनाचे 22 कोटी रूपये द्यावयाचे आहे. याबाबत संबंधित विभागाने सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घ्यावा. उपलब्ध निधीनुसार प्रकल्प निहाय मोबदला वितरीत करावा. देवपूर क्रमांक 2, रणथम आदींसह विविध प्रलंबित मोबदला तातडीने देण्याची कार्यवाही करावी.  जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलांचा डीपीआर मंजूर असलेल्या घरकुलांचा निधी प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी म्हाडा मार्फत पाठपुरावा करून केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेला निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे.

   पुरसंरक्षक भिंतीचे प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, त्यापैकी काही प्रस्तावांचे अंदाजपत्रक यंत्रणांमार्फत प्राप्त आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे निधी उपलब्धतेनुसार पूर संरक्षक भिंतींचे प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. लोणवडी ता. नांदुरा येथील तलावाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कार्यवाही करावी. परतीच्या नुकसान होवून मदत न मिळालेल्या तालुक्यांसाना मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न करण्यात यावे. अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहीरींची नुकसान भरपाई मिळण्यासाठी यासाठी संबंधित विभागने जिल्ह्यातून माहिती गोळा करावी.  या नुकसानग्रस्त विहीरींच्या तालुकानिहाय याद्या बनविण्या याव्या. त्यासाठी रोहयोच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून पशु वैद्यकांची नियुक्ती करावी. त्यामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा देणे सोयीचे होईल. महातिवरणने रोहीत्रांची क्षमतावृद्धी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा उपयोग करावा. तसेच जिल्ह्यात कृषि पंपाची पेड पेडींगच्या जोडण्या देण्याची कार्यवाही करावी. पेड पेडींगची प्रलंबितता कमी करावी.  

  खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध मुद्दे मांडले. ते म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतील एजन्सी बदलण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा. मंजूर घरकुलांच्या निधीसाठी परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. रोजगार हमीत योजनेच्या माध्यमातून अतिवृष्टरीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहीरींचा कामे करताना 60 : 40 चा रेशो ठेवावा. तसेच लव्हाळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे अपघातप्रवण काम दुरूस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र द्यावे.  यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. या समस्यांवर पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी माहिती दिली. प्रारूप आराखडा 2022-23 ची माहिती सहा. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी दिली. तसेच परतीच्या पावसाने नुकसान भरपाईपासून राहीलेल्या तालुक्यांना मदत मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ठराव घेण्यात आला.  बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विभागप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 637 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 46 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 637 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 46 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 43 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 588 तर रॅपिड टेस्टमधील 49 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 637 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :19, बुलडाणा तालुका : उमाळा 1, मोताळा तालुका : पोफळी 1, चिखली तालुका : धोत्रा नाईक 1, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : येऊलखेड 1, खेर्डा 3, खामगांव शहर : 4, मेहकर शहर : 1, नांदुरा शहर : 4, लोणार तालुका : खळेगांव 2, जळगांव जामोद तालुका : पळशी वैद्य 1, बोराळा 1.    अशाप्रकारे जिल्ह्यात 46 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 753267 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87001 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87001 आहे.  आज रोजी 651 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 753267 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87859 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87001 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 182 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                                    **********

जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह निर्बंध लागू

  • कोविड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा बंधनकारक

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : राज्य शासनाने कोविड च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही 10 जानेवारी 2022 पासून निर्बंध व सुट दिलेल्या सेवांसह प्रतिबंधात्मक आदेश प्र. जिल्हादंडाधिकारी धनजंय गोगटे यांनी आदेश परित केले आहे. जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह हे निर्बंध लागू राहणार आहेत.  सेवांसाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे बंधनकारक आहे.

  या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने, पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप, तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी) आदी दुकाने,  कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने,वनीकरणाची कामे, मान्यताप्राप्त माध्यम,   सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक, पाणी पुरवठा सेवा, लसीकरण केलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणार आहे.  

    स्वीमिंग पुल, स्पा, जिम, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सलून क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू असतील. सलुनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्या.  सर्व प्रकारच्या शाळा, कोचिंग क्लासेस व महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद असतील. शिक्षकांना प्रशासकीय कामकाजाची मुभा असेल.   लग्न समारंभाकरीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे.  सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असेल. आठवडी बाजार बंद असतील.  जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा, क्रीडा शिबिरे व उपक्रम आयोजनास बंदी असेल. आधीच जाहीर स्पर्धा कोविड नियमांचे पालन करून सुरू राहतील. शॉपिंग मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद असतील.

  मनोरंजन स्थळे, प्राणी संग्रहालय, वस्तु संग्रहालय, किल्ले व लोकांसाठी तिकिट लावलेली ठिकाणे संपुर्णत: बंद राहील.  सिनेमागृहे, नाट्यगृहे एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

   सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी कामासाठी येताना कार्यालय प्रमुखांची परवानगी लागेल. कार्यालय प्रमुखांनी बैठका , संवाद हा ऑनलाईन पद्धतीने करावा.   खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणार नाही. याची दक्षता घ्यावी.

     सर्व आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरीता आप आपल्या स्तरावरुन त्रिसुत्री पध्दतीची अमलबजावणी करावी. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 2022 रोजी श्री. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठया प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. श्री राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ व कार्यक्रमाचे जिजाऊ सृष्टी स्थळ प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 12 वर आहे. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे हा सोहळा 50 व्यक्तींच्या उपस्थितीत अटी व शर्तीचे अधीन राहून साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तरीसुद्धा या सोहळयास उपस्थित राहणाऱ्या जनतेच्या सुरक्षा व वाहतुकीच्या सुनियमांसाठी या महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविणे क्रमप्राप्त आहे.

   मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 (1) सह कलम 36 अन्वये बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी बुलडाणा प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 12 वरील मालेगांव ते जालना मार्गे सिंदखेडराजा रोड वरील येणारी व जाणारी वाहतुक दि. 11 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 12 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत एक दिवसासाठी पर्यायी मार्गाने वळविली आहे.  शासकीय वाहने (केंद्र सरकार, राज्य सरकार) सर्व अति महत्वाच्या व्यक्तींची वाहने, तात्काळ सेवा- रुग्णवाहीका, शववाहीनी, अग्नीशामक दलाची वाहने व जिवनावश्यक वस्तुंची वाहने वगळता सर्व वाहनांसाठी नमुद कालावधी करीता हा आदेश लागु राहील.

  या महामार्गावर पर्यायी मार्गाकरीता ‘डिव्हीजन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महामार्गावर वाहतुक वळविण्यासाठी कट ऑफ पॉईंट देण्यात आले आहे. सदर कट ऑफ पाँईंट व पर्यायी महामार्ग पुढील प्रमाणे : मेहकर उपविभाग - कट ऑफ पॉईंट: मेहकर ते सारंगपूर (सुलतानपूर) रस्त्यावरील बायपास मार्गावर, पर्यायी मार्ग- मालेगांव-मेहकर-चिखली-दे.राजा-जालना. कट ऑफ पॉईंट: लोणार ते सुलतानपूर येथील सिंदखेड राजा टि पॉईंट, पर्यायी मार्ग- लोणार-मेहकर-चिखली-दे.राजा- जालना, कट ऑफ पॉईंट: बिबी गावातील मांडवा टि पॉईंट, पर्यायी मार्ग- बिबी- मलकापूर पांग्रा- साखरखेर्डा- लव्हाळा- चिखली- दे.राजा- जालना, बिबी- मलकापूर पांग्रा- सावखेड नागरे- अंढेरा- दे.राजा- जालना. दे.राजा उपविभाग : कट ऑफ पॉईंट: दुसरबीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पर्यायी मार्ग- दुसरबीड-मलकापूर पांग्रा- साखरखेर्डा- लव्हाळा- चिखली- दे.राजा- जालना, दुसरबीड-मलकापूर पांग्रा- सावखेड नागरे- अंढेरा-दे.राजा- जालना. कट ऑफ पॉईंट: तढेगांव फाटा येथील लाँग मार्चजवळ, पर्यायी मार्ग- दुसरबीड- तढेगांव- टाकरखेड वायाळ- खैरव- दे.मही- दे. राजा- चिखली रस्ता, कट ऑफ पॉईंट: किनगांव राजा जवळ हिवरखेड पुर्णा बसस्टँण्ड टी पाँईंट, पर्यायी मार्ग- किनगांव राजा- हिवरखेड पुर्णा- सावंगी टेकाळे- रेाहणा फाटा- दे.राजा ते चिखली रस्ता, कट ऑफ पॉईंट: माळ सावरगांव जवळ तुळजापूर टि पॉईंट, पर्यायी मार्ग- तुळजापूर फाटा- तुळजापूर- गिरोली खुर्द- दे.राजा, कट ऑफ पॉईंट: मिस्त्री कोटकर पेट्रोलपंप जालना नाका दे.राजा, पर्यायी मार्ग- दे.राजा- चिखली- मेहकर- मालेगांव, कट ऑफ पॉईंट: नाव्हा रोड जालना टि पॉईंटजवळ, जालना, पर्यायी मार्ग- जालना- दे.राजा- चिखली- मेहकर- मालेगांव, असा राहणार आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ************

 

No comments:

Post a Comment