Monday 24 January 2022

DIO BULDANA NEWS 24.1.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 582 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 297 पॉझिटिव्ह

  • 186 रूग्णांना मिळाली सुट्टी, 1 मृत्यू

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 879 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 582 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 297 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 284 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 375 तर रॅपिड टेस्टमधील 207 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 582 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 79, बुलडाणा तालुका : साखळी 1, हतेडी 2, रायपूर 1, करवंड 1, डोंगरखंडाळा 1, उमाळा 1, नांद्राकोळी 4, चिखली शहर : 27, चिखली तालुका : भालगांव 1, शेलूद 1,सावरखेड 1, कवठळ 1, अंत्री कोळी 1, अमडापूर 1, शेलगांव जहा 1,  खोर 1, मंगरूळ इसरूळ 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : बोराखेडी 1, दे.राजा तालुका : अंढेरा 1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, शेगांव शहर : 54, शेगांव तालुका : पलोदी 1, लासुरा 1, चिंचोली 2, जवळा बु 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : काकोडा 1,  सोनाळा 34, टुनकी 1, बावनबीर 1, खामगांव शहर : 43, खामगांव तालुका : टेंभुर्णा 2, पि. राजा 1,वझर 1,पारखेड 2, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : जिगांव 1, माळेगांव गोंड 1, जळगांव जामोद तालुका : काजेगांव 1, मडाखेड बु 1, इलोरा 1, चावरा 1, खेर्डा 1, बोराळा खु 1, जळगांव जामोद शहर : 1,  परजिल्हा : अकोट 1, मनात्री ता. तेल्हारा 1, डोंगरगांव ता. बाळापूर 2,  अशाप्रकारे जिल्ह्यात 297 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 186 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वसंतवाडी, खामगांव येथील 86 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 769063 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 88281 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 88281 आहे.  आज रोजी 293 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 769063 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 91417 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 88281 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 2457 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 679 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********

उन्हाळी हंगामासाठी भुईमुग बियाणे ग्राम बिजोत्पादन योजनेतंर्गत अनुदानावर उपलब्ध

  बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :   उन्हाळी 21-22 हंगामासाठी राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियांनातर्गत बियाणे व लागवड साहित्य उपभियान मध्ये भुईमुग बियाण्याकरीता ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर बियाणे विक्री महाबीज अकोला मार्फत जिल्ह्यासाठी विक्रेते व उपविक्रेत्यांमार्फत सुरु होत आहे.

    सदरील योजनेमध्ये भुईमुग पिकामध्ये टॅग – 24 या वाणाचे बियाणे उपलब्ध आहे. भुईमुग 20 किलो बॅग ची मूळ किंमत 3 हजार 300 रूपये व अनुदान 1 हजार 400 रूपये प्रती बॅग आहे.  अनुदानित किंमत 1 हजार 900 रूपये प्रती बॅग आहे. जिल्ह्यासाठी भुईमुग पिकाचे 1 हजार क्विंटल बियाण्याचे लक्षांक कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेले आहे. या योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या मात्रेमधून एका शेतकऱ्याला एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत 40 किलो पर्यंत अनुदानावर मिळणार आहे.

तरी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी (MahaDBT) प्रणाली व्दारे 28 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज ऑनलाईन करणे बंधनकारक आहे. तसेच महाडीबीटी पोर्टल व्दारे निवड पत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे उपलब्ध होणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक यांनी कळविले आहे.

                                                                        *********


जिल्हा वार्षिक योजनेसाठी जिल्ह्याला 57.78 कोटी वाढीव तरतूद मंजूर

  • जिल्हा वार्षिक योजनेची वित्तीय मर्यादा 257.22 कोटी
  • जिल्हा वार्षिक योजनेच्या वाढीव 57.78 कोटीसह एकूण 315 कोटी रूपये

  बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण2022-23 साठी जिल्ह्याची 257.22 कोटी रूपयांची वित्तीय मर्यादा आहे. या वित्तीय मर्यादेच्या आराखड्यात 57.78 कोटी रूपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा पुढील आर्थिक वर्षाचा आराखडा वाढीव तरतूदीसह 315 कोटी  रूपयांचा झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण2022-23  राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन आज 24 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग कक्षात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहा जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.  

    यावेळी जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेल्या सि.राजा व लोणार पर्यटन विकास आराखड्यासाठी वेगळी तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच लोणार व सिं.राजा पर्यटन विकासासाठी स्वतंत्र निधी मिळणार असल्यामुळे आराखडाही गतीने पुढे जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेकरीता वाढीव तरतूदीसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

                                                            **********


कोरोना नियमांचे कडक पालन करून शाळा सुरू कराव्यात

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • 28 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे नियोजन

  बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  जिल्ह्यातील 1 ते 12 पर्यंतच्या सर्वच शाळा कोरोना नियम, शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात. शाळांमध्ये सॅनीटायझेशन, सोशल डिस्टसिंग व हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेण्यात यावी, अशा सूचना आज पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

   शाळा सुरू करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री परिस्थितीचा आढावा घेत बोलत होते. याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनीषाताई पवार, आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, श्री. मुकूंद आदी उपस्थित होते.  

   कोरोनाचे सर्व नियम शळांना पाळण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, 28 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. शाळेत सर्वांना मास्क वापण्याची सक्ती करावी. याबाबत शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सुचना निर्गमीत कराव्यात, असे आदेशही पालकमंत्री यांनी दिले.

    शाळा सुरू करणेबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 27 जानेवारी 2022 पर्यंत आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. शाळा दररोज किमान 3 ते कमाल 4 तास कालावधीसाठी घेण्यात यावी. इयत्ता 9 वी ते 12 वीच्या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये सकाळ / दुपार अशा दोन पाळी वर्ग भरविण्यात यावे. मैदानावरील खेळ, स्नेह संमेलन, दैनिक परिपाठ आदी गर्दीच्या कार्यक्रम आयोजनावर बंदी राहील.    विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला असल्यास शाळेत येण्याबाबतची सक्ती करण्यात येवू नये. विद्यार्थ्यांच्या पालकांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देवून जनजागृती करावी. लसीकरण न झालेल्या शिक्षकांना शाळेत प्रवेश देवू नये. शाळेत उपस्थित राहण्याकरीता पालकांची लेखी संमती आवश्यक राहणार आहे. एका बाकावर शक्यतो एकच विद्यार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी. तसेच दोन बाकांमध्ये सुरक्षीत अंतर राखण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्याची व्यवस्था करावी. शालेय परीसराची नियमित स्वच्छता राखावी, असे शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक आदेशात नमूद आहे.

                                                                        ********

   

                     


घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील भुखंड वाटप तातडीने करावे

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • तेल्हारा गावातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करावी

    बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड व पांढरदेव गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी कालबद्ध कार्यवाही करावी.  घानमोड व मानमोड येथील पुर्नवसित गावाच्या जागेवरील भूखंडाचे तातडीने वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील पुनर्वसन आणि तेल्हारा येथील नागरी सुविधांबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. माचेवाड, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

   पालकमंत्री डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, घानमोड व मानमोड येथील भूखंडावर अतिक्रमण असल्यास आहे, त्याच स्थितीत त्याच जागेवर भुखंड देवून पुनर्वसन करण्यात यावे. याबाबत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे पांढरदेव येथील भूखंडांचे सीमांकन करून घ्यावे. सीमांकन झाल्यानंतर विनाविलंब भुखंडाचे वाटप करावे. यामध्ये दिरंगाई करू नये. निधी, भूखंड वाटप व नागरी सुविधांच्या कामांचा कालबद्ध  कार्यक्रम आखावा. या कार्यक्रमाचे वेळापत्रकच उपोषणकर्त्यांना देवून उपोषण कर्त्यांचे समाधान करावे. तसेच काही भूखंडावर घरे असल्यास व ती पडलेली असल्यास त्या घरांचे जुन्याच मुल्यांकनानुसार मुल्यांकन करावे.

  ते पुढे म्हणाले, भूसंपादन प्रकरणे निधीअभावी व्यपगत झाली आहेत. या प्रकरणांमध्ये तातडीने निधी मागणी प्रस्ताव संबंधित यंत्रणेने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा.  तसेच पारंपारिक पद्धतीने भुसंपादन केल्यापेक्षा सरळ खरेदी पद्धत अवंलबवावी. यामुळे गतीने भुसंपादन होवून मोबदलाही तातडीने देणे शक्य होईल.  तेल्हारा या गावाने स्वेच्छा पुनर्वसन केले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे, या गावाने शासनाचा मोठा निधी वाचविला आहे. त्यामुळे तेल्हारा येथील भूखंड मालकांची नावे नमुना 8 वर चढवावी. त्यासाठी लाभार्थीनुसार भुखंड वाटप करून हा प्रश्न सोडवावा. तसेच गावातील नागरी सुविधांची कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. याबाबत स्वतंत्र बैठकही घेण्यात येईल.    त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मासरूळ व अमडापूर गटातील प्रलंबित, नवीन प्रस्तावित कामे पुर्ण करावी. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा अंतर्गत निधीची तरतूद करावी. पांदण रस्ते, जामठी येथील शाळा खोल्यांचे बांधकाम तातडीने पुर्ण करावे. अमडापूर गटातील स्मशान भूमी सौंदर्यीकरण, पाझर तलाव दुरूस्ती करावी.

   यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनीसुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यासाठी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले यांनीसुद्धा यापूर्वी उपोषणकर्त्यांच्या मंडपाला भेद देवून विनंती केली आहे. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीनेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        ************

जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा, प्रजासत्ताक दिनी वितरण

    बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनलाय, द्वारा क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ता यांना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.  जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, बुलडाणा मार्फत सन 2020-2021 या वर्षाकरीता  स्वामी सुधाकर दळवी (गुणवंत खेळाडू-पुरुष),  कु.मोनाली चंद्रहर्ष जाधव (गुणवंत खेळाडू-महिला), विजय भाऊराव पळसकर (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक), मिहीर नितीन अपार (विशेष जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार) पुरस्कारार्थींची निवड करण्यात आलेली आहे.  

    या पुरस्काराचे स्वरुप  दहा हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असुन, 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचेहस्ते व जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

 

 

 

   सन 2020-21 या वर्षीचा गुणवंत खेळाडू (पुरुष) हा पुरस्कार स्वामी सुधाकर दळवी या खेळाडूस प्रदान करण्यात येत आहे.  या खेळाडूने मागील पाच वर्षात सन 2016-17 व 2018-19 या वर्षीच्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तर सन 2018-19 मध्ये दोन रजत पदक प्राप्त केले आहे.

   सन 2020-21 या वर्षीचा गुणवंत खेळाडू (महिला) हा पुरस्कार कु. मोनाली चंदहर्ष जाधव या खेळाडूस प्रदान करण्यात येत आहे. या खेळाडूने मागील पाच वर्षात रांची (झारखंड) या ठिकाणी संपन्न झालेल्या  7 वी ऑल इंडीया आर्चरी चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्ण पदक तर कट्टक (ओडीसा) या ठिकाणी संपन्न झालेल्या 39 वी ऑल इंडीया सिनीयर नॅशनल आर्चरी चॅम्पीयनशीप मध्ये रजत पदक प्राप्त केले . दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

     सन 2020-21 या वर्षीचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार विजय भाऊराव पळसकर यांना प्रदान करण्यात येत आहे. मागील 10 वर्षात आट्यापाट्या या खेळात जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करुन पदक विजेते खेळाडू घडविलेले आहे. ते सद्या तालुका क्रीडा संकुल मलकापुर येथे आपल्या खेळाचा नियमित प्रचार व प्रसार करीत आहे. सन 2020-21 या वर्षीचा विशेष जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार हा पुरस्कार मिहीर नितीन अपार यांना प्रदान करण्यात येत आहे. या खेळाडूने पोलंड येथे झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीप मध्ये भारतीय संघाकडून सहभागी घेवून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

                                                            ******

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन

• उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

• 31 जानेवारीपर्यंत चालणार मेळावे

बुलडाणा,(जिमाका)दि.24 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 24 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे.

   या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

     रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना रोजगार संधी सोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                            *****

No comments:

Post a Comment