Wednesday 19 October 2022

DIO BULDANA NEWS 19.10.2022

 


बालविवाह रोखण्याचा नांद्रा कोळी ग्राम पंचायतीचा निर्धार

बुलडाणा, दि. 19 : राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी नांद्रा कोळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी गावामध्ये कँडल मार्च काढण्यात आला.

कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन दिल्ली, कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन बुलडाणा, उमेद कार्यालय, ग्रामपंचायत नांद्रा कोळी, तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ग्रामपंचायत नांद्रा कोळी येथे बालविवाहमुक्त भारत निमित्ताने कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी बालविवाहाची कुप्रथा रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आवाहन महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे यांनी केले. आशा काळवाघे अध्यक्षस्थानी होत्या.

श्री. रामरामे म्हणाले, बालवयात मुलीचे लग्न झाल्यास तिच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच होणारे बाळ हे सुदृढ होत नाही आणि बालमृत्यू होताना दिसून येते. जिल्ह्यात अश्या घटना होणार नाही, यासाठी सर्वांनी जनजागृती करणे आवश्यक आहे.

स्री मुक्ती संघटनेच्या प्रा. शाहीना पठाण यांनी मुली शिकल्या तर तिची प्रगती होईल आणि वयाच्या १८ वर्षानंतर लग्न झाले तर बाळाची जबाबदारी घेण्यासाठी ती सक्षम होईल, असे विचार मांडले. महिला बचतगटाच्या माध्यामतून आज गावांमध्ये खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे काम होताना दिसून येत आहे. त्यामुळे महिला बचतगटातील महिलांनी बालविवाह होवू देणार नाही, असा निर्धार करावा, असे आवाहन श्रीपाद सोनटक्के यांनी केले.

कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र सोभागे यांनी प्रास्ताविक केले. समाधान जाधव यांनी आभार मानले.

000000




महारोजगार मेळाव्यात २२० उमेदवारांची प्राथमिक निवड

          बुलडाणा, दि. 19 : कौशल्‍य, रोजगार उद्योजकता व नाविन्‍यता विभागाच्‍या वतीने महारोजगार मेळावा घेण्यात आला. यात जिल्ह्यातील 220 उमेदवारांची प्राथमिकस्तरावर निवड करण्यात आली आहे.

महाराष्‍ट्र स्‍टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्‍ताहाच्या अनुषंगाने दि. १५ ते १९ ऑक्‍टोबर २०२२ या कालावधीत साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा येथील स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात पंडीत दीनदयाल उपाध्‍याय महारोजगार मेळावा पार पडला.

मेळाव्‍यात श्रीधर स्पिनर्स प्रायव्हेट लिमीटेड अमरावती, रुचा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद, हिंदुस्थान लिव्हर प्रायव्हेट लिमिटेड, खामगाव, नवभारत फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद यासह क्वेस क्रॉप बहुराष्ट्रीय कंपनी अशा 13 आस्‍थापनांनी 710 रिक्‍तपदांसाठी ही प्रक्रिया राबविली.

रोजगार मेळाव्‍यास 734 उमेदवार उपस्थित होते. तसेच 145 उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. यातील 220 उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रांच्‍या आधारे प्राथमिक निवड करण्‍यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्‍त प्रांजली बारस्कर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पु. पं. अंभोरे, हिदुस्थान लिव्हर खामगावचे शशिकांत वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची निवड होण्याकरिता जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच स्व. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. विशाल पानसे, प्रा. निलेश टाले, प्रा. सागर भिसडे यांनी पुढाकार घेतला. 

00000

नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला 72 तासात द्यावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 19 : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 साठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीची पूर्व सूचना 72 तासाच्या आत विमा कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यामुळे ही नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने द्यावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा जोखिमेच्या बाबींमध्ये नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबतची पूर्व सूचना फॉर्म विमा कंपनीस देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका आणि ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरंस ॲपवर नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना काढणी पश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबींतर्गत तक्रार दाखल करावी. यात पिकांची सद्यस्थिती नमूद करणे आवश्यक आहे. यात कट ॲण्ड स्प्रेड बंडल्ड फॉर ड्रायिंग हा पर्याय निवडावा. नुकसानीची टक्केवारी ही 100 टक्के नमुद करावी.

कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबींतर्गत तक्रार दाखल करावी आणि पिकांची स्थिती स्टॅडींग क्रॉप हे पर्याय व नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करावी. प्रत्येक गटातील पिकांकरिता स्वतंत्रपणे तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीकरिता स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल, तो जतन करून ठेवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

00000

क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर क्रीडा प्रशिक्षण शिबीर

*अर्ज करण्याच्या मुदतीत बदल

            बुलडाणा, दि. 11 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्स क्रीडा प्रशिक्षण शिबीर सन 2022-23 या वर्षात आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 10 शिक्षकांची निवड करुन राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर क्रीडा प्रशिक्षण शिबीराकरीता पाठविण्यात येणार आहे. आता यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विना अनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळा, आश्रमशाळेतील कार्यरत असलेले शिक्षकांची यात निवड करण्यात येणार आहे.यात ॲथलेटीक्स, बास्केटबॉल, खो-खो, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, तिरंदाजी, सायकलींग, टेनिस, बॉक्सिंग, कबड्डी, ॲक्वेटिक्स, जिम्नॅस्टिक, शुटिंग, हॉकी, रोईंग, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल या खेळांमध्ये प्रशिक्षण देण्याचा अनुभव, खेळाची माहिती तसेच वैयक्तिक खेळातील कामगिरी, क्रीडा क्षेत्रात काम केल्याचा अनुभव, एनआयएस पदविका किंवा प्रमाणपत्र आदीबाबतची माहिती सादर करावी लागणार आहे.

पंच परिक्षा प्रमाणपत्र माहिती, पंच, सामनाधिकारी म्हणून काम केले असल्यास ते अनुभव प्रमाणपत्र, यापुर्वी क्रीडा विभागात किंवा इतर खात्यामार्फत मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचा तपशिल, आपल्या शाळेतील खेळनिहाय असलेल्या क्रीडा सुविधांचा तपशिल, शाळेचे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये घेण्यात येत असलेल्या सहभाग व प्राविण्याबाबत माहिती आदी बाबींचा विचार करुन जिल्ह्यातील 10 अनुभवी शिक्षकांची मास्टर ट्रेनर करीता निवड करण्यात येणार आहे.

परिशिष्ट ‘अ’ हा परिपूर्ण भरुन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत सादर करावयाचा आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. परिपूर्ण प्रस्ताव दि. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत स्विकारल्या जातील. अर्जाचा नमुना याच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनुभवी व क्रीडा क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना

अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 19 : केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जास मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी scholarship.gov.in या पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती विद्यार्थी नोंदणीकरिता दि. 31 ऑक्टोबर 2022, सदोष अर्ज पडताळणी दि. 15 नोव्हेंबर 2022, संस्था पडताळणी दि. 15 नोव्हेंबर 2022 करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

0000000

जागृती फुड कंपनीबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

*आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा, दि. 19 : जागृती ॲग्रो फुडस प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने आश्वासनाप्रमाणे परतावा दिलेला नसल्याने तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी जागृती कंपनीने दिलेली दि. २८ एप्रिल २०१४ पुर्वीची पावती पुरावा म्हणून सादर करावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने जागृती ॲग्रो फुडस कंपनीमधील गुंतवणुकदारांनी दि. २८ एप्रिल २०१४ पुर्वीच्या जागृती ॲग्रो फुडस प्रा. लि. कंपनीच्या नावे असलेल्या पावत्या, परतावा प्रमाणपत्र, ॲग्रीमेंट असल्यास त्यांनी त्वरीत बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेत मुळ प्रतीसह साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्याकरिता उपस्थित रहावे किंवा तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गजानन मोरे, मोबाईल क्रमांक ७९७२२२२५६६ वर संपर्क साधावा.

तक्रारदार अनिल प्यारेलाल जयस्वाल हे जागृती ॲग्रो फुडस प्रा.लि. एलएलपी या कंपनीमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नोकरीस होते. जागृती ॲग्रो फुडस प्रा.लि. या कंपनीमध्ये स्वत: व त्यांचे कुटुंबियांच्या नावे ५ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. जागृती ॲग्रो  फुडस प्रा. लि. या कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परतावा न दिल्याने राज गणपत गायकवाड व इतर कोअर कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सुरु असून तपासामध्ये फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांनी जागृती ॲग्रो फुडस प्रा. लि. एलएलपी या कंपनीच्या पावत्या व परतावा प्रमाणपत्र दिलेले आहे. दि. २८ एप्रिल २०१४ पुर्वीची जागृती ॲग्रो फुडस प्रा. लि. या कपंनीची एकही पावती कोणत्याही साक्षीदार, गुंतवणुकदाराने जमा केलेली नाही. या तपासात आवश्यक असणारी कागदपत्रे नागरिकांनी सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

बचतगटांच्या उत्पादनांचे विक्री, प्रदर्शनीचे आज उद्घाटन

बुलडाणा, दि. 19 : ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत दिवाळीनिमित्य लागणाऱ्या विविध उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शनी दि. 20 ऑक्टोबर ते दि. 22 ऑक्टोबर आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते गुरूवारी, दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

ही विक्री व प्रदर्शनी बुलडाणा येथील शिवाजी सभगृहाजवळ, जिल्हा परिषद कार्यालय परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनीत बचत गटातील महिला द्वारे निर्मित दिवाळीनिमित्त लागणारे फराळाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनीतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment