Tuesday 4 January 2022

DIO BULDAN NEWS 4.1.2022

 

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे मिळाली 31 हजार 314 रूग्णांना संजीवनी

  • 74 कोटी 72 लक्ष रूपयांचा खर्च
  • 996 उपचारांचा मिळतो लाभ, जिल्ह्यात 24 अंगिकृत रूग्णालये

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य अभियान व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना एकत्रितरित्या राबविण्यात येते. या योजनेमुळे गरीब, गरजू लोकांना दुर्धर आजारांच्या उपचारांमध्ये मदत होत आहे. शस्त्रक्रीया असो, दुर्धर आजार असो.. मेंदूचा विकार असो किंवा पोटाचा आजार असो.. उपचारासाठी आता चिंता नाही. साध्या केशरी शिधापत्रिकेच्या पुराव्यावर या योजनांचा लाभ अंतिकृत रूग्णालयांमधून देण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल व्यक्तींना उचपारासाठी पैशांची चिंता नाही.. ही योजना त्यांच्यासाठी संजीवनीच ठरली आहे. जिल्ह्यात 1 एप्रिल 2020 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत 31 हजार 314 रूग्णांनी या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या रूग्णांच्या उपचारापोटी शासनाने 74 कोटी 72 लक्ष 9 हजार 382 रूपयांचा खर्च उचलला आहे. सदर रक्कम उपचार घेतलेल्या अंगिकृत रूग्णालयांना शासनाने पाठविली आहे.

    महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनंतर्गत 996 उपचारांचा लाभ देण्यात येत असून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत 1209 उपचारांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत उपचारासाठी केवळ शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा दाखला किंवा शासन मान्य छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. जिल्ह्यात 24 अंगिकृत रूग्णालयांमधून या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. कोविड 19 साथरोगाच्या गंभीर अवस्थेतील रूग्णांना या योजनांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो.  कोविड काळात या योजनांमुळे अनेकांना उपचार मिळू शकले. या योजनांमधून आतापर्यंत 14 हजार 26 शेतकऱ्यांनासुद्धा उपचाराचा लाभ देण्यात आला आहे. यापोटी शासनाने 34 कोटी 66 लक्ष 31 हजार रूपये खर्च केले आहे. एकूण लाभार्थ्यांमध्ये 1749 रूग्णांनी हृदयरोगासाठी उपचार घेतले आहे. हृदयरोगावारील उपचारापोटी अंगिकृत रूग्णालयांना शासनाने 11 कोटी 89 लक्ष 35 हजार रूपये पाठविले आहे. एवढेच दुर्धर आजार असलेल्या कर्करोगावरील उपचारही योजनांमधून करण्यात येतात.    

   जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 10 रूग्णांना कर्करोगावारील उपचाराचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतून अस्थिरोग शस्त्रक्रीयांचा लाभही देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात 4348 असून यापोटी शासनाने 10 कोटी 31 लक्ष 51 हजार रूपये खर्च केले आहे. अनेक अपघातग्रस्त रूग्णांवर या अस्थिरोगावरील उपचार प्रकारातून लाभ देण्यात आला आहे. बाल रोगावरील उपचार घेणारे लाभार्थी जिल्ह्यात 2498 असून यापोटी शासनाने 6 कोटी 3 लक्ष 4 हजार रूपये खर्च उचलला आहे.  जिल्ह्यात खारपाणपट्टा असल्यामुळे किडनीचे आजाराचे रूग्ण जळगांव जामोद, संग्रामपूर, शेगांव आदी तालुक्यात आढळतात. अशा रूग्णांना उपचाराचा खर्च डोईजड होतो. शासनाने या योजनांमधून किडनी आजाराकरीता उपचार सुरू केले आहे. जिल्ह्यात 3225 रूग्णांनी किडनीवरील आजाराचे उपचार केले असून यापोटी 4 कोटी 97 लक्ष 57 हजार रूपये खर्च झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 31 हजार 314 रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला आहे. योजनांमुळे अनेकांचे प्राण वाचले असून ही योजना खरोखर रूग्णांसाठी संजीवनी ठरली आहे.  ही आहेत अंगीकृत रूग्णालये :  जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, अमृत हृदयालय बुलडाणा, सिटी हॉस्पीटल बुलडाणा, मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, संचेती हॉस्पीटल बुलडाणा, आस्था हॉस्पीटल मलकापूर, चोपडे हॉस्पीटल मलकापूर, कोलते हॉस्पीटल मलकापूर, मानस हॉस्पीटल मलकापूर, उपजिल्हा रूग्णालय मलकापूर, कोटारी हॉस्पीटल चिखली, तुळजाई हॉस्पीटल चिखली, धनवे हॉस्पीटल चिखली, मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मेहकर, सोनटक्के हॉस्पीटल खामागांव, साई हॉस्पीटल खामगांव, सामान्य रूग्णालय खामगांव, उपजिल्हा रूग्णालय शेगांव, माऊली डायलिसीस सेंटर शेगांव, ग्रामीण रूग्णालय वरवट बकाल ता. संग्रामपूर, ग्रामीण रूग्णालय जळगांव जामोद, ग्रामीण रूग्णालय दे. राजा व ग्रामीण रूग्णालय सिं.राजा.

                                               

                                *********

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत

 अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसुचित जाती नव बौद्ध घटकातील इयता दहावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना अर्ज करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली आहे.

     या योजनेअंतर्गत बुलडाणा नगर पालिका हद्दीपासुन 5 कि. मी. च्या परिसरात असलेली महाविद्यालये/ शैक्षणिक संस्थेत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणुन, भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्‍ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीत बॅंक खात्यात थेट जमा करण्यात येते.

   कोरोना – 19 च्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 व सन 2021-22 या कालावधीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा या कार्यालयास सादर करावे. हे अर्ज स्विकारण्यास दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तरी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                                ************

मिशन वात्सल्य अंतर्गत विधवा महिलांना मिळवून देणार शासनाच्या योजनांचा लाभ

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक एकल / विधवा असलेल्या महिलांचा शासकीय कार्यालयाशी संपर्क येत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या योजना व कार्यपद्धतीबाबत अनभिज्ञता असते. त्यामुळे शासकीय योजनांपासून अशा महिला व अनाथ बालके वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकल अथवा विधवा महिला व अनाथ बालके यांच्या कुटूंबांना प्रत्यक्षपणे भेट देवून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारीत मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे.

  अशा महिलांचे या योजनेतून पुनर्वसन करण्यात  येणार आहे.  कोविड आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरूषाचे निधन होवून एकल अथवा विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करून त्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्याकरीता तहसिलदार रूपेश खंडारे यााच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीची सभा 3 जानेवारी 2022 रोजी तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. पथकाच्या माध्यमातून अशा विधवा महिला व बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, पथकाने याबाबत सक्रीय होवून कार्य करावे, असे आवाहन तहसिलदा यांनी सभेत केले. सभेला गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे आदी उपस्थित होते.

                                                                                                *********

 

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

• 31 जानेवारी 2021 शेवटची मुदत

• 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 कालावधीतील प्रकाशित पुस्तक असावे

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजेनतंर्गत सन 2021 चे राज्य वाङमय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रकाशित झालेले प्रथम आवृत्तीचे पुस्तक ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखा अथवा सर्वसाधारण शाखेत उपलब्ध आहेत. सदर प्राप्त प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, मुंबई यांचेकडे पाठविण्यात येणार आहे. कालमर्यादेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाहीत.

    तसेच लेखक/प्रकाशक यांना पुरस्काराबाबत नियमावली व प्रवेशिका www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2021 या शिर्षकाखाली उपलब्ध आहे. तसेच https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावरही नियमावली व प्रवेशिक आहे. प्रवेशिका पुर्णत: भरून आवश्यक कागदपत्रांसह तसेच पुस्तकाराच्या दोन प्रतींसह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदीर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी,  असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ यांनी केले आहे.

                                                                                **********

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवड्याचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.4 :  आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

राज्यात सन 2020-21 पासून राबविण्यात येत आहे . ही योजना एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या आधारावर राबविली जात आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के कमाल 10 लाख अनुदान देय आहे. तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक याकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय आहे. याशिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांकरिताही लाभ देय आहे. इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळवण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक 3 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

     सन 2021-22 यायोजने अंतर्गत भांडवली गुंतवणूकीकरिता 5003 वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच 264 स्वयंसहाय्यता गट, 72 शेतकरी उत्पादक कंपन्या व 20 सहकारी संस्थांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. दिनांक 30 डिसेंबर पर्यंत 6188 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 1600 सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले असून 1250 आराखडे बॅंक कर्ज मंजूरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून कर्ज मंजुरीस सुरवात झाली असून आतापर्यंत १२० प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे. अनुषंगाने इच्छुक व्यक्तीं व गटांनी (स्वयं सहाय्यत गट,शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofpi. gov.in या MIS पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे . सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसीठी तालुका कृषि अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

                                                                                    *********

उद्योजक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रीत;

 इच्छूक उद्योजकांनी 14 जानेवारीपर्यंत अर्ज करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी दोन उद्योजकांना पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार विजेत्यास 15 हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व द्वितीय पुरस्कार विजेत्यास 10 हजार रुपये रोख व गौरव चिन्ह असे आहे. इच्छूकांनी 14 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा उद्योग केंद्र, मलकापूर रोड, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे.

   सन 2018-19, 2019-20,2020-21 या वर्षांसाठी जिल्हा पुरस्कारांकरीता जिल्ह्यातील पात्र उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने विनामुल्य जिल्हा उद्योग केंद्र, दुरदर्शन केंद्रासामोर, बुलडाणा यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच पुरस्काराकरीता अर्ज करण्याकरीता उद्योग घटक उद्योग आधार नोंदणी झालेला असावा. मागील तीन वर्षामध्ये सलग उत्पादन सुरु असावे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा व उद्योग घटकांस यापुर्वी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा. पुरस्कारा करीता निवड करतांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकांना विशेष गुण दिले जातील, असे महाव्यवस्थापक श्री. पाटील, जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

कोरोना अलर्ट : प्राप्त 334 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 05 पॉझिटिव्ह*

बुलडाणा, (जिमाका) दि. 4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 339 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 2 व रॅपिड अँटीजेन चाचणी मधील 3 अहवलांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 72 तर रॅपिड टेस्टमधील 262 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 334 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : शिवशंकर नगर 3, पर जिल्हा : गोंधळ वाडी ता. पातूर 1, शेगाव शहर : श्रीराम नगर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 5 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 748922 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86989 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86989 आहे. आज रोजी 496 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 748922 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87689 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86989 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 24 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 676 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

No comments:

Post a Comment