DIO BULDANA NEWS 26.05.2024
जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात
दोन दिवसात 1800 ब्रास वाळू जप्त
*16 लाखांचा महसूल जमा
बुलडाणा, दि. 26 : अवैध वाळू विरोधात महसूल विभागाने सातत्याने कारवाई करत आहे. गेल्या दोन दिवसात जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात 1800 ब्रास वाळू जप्त आली असून 16 लाखांचा महसूल जमा करण्यात आला आहे.
आज जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव पांडे येथील पाच विविध ठिकाणी अवैध वाळूचे साठे आढळून आले. यात 1450 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या जप्त करण्यात आलेल्या वाळूचा लिलाव करून यात सुमारे 13 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला.
जिगाव पुनर्वसन विभाग हिंगणा भोटा व जिगाव धरण विभागाच्या सांडवा कामाकरीता त्यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या मागणीनुसार प्रत्येकी 500 ब्रास रेतीचे चलन देण्यात आले. त्यानुसार त्यांना वाळूची उचल करण्याचे सांगण्यात आले. उर्वरित 450 ब्रास करिता जाहिर लिलाव घेण्यात आला. यात 1100 रुपये प्रती ब्रासप्रमाणे सर्वाधिक बोलीधारकास वाळूसाठा मंजूर करण्यात आला. यातील पाचपैकी दोघांचे चलन काढण्यात आले. उर्वरित ३ जणांचे महाखनिज ॲपवर नोंदणी नसल्याने चलन काढता आले नसल्याने सदर कार्यवाही उद्या करण्यात येणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे चार ठिकाणी अवैध रेतीचे अंदाजे 350 ब्रासचे साठे जप्त करण्यात आले. याबाबत सर्व शासकीय कंत्राटदारांना माहिती देण्यात आली. जप्त वाळू साठे घेण्याबाबत इच्छुकांकरिता जाहिरनामा काढण्यात आला. यात संग्रामपूर येथे दिवाणी न्यायालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांनी मागणी केल्याने सदर रेतीसाठा त्यांच्या सुपूर्द करण्यात आला. त्यांना येत्या 3 दिवसात पूर्ण रेतीसाठ्याची उचल करण्यास सांगितले आहे. त्यांना 350 ब्रासचे चलन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध रेतीचे साठे आढळून येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि महसूल विभागाची चमू कारवाई करत आहे.
गेल्या आठवडाभरापासून अवैध वाळू विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. येत्या काळातही संपूर्ण जिल्हाभरात अवैध वाळू विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे अवैध वाळूला चाप बसण्यास मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.
00000
Comments
Post a Comment