Monday 3 October 2022

DIO BULDANA NEWS 01.10.2022

 






१३० महिला बचतगटांना ८५ लाखांचा निधी वितरीत

बुलडाणा, दि. १ : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजनेतील १३० महिला बचतगटांना ८५ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते बचतगटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही योजना जिल्ह्यात सन 2019-20 या वर्षात राबविली गेली. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांच्या प्रयत्नामुळे निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील १३० महिला बचतगटांना ८५ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले.
जिल्हास्तरीय लाभार्थी 10 बचतगटांना प्रत्येकी 2 लाख 50 हजार रुपये आणि तालुकास्तरीय बचतगटांना प्रत्येकी 50 हजार रुपये असे एकूण 130 बचत गटांना 85 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपूते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले. यावेळी बचतगटांना प्रमाणपत्र देऊनही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. तायडे, श्री. मेश्राम महेंद्र सौभागे, श्रीमती गायकवाड उपस्थित होते.
00000




शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत बैठक संपन्न
बुलडाणा, दि. १ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि एकविध क्रीडा संघटनांच्या वतीने सन 2022-23 या वर्षातील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे अध्यक्षतेखाली सभा पार पडली. 
जिल्ह्यात 91 खेळांच्या क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत नियोजन करण्यात आले.  या स्पर्धा दि.17 ऑक्टोंबर 2022 ते दि. 18 डिसेंबर 2022 या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत.  यामध्ये तालुका, जिल्हा व विभागीयस्तर स्पर्धेचा समावेश राहणार आहे.
सदर स्पर्धांसाठी स्पर्धा पुर्व प्रवेशिका, प्रवेश नोंदणी दि. 5 ऑक्टोंबर 2022 ते दि. 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने करावी लागणार आहे. प्रवेश निश्चित करण्याची जबाबदारी शाळांवर राहणार आहे.
स्पर्धांसाठी विविध खेळ संघटनांचे तांत्रिक सहकार्य घेण्यात येणार आहेत. फिल्ड आर्चरी, बिच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप कॉन दो, युग मुं दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, जित कुने-दो, पेट्यांक्यु, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, वुडो मार्शल आर्ट, हाफ किडो बॉक्सींग, कुराश या खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. संघटनेच्या तांत्रिक सहकार्य आणि आर्थिक सहकार्याने स्पर्धा आयोजित करावयाचे आहे . त्यामुळे ज्‍या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित नव्हते, तसेच इतर खेळांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असल्याचे प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करावेत. या कालावधीत संबंधित प्रमाणपत्र सादर न केल्यास, ही संघटना जिल्ह्यामध्ये कार्यरत नाही, असे समजण्यात येईल.
सन 2022-23 या वर्षात एकुण 91 खेळांच्या स्पर्धा आयोजित होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा. यामध्ये किमान दोन संघीक व एक वैयक्तीक खेळात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे, या स्पर्धांमध्ये शाळांनी प्रवेश नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment