Monday 10 October 2022

DIO BULDANA NEWS 07.10.2022

 प्रशासकीय गतिमानता अभियानात सहभाग नोंदवावा

*जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षाकरीता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानाचा कृती कालावधी प्रतिवर्षी दिनांक २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर असेल. स्पर्धेचा कालावधी २० ऑगस्टपासून एक वर्षाचा असेल. प्रशासकीय सुधारणेविषयी प्रस्ताव व कल्पना यासाठी मात्र कालावधीची अट नसेल.

हे अभियान सर्व स्तरावर राबविण्याचे अनुषंगाने शासन निर्णय दि. ३ फेब्रुवारी २०२१ मधील तरतुदींचा अभ्यास करून, तसेच सदर शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी. सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयाचा या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी pragatiabhiyan.maharashtra.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे, यात जिल्ह्यातील कार्यालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन

बुलडाणा, दि. 7 :  माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी शनिवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाप्रती आवड निर्माण करण्यासाठी हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा. तसेच दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी वाचन प्ररेणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000

कृषि विकासाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यातून कृषि विकासाला संधी मिळणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेंतर्गत ‘आयसीएआर’ संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र पुणे, अहमतदनगर तसेच सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी, प्रक्रिया केंद्र याठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे नियोजन उपविभागीय कृषि अधिकारी, खामगाव कार्यालय, यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. या पाच दिवसीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनामार्फत अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून यासाठी अर्ज मागविण्यासाठी येत आहेत.

प्रत्यक्ष अनुभवावर आधारित राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीसाठीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या, तसेच लाभ घेऊ इच्छित असलेल्या खामगाव, शेगाव, नांदुरा जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी खामगाव कार्यालयात आपली संपूर्ण माहितीसह अर्ज  नाव, गाव, तालुका, मोबाईल क्रमांक, सातबारा, फळपिक, भाजीपाला क्षेत्र, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र आदी माहिती दि. 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत sdaokhamgaon1@gmail.com या ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष कार्यालयात सादर करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिपक पटेल यांनी केले आहे.

00000

नवसंकल्पनेबाबत उद्योजकांनी बुट कँपमध्ये सादरीकरण करावे

                                                                   -जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

*शुक्रवारी स्टार्टअप बुट कँपचे आयोजन

बुलडाणा, दि. 7 : कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहनासाठी स्टार्टअप बुट कँपचे आयोजन शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले आहे. या शिबीरात जिल्ह्यातील नवउद्योजकांनी सादरीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले आहे.

येथील पंकज लद्धड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी येथे नवउद्योजकतेबाबत माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व  तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने होणार आहेत. यात नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण करता येणार आहे. या अगोदर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी सादरीकरणासाठी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे. सदर स्पर्धेकरीता नोंदणीची प्रक्रिया दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.  इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे प्रयोजन आहे. यासाठी तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन (मोबाईल व्हॅन) यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व  तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळणार आहेत. प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येणार आहे.

राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रेचा उद्देश तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. नवसंकल्पना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्‍ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे तसेच राज्यातील उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे हा आहे.

जिल्ह्यातील नवसंकल्पना असलेल्या नवउद्योजकांनी बुट कँपमध्ये सादरीकरण करावे, याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाचे नंदू मेहत्रे मो. क्र. 9975704117, शफीउल्ला सय्यद मो. क्र. 7620378924 आणि गोपाल चव्हाण मो. क्र. 8108868403 यांच्याशी तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक  07262- 242342 /299342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

विद्यार्थी बनणार स्वच्छता मॉनिटर

*गांधी जयंतीपासून शालेय शिक्षण विभागचा उपक्रम

बुलडाणा, दि. 7 : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून मिशन स्वच्छ भारतचा वर्धापन दिन साजरा करण्यसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे लेटस्‍ चेंज उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.

निष्काळजीपणे कचऱ्याची विल्हेवाट न लावण्याची सगळ्यानाच जाणीव आहे. पण कधी कधी, कदाचित नकळत, ते केले जाते, ही सत्य परिस्थिती आहे. असे काणी करताना आढळल्यास त्याच क्षणी त्यांना या चुकीची जाणीव करुन देणे महत्वाचे आहे. कुठेही कचऱ्याबाबत निष्काळजीपणा घडताना आढळल्यास स्वच्छता मॉनिटरने निदर्शनास आणून दिल्याने चूक सुधारली जाईल आणि कचरा, कचरा कुंड्यांमध्ये टाकला जाईल. या उद्देशाने विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जाबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यसासाठी सर्व शाळांमध्ये लेटस् चेंज हा उपक्रम राबविण्यात येईल.

या उपक्रमात स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार प्रसार झाल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करण्याच्या सवयीमध्ये बदल होऊन परिसर स्वच्छ राहील, तसेच सफाई कर्मचाऱ्यावरील भार देखील कमी होईल. जास्तीत जास्त स्वच्छता मॉनिटरना सक्रिय करणाऱ्या शाळा, तसेच जास्तीत जास्त सक्रीय करणारे प्रोजेक्ट लेट्स चेंजसाठी नेमलेल्या जिल्हा समन्वयकांना सन्मानित केले जाणार आहे.

प्रोजेक्ट लेट्स चेंजचे संचालक रोहित आर्या यांनी माडलेल्या स्वच्छता मॉनिटर या संकल्पनेला शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंग देओल, यांनी पाठबळ दिले आहे. स्वच्छता मॉनिटर प्रकल्प सक्रिय आणि यशस्वी होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांसोबत मंगेश भोरसे समन्वय साधतील. सर्व शाळांसोबत व्हीडीओ लिंक शेअर करुन त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. विद्यार्थी कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढतील असा विश्वास शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी दर्शविला आहे.

00000

No comments:

Post a Comment