DIO BULDANA NEWS 29.05.2024

 




वाळूसाठे शोधण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करणार

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

*नांदुरा तालुक्यात 1775 ब्रास वाळू जप्त

*सिंदखेडराजा, खामगावात टिप्परवर कारवाई

बुलडाणा, दि‍. 29 : अवैध वाळूबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आठवडाभरापासून कार्यवाही करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात येत आहे. या वाळूसाठ्याचा शोध ड्रोन सर्व्हेक्षणाने घेण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात आढळणारा वाळूसाठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वाळूसाठा निदर्शनास येऊनही कारवाई केली नसल्यास संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

मलकापूर, नांदुरा, मेहकर आणि संग्रामपूर तालुक्यात वाळूसाठे आणि वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे 1775 ब्रास वाळू साठे जप्त केले. मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात अपर तहसिलदार आणि कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात बेलाड  गट नं. 224 येथे 354 ब्रास, बेलाड गट नं. 5 येथे 324 ब्रास, बेलाड गट नं. 19 येथे 103 ब्रास, येरळी गट नं. 236 येथे 85 ब्रास, बेलाड गट नं. 103 येथे 110 ब्रास, पलसोडा गट नं. 352 येथे 314 ब्रास, पतोंडा गट नं. 1 येथे 362 ब्रास, नांदुरा खुर्द येथे 123 ब्रास असा एकूण 1775 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला.

मलकापूर येथे काल दिवसभरात एकूण 400 ब्रास रेती साठा जप्त करून लिलावाची कार्यवाही करण्यात आली. उकळी, ता. मेहकर येथे 50 ब्रास रेती जप्त करण्यात आली. पूर्णा नदीकाठील सावळी, ता. संग्रामपूर गावानजीक वनविभागाच्या जमिनीवर चार विविध ठिकाणी सुमारे 480 ब्रास वाळू साठा आढळून आला. मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या सहाय्याने सदर वाळूसाठा जप्त करण्यात आला.

सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे 4 ब्रास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी एस. एस. म्हस्के, तलाठी जी. एस. टेकाळे, एस. जी. पांडव, आर. एस. देशमुख, व्ही. यू. कटारे, एस. आर. नागरे, आर. आर. लांडगे यांनी दि. 28 मे 2024 रोजी रात्री कारवाई केली. उमरद येथे समाधान नारायण मोरे, रा. ताडशिवणी यांच्या मालकीचे चार ब्रास रेती भरलेले टिप्पर क्रमांक एमएच 28 बीबी 7426 हा अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अटकाव करण्यात आला आहे. खामगाव येथे जप्त करण्यात आलेल्या वाहनाला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करून 64 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

000000

बुलडाणा येथे 10 जूनला डाक अदालत

बुलडाणा, दि. 29 : बुलडाणा येथील डाक घर अधीक्षक कार्यालयात सोमवार, दि. 10 जून रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाष, पत्रव्यवहार किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार होते. या तक्रारींचा योग्यप्रकारे निवडा करण्यासाठी डाक अदालत घेण्यात येते. त्यात पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडवितात.

पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यांच्या आत तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास अशा तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. यासाठी तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. यात तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असल्यास त्याचे नाव व हुद्दा याची माहिती देण्यात यावी. डाक सेवेबाबत तक्रार असल्यास गणेश आंभोरे, अधीक्षक डाक घर, बुलडाणा विभाग, बुलडाणा 443001 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 7 जून 2024 पर्यंत पोहोचतील असे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुधारित सूचनांनुसार राबविणार

बुलडाणा, दि. 29 : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सन 2024-25 या वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत सूचना शिक्षण संचालक, प्राथमिक, पुणे कार्यालयाकडून निर्गमित झाल्यानंतर राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल, वंचित शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग बालकांचे इयत्ता पहिली व पूर्व प्राथमिक वर्गस्तरावर कमीत कमी 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्यात तरतूद आहे. त्यानुसार 2024-25 या वर्षाची प्रवेश प्रक्रिया दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेद्वारे सुधारीत निकषानुसार सद्यस्थितीत राबविण्यात येत आहे.

            मात्र शासनाच्या 2024-25 या वर्षातील निर्गमित सुधारीत अधिसूचनेविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, रिट याचिका दाखल झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने शासनाच्या दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या सुधारीत अधिसूचनेस स्थगिती दिली आहे. सन 2024-25 या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच्या नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आरटीई पोर्टलवर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. स्वयं अर्थसहायीत शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगर पालिका शाळा स्वयं अर्थसहायीत शाळा यांचा समावेश करुन आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने अधिसूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

त्यामुळे शिक्षण संचालक यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना यथावकाश कळविण्यात येणार आहे. याची नोंद जिल्ह्यातील तालुकास्तर कार्यालये, आरटीई शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

000000

वाहनांवर 7 लाख 75 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई

बुलडाणा, दि. 29 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयाकडून विना वाहन नोंदणी क्रमांक, वाहन नोंदणी क्रमांक नियमानुसार नसणे, तसेच फॅन्सी वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा आणि नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 475 वाहनांवर 7 लाख 75 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात चालू वर्षी एप्रिल ते 24 मे 2024 पर्यंत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये 22 वाहनांवर 44 हजार रूपये दंड आकारण्यात आला. मे 2023 मध्ये 48 वाहनांवर 94 हजार रूपये, जून 2023 मध्ये 44 वाहनांवर 79 हजार रूपये, जुलै 2023 मध्ये 41 वाहनांवर 44 हजार रूपये, ऑगस्ट 2023 मध्ये 37 वाहनांवर 65 हजार 500 रूपये, सप्टेंबर 2023 मध्ये 17 वाहनांवर 18 हजार रूपये, ऑक्टोबर 2023 मध्ये 23 वाहनांवर 24 हजार रूपये, नोव्हेंबर 2023 मध्ये 32 वाहनांवर 58 हजार रूपये, डिसेंबर 2023 मध्ये 57 वाहनांवर 72 हजार रूपये, जानेवारी 2024 मध्ये 68 वाहनांवर 1 लाख 31 हजार 500 रूपये, फेब्रुवारी 2024 मध्ये 54 वाहनांवर 87 हजार रूपये, मार्च 2024 मध्ये 32 वाहनांवर 58 हजार रूपये दंड आकारण्यात आला.

चालू वर्षात एप्रिल 2024 मध्ये 44 वाहनांवर 81 हजार रूपये, मे महिन्यात आतापर्यंत 183 वाहनांवर 3 लाख 47 हजार 500 असा 227 वाहनांवर 4 लाख 28 हजार 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

0000000

पाणी टंचाई निवारणार्थ गिरडा, बोदेगाव येथे टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 29 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे गिरडा, बोदेगाव गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. गिरडा आणि बोदेगाव, ता. बुलडाणा येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गिरडा व बोदेगाव या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या