DIO BULDANA NEWS 28.05.2024

 


जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

बुलडाणा, दि. 28 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यानिमित्त उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार संजीवनी मुपळे, माया माने, नाझर गजानन मोतेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.

000000

















जिल्हाभरात रेती साठ्यावर जप्तीची कारवाई

*मेहकरात वाळूचे 11 टिप्पर जप्त

बुलडाणा, दि. 28 : जिल्हाभरात अवैध वाळूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने विविध ठिकाणी अवैधपणे साठविलेला वाळूसाठा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली वाळू त्याचठिकाणी लिलाव करून संबंधितांना देण्यात आली.

मेहकर शहरात एका ठिकाणी 30 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे रस्तावर 3 ब्रास रेतीचा साठा रात्री जप्त करण्यात आला. सदर रेतीसाठा रात्रीच गावातील घरकुल लाभार्थीना वाटप करण्यात आला. आज दिवसभरात मलकापूर तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे 300 ब्रास पर्यंत रेती साठा जप्त करण्यात आला. वडोदा, ता. मलकापूर येथे 50 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. वाघुड, ता. मलकापूर येथे 60 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. मलकापूर येथील गुरुद्वाराजवळ अंदाजे 60 ब्रास साठा जप्त करण्यात आला. मलकापूर येथील हाश्मीनगरमध्ये 50 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला.

            नांदुरा खुर्द, ता. नांदुरा येथे अंदाजे 120 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. जुने बेलाड गावठाण येथे अजून 300 ब्रास साठा जप्त करण्यात आला. आज बेलाड, ता. नांदूरा येथे सुमारे 125 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून लिलावाची कार्यवाही करण्यात येत आहे. खामगाव येथेील मोठी बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी अवैध वाळूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. याठिकाणच्या रेतीच्या स्टॉकचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यांना नोटीस देऊन पावती नसल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

आज कठोरा, ता. शेगाव येथे पहाटे उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव, ठाणेदार जळंब, शेगावचे नायब तहसीलदार श्री. काळदाते, तलाठी यांच्यासह कारवाई करण्यात आली. यात एक जेसीबी, एक टिप्पर जप्त करण्यात आले आहे. यात 300 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून शासकीय कामाकरीता देण्यात येणार आहे.

मेहकर तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकासह संयुक्त मोहिम राबविण्यात आली. किनगाव जट्टू, सावरगाव तेली, भुमराळा व वझर आघाव येथील अवैध रेतीसाठा आणि जमा करण्यात आलेल्या रेतीसाठा तपासणी, पडताळणी करण्यात आली. यात सावरगाव तेली येथील नदीकाठावर जाणारा नाल्यातील रस्ता जेसीबीने खोदून बंद करण्यात आला. भुमराळा येथे गावातील घरासमोर रस्त्याच्या कडेला, खुल्या जागेत असलेल्या लहान रेतीसाठ्यांची तपासणी करून सुमारे 30 ब्रास रेतीसाठा जप्त करून लिलाव करण्यात आला.

वझर येथील सरकारी ई-क्लास, खुल्या जागेवरील रेती ढिगाऱ्याची तपासणी केली असता याठिकाणी 180 ब्रास रेती साठा आढळून आला. सदर वाळू ग्रामपंचायतीला शासकीय कामाकरीता देण्यात आली. काल वझर आघाव, ता. लोणार येथे 180 ब्रास आणि भुमराळा येथे 31 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. ही रेतीची लिलाव करण्यात आली. दरम्यान आज लोणार येथे 437 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. सदर वाळूचा लिलाव करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सदर जप्तीची कार्यवाही उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने काल मेहकर आणि लोणार तालुक्यात 4 टिप्परवर कार्यवाही करून टिप्पर पोलिस ठाणे, लोणार येथे जमा करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या विशेष मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या 7 टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात 1 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहायक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ, प्रियंका काळे यांनी केली.

जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणावर साठविण्यात आली आहे. अशा अवैध वाळू साठ्याचा शोध तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी घेत आहेत. जिल्हाभरात साठविलेली अवैध वाळू जप्त करण्यात येत आहे. या वाळूचा जागीच लिलाव करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

00000

भारतीय सैन्य दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 28 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन डिफेंस सर्व्हीस या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात राज्य शासनातर्फे नव-नवयुवतींसाठी दि. 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत कंबाईन डिफेंस सर्व्हीस कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भेाजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी बुलढाणा येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 3 जून 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीला येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर पुणे यांच्या वेबसाइटवर सर्च करून त्यामधील कंबाईन डिफेंस सर्व्हीस कोर्स क्रमांक 63 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या किंवा व्हाट्सॲप क्रमांक 9156073306 या मोबाइल क्रमांकावर CDS कोर्स क्रमांक 63 हा मेसेज केल्यास संबंधित कोर्सची परिशिष्ट उपलब्ध करून दिली जाईल. शिफारस पत्र आणि त्यासोबत असलेली परिशिष्टची प्रिंट दोन प्रतीत घेऊन व ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे.

केंद्रामध्ये कंबाईन डिफेंस सर्व्हीस कोर्ससाठी प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या CDS या परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज केलेला असावा, अशी पात्रता धारण केली असावी.

याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा इमेल training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

अवसायनातील 104 संस्थांची नोंदणी रद्द होणार

*आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : अवसायनातील पदुम सहकारी संस्थाची नोंदणी रद्द करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०९ अंतर्गत तरतुदीनुसार अवसायनातील सहकारी संस्थाची नोंदणी रद्द करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 104 संस्थांची नोंदणी रद्द होणार आहे.

अवसायनातील संस्थाची नोंदणी रद्द करण्यापूर्वी संस्थाकडुन असलेले देणेघेणे आदीबाबतीत माहिती मागविणे आवश्यक आहे. संबंधित संस्था, त्यांच्या धनको ऋणको आणि अन्य संबंधितांचे म्हणणे एकूण घेण्यात येणार आहे. एकूण 104 अवसायनातील पदुम संस्थांमध्ये बुलढाणा 12, चिखली 3, मेहकर 14, लोणार 20, देऊळगाव राजा 10, सिंदखेड राजा 13, मोताळा 12, खामगाव 15, जळगाव जामोद 2, नांदुरा 2. संग्रामपूर 1 समावेश आहे.

सदर संस्थाची नोंदणी रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. नोंदणी रद्द करण्यापूर्वी अवसायक कार्यालयास त्यांच्या हरकती, आक्षेप सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दुग्ध, बुलडाणा प्रशासकीय इमारत, बुलडाणा यांच्याकडे प्रसिद्धीपासून 10 दिवसाच्या आत नोंदवावे लागणार आहे. अवसायनातील नोंदणी रद्द करावयाच्या पदुम सहकारी संस्थांची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळ, तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलढाणा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

सदर कालावधीत संस्थेच्या देण्याघेण्याच्या बाबतीत कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नसल्यास कोणाचीही हरकत नाही, असे गृहीत धरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिय 1960 चे कलम 109 अंतर्गत, तसेच कलम 21 अतर्गत नोंदणी रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असे सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलडाणा यांनी कळविले आहे.

00000

बोगस बियाण्यांच्या तपासणीसाठी मोहिम

बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये दर्जेदार बियाणे, रासायनिक खते मिळावे, तसेच त्यांची बोगस बियाण्यापासून फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहे. बियाणे, खते निरीक्षक यांच्याकडून मोहिम स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्र तपासणी करण्यात येत आहे. तपासणी करताना त्रृटी आढळल्यास पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या बी-बियाणे आणि रासायनिक खतांचे नमुने घेऊन प्रयोग शाळेमध्ये विश्लेषणासाठी सादर करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील निरीक्षकांनी बियाण्यांची एकूण 163 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. तसेच रासायनिक खताचे 45 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत सादर करण्यात आले आहे. किटकनाशकाचे 9 नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी सादर करण्यात आले आहेत.

कृषी केंद्रामध्ये तपासणी करताना बियाण्याबाबत त्रृटी आढळून आल्यामुळे 52 बियाण्यांची विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. तसेच 4 रासायनिक खतांची विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत.  दुकाने तपासणी आणि नमुने काढणे सातत्याने सुरू आहेत. बियाणे, खताबाबत तक्रारी असल्यास तालुका कृषि अधिकारी आणि पंचायत समिती कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

निवृत्ती वेतन धारकांनी फोन कॉल्स, संदेशापासून सावधानता बाळगावी

*जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : बुलडाणा जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

            जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन, सुधारीत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधाला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात असून याबाबतच्या कोषागार कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी. अशाप्रकारच्या फसव्या ऑनलाईन, गुगल पे, फोन पे, किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरुन आलेल्या कॉल्स किंवा संदेशाला प्रतिसाद देवू नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहणार आहे. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे आणि अपर कोषागार अधिकारी बबनराव इटे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या